'हिंदुत्व' सिद्ध करण्यासाठीच वाराणसीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra modi }
'हिंदुत्व' सिद्ध करण्यासाठीच वाराणसीची निवड

'हिंदुत्व' सिद्ध करण्यासाठीच वाराणसीची निवड

महेश बर्दापूरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पंतप्रधानांनी हा मतदारसंघ निवडण्यामागं उत्तरेतील हिंदी मतदारांच्या जवळ पोचणं, तसंच भारतातील सर्वांत प्राचीन तीर्थक्षेत्राला निवडून आपल्या धार्मिकतेचा आणि हिंदुत्ववादी असल्याचा पुरावा देण्याचा उद्देश असल्याचे मानलं गेलं. नरेंद्र मोदी गेली आठ वर्षं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत व या कालावधीत त्यांनी तुफान विकासकामं केली आहेत. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाराणसी शहरातील आठपैकी आठ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजय झाल्यानं पंतप्रधानांनी शहराच्या विकास केल्याचं मतदारांना मान्य असल्याचं द्योतक ठरावं.

पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं भेट देण्याचा योग आला. पूर्व उत्तर प्रदेश हा तुलनेनं खूपच मागास भाग. बिहारच्या सीमेला लागून असलेल्या या भागात रस्ते, उद्योग व त्याचबरोबर रोजगाराची वानवा अशी स्थिती होती, ती काही प्रमाणात अद्यापही दिसून येते. मात्र, वाराणसी शहराचा विचार केल्यास प्रगतीची अनेक द्वारं खुली झाल्याची दिसून येतात. मोदी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला लागल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या शहराच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं. भारतातील सर्वांत प्राचीन शहर अशी ओळख असलेल्या वाराणसीचा मध्यभाग अत्यंत छोट्या बोळा, प्रचंड गर्दी, सर्वत्र विजेच्या तारांचे जाळे, रस्त्यांत मोठ्या प्रमाणावर जनावरे अशी स्थिती होती. शहरात भारतभरातूनच नव्हे, तर जगभरातील भक्त व पर्यटक येतात. मोदींनी सर्वप्रथम शहराच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला व गल्ल्यांची डागडुजी व स्वच्छता करण्यात आली. वाराणसी शहरातील सर्व लटकणाऱ्या विजेच्या तारा जमिनीखालून टाकण्यासाठी तब्बल ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली व हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. रस्त्यांवर सर्वत्र नव्याने विजेचे खांब बसवून दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली. मोकाट जनावरांसाठीची योजना राबवून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले. या प्राथमिक कामांमुळं शहराचा चेहरा-मोहरा बदलला. अतिक्रमणे हटविल्यानं बजबजपुरी कमी झाली व शहर नीटनेटकं दिसायला सुरवात झाली.

काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर :
मोदींना त्यानंतर हाती घेतलेला व वाराणसीतून २०१४मध्ये उमेदवारी अर्ज भरतानाच घोषणा केलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर. वाराणसीमध्ये सर्व हिंदू भाविक काशी विश्‍वनाथाचं दर्शन घेण्यासाठी येतात. गंगेमध्ये स्नान करायचं, भाड्यांत, कमंडलूमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि चालत जाऊन काशी विश्‍वनाथाला अभिषेक करणे हा भक्तांचा शिकस्ता. मात्र, गंगेत स्नान केल्यानंतर भाविकांना घाटावरून अनेक घरं व दुकानं ओलांडून चिंचोळ्या गल्ल्यांत काशी विश्‍वनाथाच्या मंदिरापर्यंत जावं लागतं होतं. मोदींनी गंगा नदी ते काशी विश्‍वनाथाचं मंदिर या सुमारे अर्धा किलोमीटर भागाचा विकास करून कॉरिडॉर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. यासाठी तब्बल १४०० दुकाने, घरे व भाडेकरूंना तेथून हटवण्याचं व त्यांचं पुनर्वसन करण्याचं आव्हान होतं. प्रकल्पासाठी व पुनर्वसनासाठी तब्बल ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

स्थानिकांचा विरोध, विरोधकांची टीका, प्राचीन संस्कृतीचा नाश होईल अशी ओरड या सर्व पार्श्‍वभूमीवर मोदींनी प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. सर्व घरं व बोळा जमीनदोस्त करून हा तब्बल ५ लाख स्क्‍वेअर फुटांचा भाग मोकळा केला गेला. या भागात उत्खननाचे काम करताना ४० मंदिरे आढळून आली. या सर्व मंदिरांच्याही जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला. गंगेच्या घाटापासून काशी विश्‍वनाथाच्या मंदिरापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला मंदिरे व मधून विस्तीर्ण असा कॉरिडॉर उभारण्याचं काम सुरू झालं. पंतप्रधान स्वतः या कामावर लक्ष ठेऊन असल्यानं कामानं वेग पकडला व दीड वर्षाच्या कालावधीत हा भव्य कॉरिडॉर उभा राहिला. काशी विश्‍वनाथाच्या मंदिरापर्यंत पोचण्यासाठी चार द्वार उभे करण्यात आले. गंगेत स्नान करून जाणाऱ्या भाविकांना ३०० मीटरचा हा कॉरिडॉर ओलांडून मंदिरापर्यंत पोचता येते. दोन्ही बाजूला भाविकांच्या निवासाची आरामदायी व्यवस्था उभारली गेली. काशी विश्‍वनाथाच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचे पत्रे लावले गेले. इतर सर्व मंदिरांना भव्य स्वरूप दिलं गेलं. आकर्षक रोषणाई करण्यात आल्यानं या मंदिरांचे सौदर्य रात्री अधिकच उजळून निघालं. डिसेंबर २०२१मध्ये या कॉरिडॉरचं पंतप्रधानांच्या हस्ते एक भव्य कार्यक्रमात उद्‍घाटन करण्यात आलं आणि वाराणसीच्या शहराच्या सौदर्यात मोठी भर पडली. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा असलेल्या मनकर्णिका घाटाच्या पुनर्विकासाचं काम नुकतंच हाती घेण्यात आलं आहे. गंगेच्या या घाटावर अंत्यविधी झाल्यानंतर थेट मोक्ष मिळतो, असे भाविकांची श्रद्धा आहेत. त्यामुळं इथं देशभरातून अत्यंसंस्कारासाठी नातेवाईक मृतदेह घेऊन येतात. गेल्या काही वर्षात या घाटावर स्वच्छताचं मोठं काम करण्यात आलं आहे. आता येथील अंत्यसंस्काराची ठिकाणं व घाटाच्या पायऱ्यांच्या नुतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम झाल्यानंतर गंगेच्या स्वच्छता अभिनायात अधिक मदत होण्याची अपेक्षा आहे.

प्रचाराचा मुद्दा :


विधानसभा निवडणुकीच्या काळात वाराणसी शहरातून फिरताना व लोकांशी बोलताना काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरचा उल्लेख अपरिहार्यपणे होत होता. शहरात मोदींच्या समर्थकांची संख्या खूप जास्त असल्यानं त्यांच्या तोंडी कॉरिडॉरचं तोंडभरून कौतुकच होतं. मात्र, काही जण रोजगाराच्या प्रश्‍नावर मोदींबद्दल नाराजी व्यक्त करीत होते. एक लॉजमालक म्हणाला, ‘‘कॉरिडॉरचं काम चांगलंच झालंय, पण विश्‍वेश्‍वराला अभिषेक करून आमचं पोट थोडंच भरणार आहे?’’ रोजगाराच्या प्रश्‍नावर तरुणही काही प्रमाणात नाराज दिसत होते, मात्र विकासकामे, गरिबांसाठी घरे, शहराचं बदललेलं रुप यांमुळं ते मोदींना पाठिंबाही व्यक्त करीत होते. एका तरुणानं मोदींनी साडेचार लाख लोकांना घरं दिली आहेत व एक प्रकारे त्यांनी त्यांच्या रोजगाराचाच प्रश्‍न सोडवला असल्याचा दावा केला. ‘‘नोकरी करून ४०० स्क्वेअर फुटांचं घर घ्यायला या कामगारांना अनेक वर्षं लागली असती व तरीही ते होण्याची शाश्‍वती नव्हती. घर मिळाल्यानं त्यांचा मोठा प्रश्‍न सुटला आहे,’’ असा दावा त्या तरुणानं केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदींची शहरातून मोठा रोड-शो झाला. त्याला शहरात प्रचंड गर्दी झाली होती. त्याबद्दल एका नागरिकाशी बोलताना तो म्हणाला, ‘‘मोदींनी शहराचा विकास केला आहेच, मात्र काही बाबतीत त्यांच्याबद्दल नाराजी आहे. तरीही ज्या मतदारसंघात मोदींचे पाऊल पडंल, तिथं भाजपचाच उमेदवार विजयी होईल. कॉरिडॉरसारख्या कामाबद्दल मोदींचे विरोधकही खासगीत त्यांचं कौतुक करतात.’’ वाराणसीमधील मतदारांचा या विकासकामांना पाठिंबा होता व त्यामुळंच शहरातील आठपैकी आठ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजय झाले. मोदी या शहराचा भविष्यात आणखी विकास करतील रोजगारासारखे प्रश्‍न मोदींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नक्की सोडवतील, असा विश्‍वासही या मतदारांना होता. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्यानं लोकांची ही इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

विमानतळ - ३ तासांवरून ३० मिनिटांवर


वाराणसी छोटे रस्ते आणि वाहतुकीच्या कोंडीसाठी कुख्यात आहे. त्यात शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विमानतळापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना तीन तास राखून ठेवावे लागत होते. मोदींनी शहरापासून विमानतळापर्यंत सहा मार्गिकेचा एलिव्हेटेड रस्त्याचे काम हाती घेतलं व ते अल्पावधीत पूर्ण केलं. त्यामुळं आता गावातून विमानतळापर्यंत जाण्यासाठी ३० ते ३५ मिनिटं पुरेसे होतात. मात्र, निवडणुकीच्या काळात मोठ्या सभा आणि रोड-शोमुळं अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळंच हॉटेलच्या मॅनेजरनं तीन तास आधी निघण्याचा सल्ला दिला!

गंगा मैली की स्वच्छ?
देशातील सर्वांत पवित्र नदी गंगेच्या स्वच्छतेसाठी आधीच्या सरकारांनी व मोदी सरकारनेही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरचं उद्‍घाटन केल्यानंत स्वतः पंतप्रधानांनी गंगेत डुबकी घेत गंगा स्वच्छ असल्याचा संदेश देण्याच प्रयत्न केला. वाराणसीमध्ये गंगेचं पात्र तुलनेनं स्वच्छ दिसतंही, मात्र गंगेत अद्याप अनेक सांडपाण्याचे नाले येऊन मिसळत असल्याचं बनासर हिंदू विद्यापीठातील प्रोफेसर व संशोधक डॉ. दयाशंकर त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘‘गंगेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे, मात्र ती पूर्ण स्वच्छ झाली आहे आणि तिचं पाणी पिण्यायोग्य आहे, असं म्हणता येणार नाही. माझ्यामते गंगा केवळ २० टक्के स्वच्छ झाली आहे. गंगेत मिसळणारे अनेक नाले बंद करण्याची गरज आहे. त्याचबरोबर वरील बाजूच्या धरणांतून अधिक प्रमाणावर पाणी सोडल्यास गंगा स्वच्छ होण्यास मदत होईल.’’