भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय!}
भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय!

भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय!


काही काळ बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांपुरते मर्यादित असलेल्या भोजपुरी चित्रपटांना आता देशाच्या विविध भागांतून पसंत मिळू लागली आहे. या चित्रपटांतील गाण्यांचाही प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीची उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात भोजपुरी चित्रपट यशस्वी होत आहेत. मात्र, या चित्रपटांनी सध्या अश्लीलतेचा कळस गाठला आहे.

भोजपुरी सिनेमाचा इतिहास (History of Bhojpuri Cinema)


उत्तर प्रदेश व बिहारच्या सीमावर्ती भागात असलेल्या गाजीपूर येथील नजीर हुसैन यांनी बिमल रॉय यांच्या ‘दोन बीघा जमीन’ या हिंदी सिनेमाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटाने बॉलीवुडमध्ये चांगले यश मिळवले. त्यानंतर भोजपुरी भाषेत सिनेमा बनविण्याचे स्वप्न नजीर यांनी पाहिले. यातून त्यांनी ‘गंगा मईया तोहे पियरी चढइबो’ या भोजपुरी सिनेमाची पटकथा लिहिली. या सिनेमाच्या निर्मितीसाठी नजीर हे रॉय यांच्याकडे गेले. रॉय यांना ही कथा खूप आवडली. परंतु, त्यांनी तो सिनेमा हिंदीमध्ये बनविण्याचा प्रस्ताव नजीर यांच्यासमोर मांडला. मात्र, भोजपुरी भाषेच्या अस्मिता असलेल्या नजीर यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर नजीर यांनी मुंबईतील निर्मात्यांना या सिनेमाच्या निर्मितीसाठी साद घातली. मात्र, मुंबईतील निर्मात्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कोयला व्यासायी आणि सिनेमा थियटरचे मालक विश्वनाथ प्रसाद शाहाबादी हे या या सिनेमासाठी पैसे लावण्यास तयार झाले. त्यानंतर बनारस येथील कुंदन शाह यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. या सिनेमाचे बजट सुरुवातीला दीड लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र, तो पूर्ण होईपर्यंत त्याचा खर्च पाच लाखांच्या घरात गेला. बनारस येथील कुमकूम आणि असीम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. त्यानंतर सन १९६३ मध्ये भोजपुरीत पहिला सिनेमा ‘गंगा मईया तोहे पियरी चढइबो’ हा प्रदर्शित झाला आणि नजीर यांचे स्वप्न प्रत्येक्षात उतरले. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने ८० लाख रुपयांची कमाई केली.

हेही वाचा: ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

भोजपुरी सिनेमा व राजकारण (Bhojpuri Cinema and Politics)


या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर राजकारणाच्या पटलावर अनेक अभिनेत्यांनी आपले नशीब अजमावले. त्यातील काहींना यश मिळाले, तर काही अपयशी ठरले. सध्या दिल्लीतून लोकसभेचे खासदार आसलेल्या मनोज तिवारी यांनी २००९ मध्ये गोरखपूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होतो. त्यानंतर ते
दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर ते पुन्हा २०१९मध्ये दिल्लीतून खासदार झाले. रवी किशन यांनी २०१९ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजय झाले. मात्र, दिनेश लाल यादव (निरहुआ) यांना अझमगडमधून सपाच्या अखिलेश यादव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.


काळानुसार बदलला भोजुपरी सिनेमा (Bhojpuri cinema has changed over time)


देशात हिंदी चित्रपटाच्या तुलनेत प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना दुय्यम स्थान आहे. कारण त्यांचा प्रेक्षक वर्ग मर्यादित आहे. मराठी, गुजराथी, बंगाली चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र, भोजपुरी सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटांतून बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यातील समस्या, ज्वलंत प्रश्न व कुप्रथा मांडण्याचा प्रयत्न गेल्या काळात झाला. मध्यंतरी देशभक्तिपर सिनेमाही या इंडस्ट्रीजने दिले आणि प्रेक्षकांनी ते अक्षरक्ष: डोक्यावर घेतले. पटना टु पाकिस्तान, दूध मांगोगे तो खीर देंगे आणि शेर-ए-हिंदुस्तान, हे चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहेत. कमी बजेटमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील, असे चित्रपट देण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून होत आहे. निर्माते स्थानिक असल्याने प्रेक्षकांची अभिरुची त्यांना माहीत आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ॲक्शन सिनेमांच्या निर्मितीचे सध्या या इंडस्ट्रीजमध्ये फॅड आहे.

हेही वाचा: अमिताभ बच्चन : सहस्र आविष्कारांचा महानायक


ॲटम साँग आणि अश्लीलतेचा अतिरेक (Atom song and an excess of obscenity)


नजीर हुसैन यांनी उद्दात हेतू ठेऊन भोजपुरी सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, नजीकच्या काळात निर्मात्यांकडून नजीर यांच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून अश्लिलतेशिवाय चित्रपट लोकप्रिय होत नाही असा त्यांचा समज झाला आहे. ‘गोरी तोर चुनरी’ ‘जवानी की रेल कही छूट ना जाए’ ‘आवारा बलम’ व ‘सैंयाजी दगाबाज’ या सिनेमांची नावे पाहिली, तरी चित्रपटात काय असेल यांची कल्पना येते. चित्रपट हिट करण्याच्या नादात ॲटम साँगचा सध्या अतिरेक सुरु आहे. एक काळी ‘गवनवा लईजा राजा जी’ हे गाणे सुपरहिट झाले होते. मात्र, आता सैयां, लहंगा, रिमोट, ॲटमबॉम्ब, चुम्मा आदींच्या पुढे गाण्यांचे बोल सरकताना दिसत नाही. अश्लिलतेच्या अतिरेकामुळे भोजपुरीतील अनेक चित्रपटांना भारतीय सेंसर बोर्डाद्वारे ‘A’ (केवळ अठरा वर्षांच्या पुढील प्रेक्षक) ग्रेड दिलेली असते. पूर्वी भोजपुरी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सहपरिवार चित्रपटगृहांमध्ये येत. परंतु, आता या चित्रपटांतील कंटेंट आणि अश्लिलतेच्या सर्व सीमा पार केल्याने चित्रपटगृहांमध्ये सहपरिवार येण्याचे प्रेक्षक टाळत आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये महिला प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

हेही वाचा: अप्पू: द रिअल हिरो...पुनीत राजकुमार!

भोजपुरीचे सुपरस्टार


१) मनोज तिवारी :

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुसुरा बडा पैसेवाला’ या चित्रपटातून तिवारी लोकप्रिय झाले. त्यांनी विविध चित्रपटात अभिनय केला असून गायक व संगीत क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. जन्म जन्म के साथ, धरती कहे पुकार के, देवरा भईल दीवाना, हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत.


२) रवी किशन :

यांना भोजपुरी चित्रपट सृष्टीतील धमेंन्द्र मानले जाते. त्यांनी दाक्षीणात्य चित्रपटांतही काम केले आहे. भोजपुरीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. ‘पंडित जी बताई, ना बियाह कब होई’ हा त्यांचा पहिला भोजपुरी चित्रपट. दुल्हा मिलल दिलदार, देवरा बडा सतावेला, हे त्यांचे विशेष लोकप्रिय चित्रपट आहेत.


३)दिनेश लाला यादव (निरहुआ):

भोजपुरीतील महागड्या अभिनेत्यांच्या यादीत दिनेश लाला यादवचे नाव आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये त्याचे लाखो चहाते असून त्याला भोजपुरी इंडस्ट्रीजमधील रजनीकांत म्हटले जाते. निरहुआ रिक्षावाला, निरहुआ चलल ससुराल, जिगरवाला आणि पटना टु पाकिस्तान हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.


४) खेसारी लाल यादव :

भोजपुरी सिनेमात येण्यापूर्वी खेसारी लाल यादव गायक क्षेत्रात कार्यरत होता. साजन चले, सुसुराल, लहु के दो रंग, सपूत आणि दूध का कर्ज, या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पंसती मिळाली.


५) पवन सिंह :

भोजपुरी इंडस्ट्रीजमधील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून पवन सिंह प्रसिद्ध आहे. ‘लॉलीपॉप लागेलू’ हे त्यांचे गाणे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. रंग ली चुनरिया तेरे नाम, प्रतिज्ञा, चोरवा बनल दामाद, सुहाग आदी त्याचे हीट चित्रपट आहेत.

अभिनेत्री


१) आम्रपाली दुबे :

‘निरहुआ हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आम्रपाली प्रसिद्धीच्या झोतात आली. विविध चित्रपटांतून निरहुआ-आम्रपाली यांची जोडी खूप गाजली. तिने काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पवनसिंह बरोबर असलेला ‘राते दिया बुताके’ हा तिचा सुपरहिट चित्रपट. निरहुआ बरोबर तिने वीसपेक्षा जास्त चित्रपटांत काम केले असून त्यातील बहुतांशी सुपरहिट ठरले आहेत.


२) राणी चटर्जी :

राणीचे खरे नाव सबीहा शेख असू २००३ मध्ये तिने भोजपुरी चित्रपटांत पदार्पण केले. ससुरा बडा पैसावाला, सीता, देवरा बडा सतावेल आणि रानी नंबर ७८६, या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘खतरो के खिलाडी’ हा तिचा विशेष गाजलेला चित्रपट आहे.


३) मोनालिसा :

अंतरा बिस्वास हे मोनालिसाचे खरे नाव आहे. तिने भोजपुरीसह बंगाली, ओडिया, तमीळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांतही काम केले आहे. २०१६ मध्ये ती ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभागी झाली होती.


४) काजल राघवानी :

‘सुगना’ या चित्रपटातून काजलने २०११ मध्ये भोजपुरी सिनेमात पदार्पण केले. आशिक आवारा, पाटना टु पाकिस्तान, हुकूमत, भोजपुरीया राजा, मेंहदी लगाके रखना, मैं सहरा बांध के आऊंगा आदी चित्रपटात तिने काम केले.


५) अंजना सिंह :

भोजपुरीच्या अनेक चित्रपटांत अंजलीने काम केले असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ‘सैंयाजी दगाबाज’ हा तिचा विशेष गाजलेला चित्रपट.

हेही वाचा: पुण्याच्या अनुष्काचं संगीत क्षेत्रात दमदार आगमन

भोजपुरीतील महागडे चित्रपट


१) वीर योद्धा महाबली :

भोजपुरी अभिनेता निरहूआ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वीर योद्धा महाबली’ हा चित्रपट या इंडस्ट्रीजमधील सर्वांत महागडा चित्रपट असून त्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा खर्च आला. भारतातच नाही तर विदेशात देखील या चित्रपटाने नाव कमवले. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एक भव्य सेट उभारण्यात आला होता. भोजपुरीसह हिंदी, तमीळ, आणि तेलगू या भाषेंमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित झाला.


२) निरहुआ चलल लंदन :

भोजपुरीमधील दुसरा महागडा असलेला ‘निरहुआ चलल लंदन’ हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआ याने प्रमुख भूमिका साकारली असून त्यासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च आला. या चित्रपटाचे शूटिंग लंडनसह युरोपातील पाच देशांमध्ये झाले.

३) मैं सेहरा बांध के आऊंगा :

अभिनेता खेसारी लाल यादव यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या इंडस्ट्रीजमधील हा तिसरी महागडा चित्रपट ठरला असून त्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च आला. उत्तराखंड राज्यातील खैरी या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top