पालक आणि कशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोन का ठरतोय वादाचा विषय? मुलांना काय वाटतं?

सर्व्हेक्षणात नोंदण्यात आलेली महत्वाची निरीक्षणे समोर
Parenting
ParentingEsakal

मुंबई: रोज उठून शाळेचे कारण सांगून माझा नाहीतर आजीचा फोन घेतो. शाळेच्या प्रोजेक्टची माहिती घ्यायची आहे, एक संदर्भ शोधायचा आहे अशी एक ना अनेक कारणे सांगून माझी मुलगी फोन घेत असते. मी कितीवेळ लक्ष ठेवणार? असं वाटतं की जाऊन तिच्या हातून फोन काढून घ्यावा.. पण पुन्हा असं वाटतं की कदाचित खरंच काही महत्वाचं काम सुरु असेल आणि माझ्यामुळे ते राहील म्हणून मी तिच्या हातून मोबाईल घ्यायला जात नाही. पण तिने सारखा मोबाईल घेणे मला अजिबातच आवडत नाही ९ वीत असणाऱ्या अक्षराची आई सांगत होती.

मेटा कंपनीविरोधात अमेरिकेतील पालक न्यायालयात का?

आपल्या वयात आलेल्या मुलांच्या बाबतीत पालक अनेकदा जास्त काळजीत असतात. अमेरिकेतील पालकांनी तर एकत्र येत मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्राम चालविणाऱ्या कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये आरोप करण्यात आला होता की, याचा 'अल्गोरिदम' अशा पद्धतीने सेट केला आहे की त्यामुळे मुले तासनतास यामध्ये गुंतून राहतील.

किशोरवयीन मुले, त्यांच्या हातात असणारे मोबाइल आणि पालक हा संघर्ष आता जागतिक स्तरावर अधोरेखित होताना दिसतो आहे. या विषयात नुकतेच अमेरिकेत सर्व्हेक्षण झाले आहे. Pew Research Centre ने केलेल्या या सर्व्हेक्षणात काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहे.

सर्व्हेक्षणात नोंदण्यात आलेली महत्वाची निरीक्षणे

१) ७२ टक्के अमेरिकेच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या आजूबाजूला मोबाईल नसेल तर शांत वाटतं तर ४४ टक्के मुलांना चिंता वाटत राहते.

२) ६९ टक्के मुलांना वाटते की, काही छंद किंवा आवडीनिवडी साठी त्यांना स्मार्ट फोन वापरणे सोपे जाते. तर ३० टक्के मुले म्हणतात जीवन कौशल्य मिळण्यासाठी स्मार्टफोन गरजेचे आहे.

३) या सर्व्हेक्षणात असे आढळून आले की, जवळपास निम्मे पालक आपल्या मुलांचे मोबाईल पाहतात.

४) साधारण प्रत्येक मुलांमागे किमान चार पालकांचा आपल्या मुलांसोबत स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवतात या विषयावरून वाद होतो.

५) यामध्ये फक्त मुलांच्या मोबाइलमुळेच नाही तर पालकाच्या मोबाईलमुळे देखील पालक आणि मुले हा संवाद व्यवस्थित होताना दिसत नाही.

स्मार्टफोनमुळे नुकसान होते की फायदा, मुलांना काय वाटते?

१३ ते १७ वयोगटातील जवळपास दीड हजार मुलामुलींचा या सर्व्हेक्षणात सहभाग होता. या सर्व्हेक्षणात असे आढळून आले की १० मधील ४ मुले ही त्यांचा खूप जास्त वेळ हे स्मार्टफोन आणि सोशल मीडियावर घालवतात. तर मुलांपेक्षा मुली या अधिक वेळ यावर घालवतात. तर ७२ टक्के मुलामुलींना जर फोन जवळ नसेल तर शांत वाटते असे ते मान्य करतात.

तर चिंताग्रस्त, उदास आणि एकटे वाटत असल्याचेही अनुक्रमे ४४, ४०, ३९ टक्के मुलामुलींना वाटते. मात्र ७० टक्के मुलामुलींचे असे म्हणणे होते की स्मार्ट फोनमुळे त्यांचे नुकसान होण्यापेक्षा फायदा अधिक होतो. तर अनेक किशोरवयीन मुलामुलींना ६५ टक्के मुलामुलींना त्यांची कल्पकता फोनमुळे वाढते असेही वाटते.

किती टक्के पालकांचा मुलांच्या फोनवर कंट्रोल?

पालकांना मात्र या मुलांपेक्षा काहीतरी वेगळं वाटत असल्याचे समोर आले आहे. मुलांनी स्मार्टफोन किती वापरावा यावर अनेक पालकांनी वेळ ठरवून दिली आहे. मुलांनी किती वेळ फोन वापरावा ही गोष्ट १५ टक्के पालकांना टॉप प्रायोरिटी वर ठेवावीशी वाटते. तर ६१ टक्के पालकांना हा मुद्दा महत्वाचा वाटतो. फक्त १९ टक्के पालक मात्र आम्ही असं कोणताही बंधन घालत नसल्याचे सांगतात. तर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांच्या तुलनेत श्रीमंत पालकांना फोन पासून आपल्या मुलांना वेगळं करणं अवघड जातं.

स्मार्टफोनमुळे पालकही मुलांकडे लक्ष देत नाहीत..?

तर या सर्व्हेक्षणात पालक आणि मुलांची मतं वेगवेगळी असली तरीही आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. त्यामध्ये पालक आणि मुलं स्वतः मान्य करतात की फोनमुळे त्यांच्या संवादात अडथळे येतात.

यामध्ये ३१ टक्के पालकांना असं वाटतं की ते त्यांच्या मुलांशी बोलत असताना स्मार्टफोनमुळे ते 'डिस्ट्रक्ट' होतात. आणि मुलंही म्हणतात की, जेव्हा ते त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी ते फोनमुळे त्यांच्या पालकांचे लक्ष विचलित झालेले असते. मुख्य म्हणजे ४६ टक्के मुलांना ही बाब आपल्या पालकांबाबत वाटते.

आजवरच्या अनेक घटनांतून हे पुढे आले आहे की, जे अमेरिकेत घडतं ते भारतात घडायला फारसा वेळ लागत नाही. सध्या अनेक पालक आणि मुलांमधील विसंवादाचे कारण हे स्मार्टफोन आहे.

याबाबत डोंबिवलीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अद्वैत पाध्ये म्हणाले, "आपल्याकडेही हे आता होताना दिसते आहे. साधारण याची सुरुवात आपल्याकडे कोव्हीड दरम्यान झाली. या काळात मुलांचे ऑनलाईन अभ्यास सुरु झाले होते. अनेकदा अभ्यास करताना फक्त अभ्यासाच केला जात नाही बाकीही गोष्टी बघितल्या जातात.

आता तर अगदी शाळा, क्लास या सगळ्याच गोष्टी ऑनलाईनच झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोन मुलांच्या हातात आले आहेत. मुलांना या गोष्टींमध्ये तोटे असू शकतात हे त्यांच्या आयात कळत नाही पण पालकांना याचे गांभीर्य माहिती असते आणि त्यातून पालक आणि मुलं असा विसंवाद व्हायला सुरुवात होत असावी."

Parenting
Sleep Stages : झोपेत तुमचे शरीर, मेंदू आणि मन कोणत्या अवस्थेतून जाते?

लक्ष विचलित होण्याचे प्रमाण वाढले आहे

डॉ.अद्वैत पाध्ये म्हणाले, "आमच्याकडे कोव्हीड नंतर अशा केसेस येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ज्यात मुले फार जास्त स्मार्ट फोनच्या आहारी गेलीत असे पालकाचे म्हणणे असते. अभ्यासासाठी हातात घेतलेला मोबाइल अनेकदा दुसऱ्या कारणासाठी वापरला जातो. मुलं त्यावर रिल्स, सोशल मीडिया, मुव्ही, अभ्यास असे सगळेच करतात. यातून जागरण, झोप न होणे, चिडचिड या गोष्टी होतात. झोपेच्या समस्या येतात. अर्थातच या सगळ्याचा परिणाम कौटुंबिक वातावरणावर देखील होतो.

स्मार्ट फोनच्या अतिवापराच्या केसेस येतात तेव्हा हे व्यसनाकडे जातंय किंवा व्यसन लागलं आहे हे आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागत. त्यासाठी आम्ही त्यांचा अभ्यास करून स्केल सेट करतो. त्याचे प्रमाण पाहतो. त्या प्रमाणानुसार स्क्रीन टाइम ठरवून घेणे, लक्ष विचलित न होण्यासाठी काही नियम ठरवून घ्यायला सांगतो. आणि जर गरज वाटली तर औषधेही देतो."

भारतात अमेरिकेच्या तुलनेत प्रमाण कमी आहे. मात्र हे प्रमाण वाढू नये याची खबरदारी मुलांची, पालकांची आणि समाज म्हणून आपली देखील आहे. यासाठी मुलांसोबतचा संवाद वाढविणे गरजेचे आहे. तसेच गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी त्या संवाद आणि शिस्तीच्या चौकटीत कशा बसविता येतील यासाठी प्रयत्न करायला हवेत.

-----------

Parenting
तुमच्या डोक्याचाही पॉपकॉर्न झालाय का? मोबाईलचा अतिवापर कुठपर्यंत घेऊन जाणार? संशोधन सांगते..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com