जगात भारी कोल्हापुरी चप्पल न्यारी! Maharashtra News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगात भारी कोल्हापुरी चप्पल न्यारी!}

जगात भारी कोल्हापुरी चप्पल न्यारी!

कोल्हापूर (Kolhapur)शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी कोल्हापुरी चप्पल (kolhapuri chappal) हे विशेष आकर्षण आहे. कर्रकर्र आवाज ही या चप्पलची अनोखी खासियत आहे. कोणी पारंपरिक म्हणून तर कोणी फॅशन (Fashion) म्हणून या चपलांचा वापर करताना दिसतात. केवळ भारतातच (India) नव्हे तर परदेशातील नागरिकांनाही भुरळ घालणाऱ्या चपला नेमक्या तयार कशा केल्या जातात याचा आढावा घेऊयात... (How kolhapuri chappal Was Made and When it was invented)

कोल्हापूर म्हणंल की डोळ्यासमोर तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ, रंकाळा, आई अंबाबाई अन् जगात भारी अशी इथली रांगडी भाषा डोळ्यासमोर उभी राहते. त्यापाठोपाठ येथील चपला अन् त्यांचा तडफदार आवाज, रुबाब नकळत डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापुरी चप्पल भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य

कोल्हापुरी चपलांची ठळक वैशिष्टे! (Highlights of Kolhapuri Chappal)


सुबक आकार, नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा ही कोल्हापुरी चपलांची ठळक वैशिष्टे आहेत. माणसानं जे काही शोध लावलं त्यातला चपलांचा शोधही महत्त्वाचा आहे. पायाला टोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इसवी सन पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. त्यानंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई. भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचे साम्य आढळते. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव, याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळजवळ नाहीसा झाला, तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र, टिकून आहेत.

हेही वाचा: तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच

काप्दासी पायताण...! (Kapdasi Paytan)
कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. काप्दासी पायताण या नावाने ती ओळखली जात असे. नावावरून ती कोठे बनवली गेली त्या गावची देखील माहिती मिळत असे. १९२० साली तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरून दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावेही घेतली. अलीकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

उन्हाळ्यातसुद्धा थंडपणा...! (kolhapuri Chappal help to keep Cool even in summer)
कोल्हापुरी चपला सपाट असतात. मध्यभागी त्यांना एक पट्टी असते व एक अंगठा असतो. चामड्याचा याला पृष्ठभाग असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. कोल्हापुरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळ्यातसुद्धा थंडपणा जाणवतो. चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. या चपला बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करून उपजीविका करणारी साधारणत: सात हजारां पेक्षा अधिक कुटुंब आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते.

निर्मितीत घट! (Decline in production of kolhapuri Chappal)
सध्या या व्यवसायात चामड्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांच्या निर्मितीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किमती हेसुद्धा एक कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशातून मागणी आहे. कोल्हापूरला आलेली पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत हे जरी खरे असले तरी सद्य परिस्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने कामगार वर्गावर कठीण परिस्थिती आल्याचे जाणवते.

हेही वाचा: हिवाळी ट्रेकिंगसाठी खुणावणारी काही उत्तम ठिकाणं!

टॅग्स :Kolhapur