
- अंजली काचळे
आज कुठे कुस्तीला चांगले दिवस येऊ लागले होते. गावोगावी लाख-दोन लाख बक्षिसांच्या कुस्त्या रंगत होत्या. पण या कोरोनाने एकजात सारेच पहिलवान चितपट करून टाकलेत. जत्रा नाहीत की यात्रा नाही. त्यामुळे दरवर्षी भरणारे मोठमोठे कुस्त्यांचे आखाडेही नाहीत. वर्षभर तालमीत घाम गाळून, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महिना किमान २० ते २५ हजार रुपये खर्चून घडवलेली पिळदार शरीरे आजमावण्याची संधीही नाही. अशा विदारक परिस्थितीत सराव पुढे चालू ठेवण्यासाठी, खुरकासाठीचे हक्काचे उत्पन्न पूर्णपणे आटल्यामुळे पैलवानांना तालमी सोडून आपापल्या गावी परतावे लागले.
नकळत्या वयातच कुस्तीकडे आकृष्ट होऊन, दररोजच्या सरावात उच्च- शिक्षण व व्यावसायिक शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष हे रखरखीत वास्तव आहे. त्यामुळे 'कुस्ती हेच जीवन' मानणाऱ्या या कष्टकऱ्यांची 'कुस्ती नाही तर मग काय?' या प्रश्नावर उत्तरादाखल शून्यात हरवलेली मुद्रा खूप काही सांगून जाते. मग यांच्या कडे कुठला पर्याय नसताना स्वतःच, स्वतःच्या कुटुंबाच पोट कस भरायचं, इतर जबाबदाऱ्या कश्या पार पाडायच्या हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. या सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे कला गुण दाखवायची संधी मिळतेच असेही नाही.
ग्रामीण भागात प्रत्येक यात्रेत कुस्तीचा आखाडा भरतो. गावातील लोक अगदी आनंदाने या सामन्यांची वाट पाहत असतात. सोबतच पहिलवानही आतुरतेने वाट पाहतात. वाट पाहतात या साठी कारण मेहनतीने घडवलेली पीळदार शरीरे आजमावण्यासाठी संधी यांना मिळते. वाट पाहतात या साठी की स्वतःच्या खुराका साठीचे पैसे तरी त्यांना मिळावे. पण पूर्ण वर्ष या तुटपुंज्या उत्पनावर कसे चालेल
'गरिबा घरी मर्दुमकी नांदते' या शंकर (अण्णा) पुजारींच्या धगधगत्या शैलीतील सूत्रसंचालनात कुस्तीची सद्यस्थिती चपखलपणे मांडली गेली आहे. हे शंकर (अण्णा )बोलू लागले की कान फक्त त्यांचेच एकतात आणि डोळे फक्त कुस्ती पाहतात. कुस्तीशौकिनांच अगदी परिचित नाव!
मुकी कुस्ती बोलकी करणारे जेष्ठ कुस्ती निवेदक पै.शंकर (आण्णा )पुजारी कोथळीकर
गेल्या दोन तीन दशकापासून अण्णांनी आपल्या कुस्तीमधील पहाडी आवाजातून, कुस्ती मैदानाचे लाईव्ह वर्णन करत कुस्ती शौकिनांच्या हृदयावरती कुस्ती कॉमेंट्री च्या माध्यमातून अधिराज्य केले. पुरातन काळापासून जोपासत आलेल्या आपल्या रांगड्या कुस्ती खेळाला आपल्या रांगड्या पहाडी आवाजाने कुस्तीशौकिनांना मंत्रमुग्ध केले. आजच्या जमान्यात कुस्ती मैदानामध्ये अजूनही प्रेक्षकवर्ग तास-तास थांबतो, या संपूर्ण गोष्टीचं श्रेय जातं ते म्हणजे ज्येष्ठ कुस्ती समालोचक श्री. शंकर पुजारी (अण्णा) कोथळीकर यांना.
आपल्या देशाचा स्वातंत्र्य पूर्व काळ कुस्तीसाठी भरभराटीचा होता. कारण त्या काळात प्रत्येक संस्थान कडून कुस्तीला चालना मिळत होती,प्रोत्साहन मिळत होते. तिला राजाश्रय दिला गेला होता. मात्र स्वातंत्र्य मिळाल्या नंतर तीच संस्थाने खालसा झाली आणि कालानुरूपाने कुस्तीला मरगळ येऊ लागली. कुस्ती मैदाने ओस पडू लागली आणि त्या मरगळ आलेल्या कुस्तीला कॉमेंट्री ( निवेदक) मार्फत तिला चालना देण्यासाठी तिला बोलकी करण्यासाठी पै.शंकर (आण्णा )पुजारी यांनी पुढाकार घेतला. कॉमेंट्रीच्या माध्यमातून मुकी कुस्ती बोलकी झाली..!
पै.शंकर (आण्णा )पुजारी हे एक चांगले कुस्ती पट्टू होते परंतु घरी हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्र भर दुष्काळ पडल्यामुळे त्यांना कुस्ती नाविलाज सोडावी लागली. थोड्या वर्षांनी त्यांनी क्रिकेट ची रेडिओ वरील कॉमेंट्री ऐकून जशी क्रिकेट कॉमेंट्री असते, तशी कुस्तीला पण १९८०-८५ च्या दशकात चालू केली. मैदानामध्ये कोण पैलवान कुठल्या गावचा,त्याचा वस्ताद कोण आहे आणि तो कोणता डाव टाकतो आहे त्याचा हुकमी डाव कोणता आहे, आता पर्यंत तो कुठली मैदान जिंकून आलेला आहे याची माहिती ते देत राहिले त्यामुळे तिला एक ग्लॅमर लूक आला आला होता, त्यामुळे कुस्तीतील दुरावलेली माणसे परत त्यांची तोंडे कुस्तीकडे वळायला लागली.
या महाराष्ट्राच्या मातीने कमाल ताकतीचे अजोड मल्ल तयार केले. काही अपवाद वगळता या मल्लांची पार्श्वभूमी अत्यंत हालाखीची. हिंद केसरी मारुती माने यांच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन फक्त अडीच एकर कोडवाहू शेती. त्यात त्यांच्यासह तीन भाऊ! आताच्या पिढीतले किरण भगत असो कि सिकंदर शेख यांची परिस्थितीही तशीच. बर या परिस्थितीशी दोन हात करून, आभाळा एवढे कष्ट उपसूनही कोरोना मुळे पदरी पडली ती केवळ निराशाच.
पुण्यातील निंबाळकर तालीम असो, कुंजीर तालीम असो की नवी पेठ तालीम असो, इथल्या हौदामधील मातीही घामाविना आता कोरडी पडू लागली आहे. शाहू महाराजांच्या काळात राजाश्रय लाभलेली कुस्ती आणि पैलवान आज सरकारकडे आशेने बघत आहेत.
कोरोनामुळे अत्यंत हालाखीची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये विविध स्तरातील, विविध घटकातील अनेक लोकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागले. त्रास सहन करावा लागला. मग ते पैलवान असोत व्यवसायिक असोत, मोठं मोठे कलाकार असो की सामान्य माणूस. अगदी प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला या कोरोनाची झळ बसली. अनेकांची घरे उजाडली गेली. अगदी कधीच कोणी असा विचार केला नसेल अशा काही गोष्टी या काळात होऊन गेल्या
ओसाड पडलेल्या तालमी पुन्हा धुसमुसतीलही, पैलवानांनी काढलेल्या पटाचे खणखणीत आवाजही घुमतील, पण सरकारने आजघडीला पैलवानांच्या अर्थाजनासाठी काही तरतुदी करुन या उज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या मैदानी खेळाला तारावेच लागेल.
काय करायची शंभर पोरं अन गावाम्होरं',' चार चमचे तेल - तूप दिव्यात कमी घाला, पण पोरांच्या वाट्याला येऊ द्या' कुस्तिशौकिनही आतुरलेत शंकरअण्णांच्या खास ठेवणीतले हे परवलीचे शब्द ऐकायला!