राजू शेट्टींची दुसरी इनिंग शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty}
राजू शेट्टींची दुसरी इंनिंग शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल का?

राजू शेट्टींची दुसरी इनिंग शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल का?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करू नये, असे पत्र दिले. राज्यपालांना निवेदन दिल्याचे फोटो वर्तमानपत्रांतून छापून आले. राजू शेट्टी यांच्या यंत्रणेकडूनच हे फोटो वितरित झाले असतील. राज्यपालांना आपण भेटायला गेलो याचा डंका पिटवत राजू शेट्टी यांनी आपण पदासाठी हपापलेले कसं नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राजू शेट्टी यांचा लढावू बाणा काय आहे आणि सत्तेबद्दल त्यांना प्रेम कसं नाही याबद्दलच्या कहाण्या गेल्या अडीच वर्षांत ब‍ऱ्याच सांगितल्या गेल्या. राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर जाण्याची इतकी इच्छा नव्हती, तर महाविकास आघाडीने जेव्हा नावं सुचविली त्यावेळीच आपल्या संघटनेतील एखाद्या लढावू कार्यकर्त्याचं नाव राजू शेट्टी यांनी का सुचविलं नाही? महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडलो याची जाहिरातबाजी करणाऱ्‍या राजू शेट्टींना गेल्या पाच वर्षांत अक्राळविक्राळ घोषणा आणि समाजात नको ते भेद पाडून, तसंच बेलगाम जातीयवादी विधानं करून वर्तमानपत्राची जागा व्यापण्यापलीकडे काय केलं, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं काय उत्तर असेल? राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांना संघटनेतून काढून टाकल्याची घोषणा केली.

भुयार यांनी संघटनेच्या शिस्तीचं पालन केलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. मुळात आपल्या विजयासाठी राजू शेट्टी यांनी काही केलं नाही, असा आरोप भुयार यांनी केला आहे. भुयार यांना आम्ही निवडून आणलं, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दाव्यातली हवा भुयारांनी काढून टाकली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर संकुचितपणाचा आणि जातीयवादाचा सातत्याने आरोप करणाऱ्‍या राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये भुयार यांना एखादं राज्यमंत्रिपद द्यायला लावलं नाही. समजा, ते जमलं नाही, तर एखाद्या शेतकऱ्यांशी संबंधित सक्रिय काम करता येईल अशा महामंडळाचं किंवा समितीचं अध्यक्षपद भुयार यांना देण्याची दानत राजू शेट्टी यांनी दाखविली नाही. भुयार यांना एखादं पद देऊन, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचा दबदबा वाढविणं राजू शेट्टी यांना शक्य होतं. मात्र, लहान मुलांच्या खेळात माझी बॅट, माझीच बॅटिंग असं वर्तन एखादा श्रीमंत घरचा पोरगा करत असतो, तसंच वर्तन राजू शेट्टी यांनी केलं आहे. संघटनेत पद कुणाला द्यायचं असेल तर ते फक्त आपल्याला, किंवा ऊठ म्हटलं की उठेल, असं सतत आपलंच ऐकेल अशा कार्यकर्त्याला द्यायचं, ही राजू शेट्टी यांची कार्यशैली आहे. फडणवीस सरकारमध्ये सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिल्यावर पुढं ते संघटनेला सोडून भाजपमध्ये गेले. तसं परत दुसऱ्‍या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी नंतरच्या काळात राजू शेट्टी यांची कामाची पद्धत राहिली आहे. कार्यकर्त्यांना मोठं केलं तर नेता मोठा होतो; पण त्यासाठी नेत्याचं मन तेवढं मोठं असावं लागतं. दुर्दैवाने राजू शेट्टी यांच्याकडे ही दानत असल्याचं कधी दिसलं नाही. ज्या सदाभाऊ खोतांबद्दल मैत्रीचे दाखले दिले, त्याच मित्राला मी कशी मदत केली होती, त्याची किती वाईट दशा होती, त्या काळात मी त्याच्या मागे कसा उभा राहिलो, अशी दवंडी पिटणारा हा नेता आपल्या कार्यकर्त्यांचं भलं व्हावं, त्यांना विविध सत्तापदं द्यावीत यासाठी उदारता दाखवेल, अशी अपेक्षा बाळगणं चूकच आहे.

राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देतानासुद्धा राजू शेट्टी यांनी गेली अडीच वर्षं आपण ज्यांच्याबरोबर राहिलो, त्यांच्याबद्दल किमान सभ्यता दाखवायची काळजी घेतली नाही. अडीच वर्षं ज्यांच्याबरोबर राहिले त्यांच्यावर उलटताना काही भान ठेवायचं असतं, याचाही विवेक त्यांना उरला नाही. ज्यांनी आपलं नाव पाठवलं त्या पक्षांना मी आता तुमच्याबरोबर नाही, माझं नाव तुम्ही पाठवू नका, असं पत्र देऊन ते पत्र प्रसारमाध्यमांना देऊन हा विषय संपवता आला असता; पण प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मला सत्तेचा लोभ कसा नाही याची सतत हाकाटी पिटायची अशी सवय लागलेल्या या नेत्याने थेट राज्यपालांकडे निवेदन देत आपण कसे साधुवृत्तीचे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका करणाऱ्‍या या नेत्याने सत्तेची चव चाखण्यासाठी तडजोड केली, त्यांच्या माध्यमातून आमदारकी मिळविण्याचा प्रयत्न केला. आमदारकी मिळत नाही असं लक्षात आल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला नावं ठेवत राज्यपालांकडे जाऊन निवेदन देण्याचा द्राविडी प्राणायाम केला. हे म्हणजे नवरा नीट वागत नाही, त्या नवऱ्‍याबरोबर नांदायची इच्छा नाही, असं सांगत सासरच्या मंडळींना बदनाम करत ४९८ ची केस घालून खंडणी उकळणाऱ्या,
कायद्याचा चुकीचा फायदा घेणाऱ्या सुनेच्या वर्तनासारखं झालं. महाविकास आघाडीचं वर्तन तुम्हाला पटत नाही, तर जनतेमध्ये जाऊन संघर्ष करा, आघाडीचं काय चुकलं ते सांगा, यासाठी पुढची अडीच वर्षं हातात असताना राज्यपालांच्या माध्यमातून फुकटची प्रसिद्धी करून घेत मी कसा वेगळा आहे याचंच दर्शन घडविण्याचा हा सारा प्रकार होता.

शेतकऱ्यांचा मसिहा म्हणून मिरवणाऱ्‍या राजू शेट्टी नावाच्या नेत्याने शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित अशा प्रश्नांवर अत्यंत ताकदीचा संघर्ष केला आहे, अशी उदाहरणं फार कमी आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील ऊस उत्पादकांच्या पट्ट्यामध्ये ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या या नेत्याने एका अर्थाने बागायतदार श्रीमंत शेतकऱ्‍यांची बाजू घेतली होती, असा जर आरोप कोणी केला, तर त्याचं निराकरण होईल असं स्पष्टीकरण त्यांच्याकडे आणि त्यांच्या समर्थकांकडेही नाही. आज राज्यात शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड उस गाळपाविना पडून आहे त्याबद्दल राजू शेट्टी यांनी कधी आवाज उठवल्याचं दिसलं नाही. सांगली, कोल्हापूर भागातील सहकारी साखर कारखानदारांचे नेते आपल्या अंतर्गत युद्धातले हिशेब चुकविण्यासाठी राजू शेट्टी यांना प्रोत्साहन देत होते, त्यांच्या हिंसक आंदोलनात भर घालत होते. यांची आंदोलनं अनेक वेळा गरीब शेतकऱ्‍याच्या जिवावर उठल्याची उदाहरणंपण आहेत. यांच्या आंदोलनामुळे रस्ते जाम होऊन हातावर पोट असलेल्या छोट्या शेतकऱ्यांचा माल बाजारापर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळे त्यांचं किती नुकसान झालं याचं चित्रण शेतकऱ्‍यांच्या व्यथा मांडणाऱ्‍या काही लेखांमध्ये उमटलं होतं.


(गेली अडीच वर्षं राजू शेट्टी ज्या गटातून विधान परिषदेवर जाण्यासाठी प्रयत्न करीत होते, तो गट कला-साहित्य-संस्कृती या क्षेत्रातून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा गट होता. आत्मचरित्र लिहिण्यापलीकडे राजू शेट्टी यांचा साहित्याशी कधी संबंध आला, असं दिसलेलं नाही. कला आणि संस्कृती या गटातून हिंसक आंदोलनाची महान परंपरा सुरू करणाऱ्‍या राजू शेट्टींची कला क्षेत्रातील कामगिरी महाराष्ट्राला तरी अजूनपर्यंत कळलेली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलनाचा प्रकार जो घडला, ज्यावरून संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली. या असल्या घाणेरड्या आंदोलनाची सुरुवात आणि एखाद्या राजकीय नेत्याच्या घरापाशी आंदोलन करून त्याच्या कुटुंबीयांना वेठीस धरण्याची अत्यंत घृणास्पद अशी सुरुवात राजू शेट्टी या नेत्याने संस्कृतिरक्षक महाराष्ट्रात सुरू केली, हे विसरता येणार नाही.)

सुरवातीच्या काळात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्‍यांसाठी मोठा संघर्ष केला, त्यांच्यामुळे शेतकऱ्‍यांच्या मालाला बाजारपेठ मिळाली. शेतकऱ्‍यांच्या हक्काचं काही प्रमाणात का होईना रक्षण झालं, हे कुणीच नाकारत नाही. राजू शेट्टी यांनी साखर सम्राटांच्या समोर मान वर करून बोलण्याची ताकद शेतकऱ्‍यांच्या अंगात निर्माण केली, हेदेखील कोणी नाकारणार नाही. मात्र, या कर्तबगारीची किंमत दोनवेळा खासदारकी आणि एकदा आमदारकी मिळवून त्यांनी ती वसूलही केली. शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलन उभं करताना जसं ठोस तत्त्वज्ञान मांडलं होतं, किंबहुना आपला कार्यकर्ता हा सैद्धांतिक चर्चेत कधी कमी पडता कामा नये याची काळजी घेतली, तसं राजू शेट्टी यांनी केल्याचं कधी दिसलं नाही. सरकारी पातळीवर शेतकऱ्‍यांच्या पदरात दोन पैसे पडावेत यासाठी काही गोष्टींचा त्यांनी आग्रह धरल्याचं दिसलं नाही. विविध कार्यकारी सोसायट्या आणि साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्‍यांचे पैसे वेळेत आणि कोणाच्याही मध्यस्थीची गरज न भासता शेतकऱ्‍यांच्या थेट बँक खात्यात जमा होतील, अशी यंत्रणा उभारण्यासाठी सरकारदरबारी आग्रह धरणे यासाठी एखादं मॉडेल विकसित करणे याकरिता राजू शेट्टी यांनी प्रयत्न केल्याचं कधी दिसलेलं नाही. अशी सिस्टिम उभी केली की, शेतकऱ्यांचं नाव घेत सौदेबाजी करता येत नाही आणि अशा सौद्यांच्या माध्यमातून स्वतःचा विकास करता येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर विविध पुढाऱ्‍यांनी आपलं दुकान कसं चालेल यावरच भर दिला. गरीब माणसाची गरिबी दूर होईल यासाठी प्रयत्न न करता तुझी गरिबी आम्ही दूर करतो असं सांगत गरिबांच्या नावावर राजकारण करण्याचा हातखंडा प्रकार अनेक पुढाऱ्‍यांनी केला. राजू शेट्टी यांचं गेल्या २० वर्षांतलं शेतकऱ्‍यांसाठीचं काम बघितल्यानंतर चाकोरीबद्ध रस्त्यापेक्षा त्यांनी वेगळा रस्ता उभारला नाही हे लक्षात येतं. आंध्र प्रदेशमध्ये रायतु बाजारसारखा प्रयोग यशस्वी होतो आणि महाराष्ट्रात सहकाराची समृद्ध परंपरा असताना राजू शेट्टी यांनी ग्राहक ते शेतकरी अशी थेट साखळी उभी करणारी यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न केले, असं दिसलेलं नाही.

हेही वाचा: ‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ : जाणून घेऊयात गुणकारी अद्रकाचे फायदे

रचनात्मक प्रयत्न करताना खूप काळ संघर्ष करावा लागतो, प्रचंड वेळ द्यावा लागतो. प्रसिद्धीच्या ढगांवर आरूढ होण्यापेक्षा मातीत गाडून घेऊन काम करावं लागतं. मात्र अनेक पुढारी असा लांबचा मार्ग न स्वीकारता शॉर्ट कटचा अवलंब करतात. शेतकरीहितापेक्षा आपलं नेतृत्व कसं उभं राहील याकडे अनेकांचं लक्ष असतं. राजू शेट्टीही याला अपवाद ठरले नाहीत. दूध दराच्या आंदोलनाच्या वेळी शहरी आणि ग्रामीण अशी भंपक विभागणी करत शहरातल्या लोकांचे दूध न पाठवून हाल करू आणि आपण दुधाचा भाव मिळवू, अशी चुकीची मांडणी करणाऱ्‍या या नेत्याने शहरातही अनेक ग्रामीण नागरिकांची मुलं, भाऊ-बहीण नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने राहात असतात, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्‍यात उभं करून समाजात फूट पाडण्याचं घाणेरडं राजकारण या नेत्याने केलं. याचा कळस गाठला तो सैन्यदलात ब्राह्मण कधी सैनिक नसतो, ते फक्त अधिकारपदं भूषवितात, अशी बेछूट विधानं करून आपण घटनेचा अपमान करत आहोत याचाही विचार केला नाही. आपल्या जातीच्या कारखानदारांविरोधात सोईची भूमिका घेत, आपल्या जातीच्या मेळाव्याला हजेरी लावून थेट जातीचा फायदा करणारी धोरणं हवी, यासाठी संघर्ष हवा, अशी भूमिका मांडणाऱ्‍या या नेत्याने इतरांपेक्षा वेगळं असं कोणतं राजकारण केलं?

महाविकास आघाडी सरकारची साथ सोडून आम्ही आता शेतकरीहिताची काळजी घेणार आहोत, अशी भाषा राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी मांडली आहे. दुर्दैवाने आज शेतकऱ्‍यांच्या प्रश्नासाठी प्राणपणाने लढणारी संघटना आणि तसे नेते राहिलेले नाहीत. शेतकऱ्‍यांच्या समस्यांचं राजकारण सगळ्याच पक्षांना करायचं आहे. मात्र, आपल्या कारभारातून शेतकऱ्‍यांच्या पदरात काही पडावं, अशी मानसिकता राज्यकर्त्यांची नाही आणि नोकरशाहीची तर त्याहून नाही. कोरोनाकाळात शेतकऱ्‍यांना त्यांचा माल नाशवंत असूनही सरकारी नियमामुळे विकता आला नाही. हजारो शेतकऱ्यांचं त्यामुळे प्रचंड नुकसान झालं. त्या वेळी महाविकास आघाडी सरकारबरोबर असूनदेखील राजू शेट्टी यांनी आपल्या संघटनेच्या मार्फत यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसलं नाही. कोरोनाकाळात असंख्य अडचणींना तोंड देत बळिराजा आपलं काम निष्ठेने करत होता. आजही त्याच निष्ठेने तो ते काम करत आहे. त्याची कोंडी होणार नाही यासाठी राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले, तर त्यांची ही संघर्षाची दुसरी इनिंग खऱ्या अर्थाने शेतकऱ्‍यांना न्याय देणारी तर ठरेलच; पण शेतकऱ्‍यांचा मसिहा म्हणून लोक त्यांना नक्की दुवा देतील. अन्यथा सौदेबाज पुढऱ्‍यांमधला आणखी एक पुढारी इतकीच नोंद इतिहासात त्यांची असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top