कसे चालते महापालिकांचे कामकाज
कसे चालते महापालिकांचे कामकाज- Esakal

महापालिकांबाबत बोलू काही...

आगामी काळात मुंबईसह पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, नाशिक, मालेगाव, सोलापूर, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांची निवडणूक होणार आहे. आपली महापालिका नक्की चालते कशी, तिची कामे काय, नगरसेवकांचे अधिकार काय हे यात लेखात आपण जाणून घेऊ.

राज्यात आजघडीला एकूण २७ महापालिका आहेत. त्यात आता नव्या २८ व्या इचलकरंजी महापालिकेची भर पडणार आहे. तशी अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाकडून नुकतीच जारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कामकाज काय, राज्यातील महापालिकांची स्थापना कधी झाली? याविषयीचा घेतलेला हा आढावा...

आगामी काळात मुंबईसह पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, नाशिक, मालेगाव, सोलापूर, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांची निवडणूक होणार आहे. आपली महापालिका (Municipal Corporation) नक्की चालते कशी, तिची कामे काय, नगरसेवकांचे अधिकार काय हे यात लेखात आपण जाणून घेऊ. (How Municipal Corporations in Maharashtra Works)

महापालिकेची स्थापना...
भारतामध्ये १६८८ मध्ये मद्रास (Madras) शहरासाठी पहिली महापालिका स्थापन करण्यात आली. शहरी/नागरी स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर हा महापालिका आहे. महापालिका स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. भारतीय संविधानाच्या २४३ कलमामध्ये महापालिका स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. तीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महापालिका अस्तित्वात येऊ शकते.

महापालिकेच्या निवडणुका (Elections) दर पाच वर्षांनी होतात. निवडून आलेल्या सदस्यांपैकी एक महापौर, तर एक उपमहापौर निवडला जातो. महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात. त्यांचा कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. तसेच, निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात. महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) असतात. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. आयुक्ताची नेमणूक राज्य सरकार (State Government) तीन वर्षांसाठी करते. महापालिकेचे अंदाजपत्रक हे आयुक्तच तयार करतात. महापालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.

महत्त्वाच्या महापालिकांविषयी...
पिंपरी-चिंचवड महापालिका ही देशातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका आहे. मुंबई महापालिका ही लोकसंख्येच्या बाबतीत सर्वांत मोठी असून तिचा कारभार मुंबई महापालिका अधिनियम १८८८ नुसार चालतो. तर, महाराष्ट्रातील इतर महापालिकांचा कारभार हा महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार चालतो.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महापालिका या ठाणे जिल्ह्यात (सहा), त्यानंतर पुणे (दोन) व नाशिकचा (दोन) क्रमांक लागतो. बृहन्मुंबई महापालिका ही एकटी महापालिका आहे, जिचे कार्यक्षेत्र मुंबई व मुंबई उपनगर अशा दोन जिल्ह्यांत आहे. तसेच, ज्या-ज्या जिल्ह्यात महापालिका आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी महापालिका आहे. केवळ रायगड असा जिल्हा आहे, ज्यात महापालिका आहे; पण त्याच्या मुख्यालयी अलिबाग येथे महापालिका नाही, तर पनवेल या शहरात महापालिका आहे

महाराष्ट्रातील महापालिका...
अ.क्र. नाव (जिल्हा; स्थापना)
कोकण प्रशासकीय विभाग
1 बृहन्मुंबई महापालिका (मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा;१८८८)
2 ठाणे महापालिका (ठाणे; १ ऑक्टोबर, १९८२)
3 कल्याण-डोंबिवली महापालिका (ठाणे; १ ऑक्टोबर १९८३)
4 मीरा-भाईंदर महापालिका (ठाणे; २८ फेब्रुवारी २००२)
5 भिवंडी-निजामपूर महापालिका (ठाणे; १६ डिसेंबर २००१)
6 नवी मुंबई महापालिका (ठाणे; १ जानेवारी १९९२)
7 उल्हासनगर महापालिका (ठाणे; १९९८)
8 पनवेल महापालिका (रायगड; १ ऑक्टोबर २०१६)
9 वसई-विरार महापालिका (पालघर; ३ जुलै २००९)
* पुणे प्रशासकीय विभाग
10 पुणे महापालिका (पुणे; १५ फेब्रुवारी १९५०)
11 पिंपरी-चिंचवड महापालिका (पुणे; ११ ऑक्टोबर १९८२)
12 सोलापूर महापालिका (सोलापूर; १ मे १९६४)
13 कोल्हापूर महापालिका (कोल्हापूर; १५ डिसेंबर १९७२)
14 सांगली-मिरज-कुपवाडा (सांगली; ९ फेब्रुवारी १९९८)
* नाशिक प्रशासकीय विभाग
15 नाशिक महापालिका (नाशिक; ७ नोव्हेंबर १९८२)
16 मालेगाव महापालिका (नाशिक; १७ डिसेंबर २००१)
17 अहमदनगर महापालिका (अहमदनगर; ३० जून २००३)
18 धुळे महापालिका (धुळे; ३० जून २००३)
19 जळगाव महापालिका (जळगाव; २१ मार्च २००३)
* औरंगाबाद प्रशासकीय विभाग
20 औरंगाबाद महापालिका (औरंगाबाद; ०८ डिसेंबर १९८२)
21 परभणी महापालिका (परभणी; १ नोव्हेंबर २०११)
22 लातूर महापालिका (लातूर; २५ ऑक्टोबर २०११)
23 नांदेड–वाघाळा महापालिका (नांदेड; २६ मार्च १९९७)
* अमरावती प्रशासकीय विभाग
24 अमरावती महापालिका (अमरावती; १५ ऑगस्ट १९८३)
25 अकोला महापालिका (अकोला; १ ऑक्टोबर २००१)
* नागपूर प्रशासकीय विभाग
26 नागपूर महापालिका (नागपूर; २ मार्च १९५१)
27 चंद्रपूर महापालिका (चंद्रपूर; २५ ऑक्टोबर २०११)

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत महापालिका नाहीत?
- कोंकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे
- पुणे विभागातील सातारा जिल्हा
- नाशिक विभागातील नंदुरबार जिल्हा
- औरंगाबाद विभागातील जालना, उस्मानाबाद, बीड आणि हिंगोली जिल्हे
- अमरावती विभागातील बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हे
- नागपूर विभागातील वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्हे.
- एकूण छत्तीस पैकी पंधरा जिल्ह्यांत महानगरपालिका नाही

महापालिकेची रचना...
महापालिकेची सदस्य संख्या कमीत-कमी ६५ व जास्तीत जास्त २२१ असते. जास्तीत जास्त ५ नामनिर्देशित सदस्य असतात. मुंबई महापालिकांकरिता सदस्य संख्या २२७ इतकी निश्चित केली आहे. महापालिकेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांतील सदस्यांची संख्या महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार निश्चित केली जाते.

नामनिर्देशित सदस्य...
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार महापालिकेवर पाच नामनिर्देशित सदस्य घेतले जातात. महापालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान, वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव, सामाजिक कार्याचा अनुभव, नगरसेवकाचा अनुभव, मनपा आयुत्त, नगरपरिषद मुख्याधिकारी इत्यादी पदांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशित केले जाते.

नामनिर्देशित सदस्यांची पात्रता...
- नगरपालिका रुग्णालयांत वैद्यकीय व्यवसाय कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव
- सामाजिक सेवेचा किमान ५ वर्षे अनुभव
- नगरसेवक म्हणून ५ वर्षांचा अनुभव
- नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून ५ वर्षांचा अनुभव
- कामगार कायद्यांची माहिती व त्या क्षेत्रातील कार्याचा अनुभव (नामनिर्देशित सदस्यांना महापालिकेच्या कामकाजामध्ये सहभाग घेता येतो; मात्र त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो.)

महापौर व उपमहापौर...
- महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो
- महापौर हे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुचविले
- निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात
- दोघांचाही कार्यकाळ प्रत्येकी अडीच वर्षांचा असतो

निवडणूक...
महापालिकेच्या मतदार संघाला वॉर्ड म्हणतात. महापालिकेचे विविध वॉर्ड राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी पाडतात. प्रत्येक वार्डातून प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीच्या आधारावर सदस्यांची निवड करण्यात येते. १९९२-९३ च्या ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार दर ५ वर्षाला महापालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात. एखाद्या सदस्याची जागा रिक्त झाल्यास त्या जागी ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक असते.

राखीव जागा...
निवडणूकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. एससी/एसटीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. ओबीसीला (इतर मागासवर्गीय) 27 टक्के आरक्षण आहे. मात्र, राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व निवडणूका या ओबीसींना दिलेल्या 27 टक्के आरक्षणाविना घ्याव्यात, असा निकाल सर्व सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

महापौरांचे कार्य...
महापौर हे महापालिकेचे कार्यकारी प्रमुख असतात. ते महापालिकेच्या सर्वसाधारण बैठका बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारतात.
महापालिकेच्या कामकाजाची तपासणी करतात.

राजीनामा कुणाकडे देतात...
नगरसेवक हे आपला राजीनामा महापौरांकडे देतात, तर उपमहापौर हे महापौरांकडे, विषय समिती सभापती हे महापौरांकडे आणि महापौर हे महापालिका आयुक्तांकडे राजीनामा सोपवितात.

महापालिका आयुक्तांची निवड...
- केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महापालिका आयुक्तांची निवड करतात
- राज्य शासन त्यांची नियुक्ती करतात

* आयुक्तांचे कामकाज : अंदाजपत्रक तयार करणे, महापालिकेच्या वतीने करार करणे व कराराची माहिती स्थायी समितीला देणे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, महापालिकेच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, असे कामकाज असते.

महापालिकेच्या समित्या...
१) स्थायी समिती
सदस्य संख्या : १२ ते १६
सभापती : सदस्यांपैकी एक
कार्यकाळ : १ वर्ष (सभापती )
बैठक : आठवड्यातून आयुक्त बोलावतात
* स्थायी समितीची कार्य : महापालिकेचे धोरणात्मक निर्णय घेणे, महापालिकेच्या विकासकामांना मान्यता देणे, महापालिकेच्या विविध करांना मान्यता देणे, महापालिकेच्या अर्थसंकल्पास मान्यता देणे, अशी कामे चालतात.
२) शिक्षण समिती
३) प्रभाग समिती
४) कायदा समिती
५) आरोग्य समिती
६) नगर नियोजन समिती
७) परिवहन समिती

महापालिकेच्या उत्पन्नाची साधने...
विविध करांच्या माध्यमातून (घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन कर, योजना कर, जकात कर, बांधकाम कर इ .), तसेच महापालिका आपल्या जमिनीची विक्री करून पैसा उभा करू शकते. राज्य सरकार महापालिकेला विविध विकास कामांसाठी आर्थिक मदत करते.

महापालिकेचे अधिकार व कार्य...
शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वाहतूक व दिवाबत्तीची व्यवस्था करणे, शहराची स्वच्छता राखणे व सांडपाण्याची व्यवस्था करणे, शहरामध्ये शिक्षणाची व्यवस्था करणे, आरोग्य विषयक सोई-सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे, वाचनालये, क्रीडांगणे, उद्याने व नाट्यगृह उभारणे, शहरातील गलिच्छ वस्त्या निर्मूलन व सुधारणा करणे, राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे, शहरातील पर्यावरणाचे संरक्षण करणे अशी आदी कार्य केले जातात.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com