
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
प्रशांत केणी, वरिष्ठ क्रीडा पत्रकार
भारताला १९५२मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक (कांस्य) जिंकून देण्याचा मान जसा महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांना जातो, तसा पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले पदकही (सुवर्ण) महाराष्ट्राच्याच सुपुत्राने मिळवले आहे. १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात जखमी झालेल्या मुरलीकांत पेटकर या सैनिकाने १९७२च्या पॅरालिम्पिकमध्ये जलतरणात हा पराक्रम गाजवला होता. आज ‘त्या’ यशाला पन्नास वर्षे उलटली तरीही अपंग व्यक्तीला क्रीडापटू म्हणून कारकीर्द घडवणे आव्हानात्मक असल्याची खंत पेटकर मांडतात.
पेटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ला सांगलीच्या इस्लामपूर भागातील पेठ गावी एका गरीब कुटुंबात झाला. टेलरिंगचा व्यवसाय करणारे त्यांचे वडील हे स्वातंत्र्यसैनिक होते. बालपणी पेटकर यांना कुस्तीची आवड होती.
दुहेरी महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या आखाड्यात त्यांनी मल्लविद्येचे धडे गिरवले. याचप्रमाणे हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू हे खेळसुद्धा आवडीने खेळायचे. खेळाद्वारे कमावलेल्या शरीरयष्टीमुळे ते सैन्यात युद्धसामुग्रीशी निगडीत तांत्रिक विभागात दाखल झाले.
सैन्यात सामील झालेल्या पेटकर यांच्या आयुष्यातील दोन घटना देशासाठी महत्त्वाच्या ठरल्या. एक म्हणजे भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना लागलेली गोळी आणि दुसरी म्हणजे हीडेलबर्गच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक.
पेटकर बॉक्सिंगसुद्धा खेळायचे. टोकियो (जपान) येथे १९६४मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सेनादल क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. या स्पर्धेहून परतल्यानंतर त्यांची सिकंदराबाद येथे बदली करण्यात आली.
येथील कमांडंटने त्यांच्या चमकदार कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून कुठे जाणार? असा प्रश्न विचारला. पेटकर ‘‘काश्मीर’’ असे उत्तरले आणि त्यांच्या अपेक्षेनुसार व्यवस्था केली गेली. परंतु आयुष्य कोणत्या क्षणी कोणते वळण घेईल, याची कुणालाच कल्पना नसते.
त्या काळात काश्मीरला ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे संबोधले जायचे. गुरखा रेजिमेंटच्या जवानांनी सेलिब्रेटी बॉक्सिंगपटू पेटकर यांना गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगरची सफर घडवली. पण या दौऱ्याच्या दहाव्या दिवशी दुपारी तीन वाजता सायरन वाजू लागले. पण त्याचा अर्थ लागण्यास त्यांना उशीर झाला.
सेनादलाच्या छावणीवर पाकिस्तानकडून अचानक हवाई हल्ला करण्यात आला. त्या घटनेबाबत पेटकर म्हणाले, ‘‘दुपारी चहासाठी आम्ही छावणीबाहेर पडलो होतो, तेव्हाच पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याचे सैनिकी संकेत मिळाले. आम्ही घाईने परतीसाठी निघालो.
परंतु हल्ल्याला प्रारंभ झाला होता. सर्वत्र बॉम्बवर्षाव आणि रक्तपात दिसत होता. दलाचे प्रमुख हवालदार गुरुंग थापा यांनी त्वरित सैन्याला प्रतिहल्ल्यासाठी सज्जतेचा इशारा दिला.
आम्ही गोळीबाराला प्रारंभ केला. पहिली रात्र अशी आव्हानात्मक होती. आमचा दारूगोळा संपत आल्याची खात्री झाली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने अधिक ताकदीने हल्ला चढवला.
हवाई गोळीबारात नऊ गोळ्या मी झेलल्या. यापैकी एक गोळी आजसुद्धा माझ्या मणक्यात आहे. या हल्ल्यामुळे मी खंदकातून रस्त्यावर फेकला गेलो.
या रस्त्यावरून वेगाने जाणारी एक जीप माझ्या पायावरून गेली. त्यानंतर मी १७ महिने कोमात होतो. स्मृतिभ्रंशामुळे मला माझे नावही आठवत नव्हते. यातून मी सावरलो. परंतु आयुष्यभराचे अपंगत्व माझ्या वाट्याला आले.’’
पेटकर यांच्यावर मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी या नौदलाच्या इस्पितळात उपचार करण्यात आले. त्यावेळी दुखापतींतून सावरण्यासाठी जलतरण करावे, असा सल्ला फिजिओथेरपिस्टने त्यांना दिला.
जीवनाच्या प्रवासातील या दुसऱ्या डावाला ते आत्मविश्वासाने सामोरे गेले. परिस्थितीने ओढवलेल्या संकटामुळे डगमगून न जाता त्यांनी आपली खेळातली आवड जोपासली.
‘‘एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आले की त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची आपल्या देशातील मानसिकता आहे. परंतु सैन्यातील सहकाऱ्यांचे मानसिक सामर्थ्य माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. ते मला जलतरणाच्या सरावाला न्यायचे आणि पुन्हा आणून सोडायचे,’’ असे पेटकर यांनी सांगितले. याचप्रमाणे भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजी या खेळांमध्येही पेटकर पारंगत झाले.
पेटकर यांनी १९६८च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक आणि नौकानयन या क्रीडा प्रकारांत सहभागी होत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण पदकाने त्यांना हुलकावणी दिली. अपंग क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा प्रथमच पाहून पेटकर यांच्यासह अन्य क्रीडापटूंना आश्चर्य वाटले. ‘‘आतापर्यंत आम्ही हे सारे टीव्हीवरच पाहिले होते. पण प्रत्यक्ष जेव्हा पाहिले, तेव्हा सर्वच जण भारावून गेलो. तोवर अपंग क्रीडापटूंसाठीचे तरण तलाव, उत्तम व्हिलचेअर्स यांची आम्हाला काहीच माहिती नव्हती. त्या काळात अपंग क्रीडापटूंना कोणत्याच स्तरावर पुरेसे पाठबळ नव्हते,’’ हे वास्तव पेटकर यांनी मांडले.
१९७०च्या एडिनबर्ग (स्कॉटलंड) राष्ट्रकुल पॅराप्लेजिक क्रीडा स्पर्धेतील ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पेटकर यांनी सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
पुढील लक्ष्य स्वाभाविकपणे १९७२च्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचे होते. पण पैशाची तजवीज होत नव्हती. परिणामी जर्मनीला जाणे रद्द करावे लागणार होते. परंतु सेनादल, भारताचे माजी क्रिकेट कर्णधार विजय मर्चंट, टाटा मोटर्स, टेल्को आणि रोटरी क्लब हे मदतीसाठी धावून आले. त्यामुळे पेटकर यांना पॅरालिम्पिक स्पर्धेला पोहोचता आले.
त्यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पेटकर यांनी ३७.३३ सेकंदांची वेळ नोंदवून विश्वविक्रमसुद्धा साकारला आणि सुवर्णपदकावरही नाव कोरले. ‘‘अंतिम फेरी आव्हानात्मक होती. पण मला पदकाची खात्री होती. या यशानंतर माझे आयुष्य पालटले. अनेक बक्षिसे आणि रोख इनाम मला मिळाले. आधुनिक व्हिलचेअरसुद्धा मला बक्षीसस्वरूपातच मिळाली,’’ असे पेटकर यांनी सांगितले.
याच वर्षी पेटकर यांनी पुण्यात टेल्को कंपनीत कँटिन सुपरव्हायजर म्हणून नोकरी स्वीकारली. १९७५मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार दिला. मात्र खेलरत्न किंवा अर्जुन पुरस्काराने त्यांना बरीच वर्षे हुलकावणी दिली.
अखेरीस पुरस्कारासाठी प्रयत्न न करण्याचे त्यांनी ठरवले. पण २०१८मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री हा देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान केला. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.
‘‘पॅरालिम्पिकपटूंच्या प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधांची वाणवा आहे. पण अपंग क्रीडापटूंना घडवण्यासाठी आपल्या देशात सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
पुणे, चंदिगढ, मुंबई अशा काही शहरांमध्ये अपंग क्रीडापटूंना प्रशिक्षणासाठी काही प्रमाणात व्यवस्था आहे. मात्र याकरिता चांगल्या अकादमी तयार होण्याची आवश्यकता आहे.
गो-स्पोर्ट्ससारख्या अनेक संस्थासुद्धा आता क्रीडापटूंकरिता उत्तम कार्य करीत आहेत,’’ अशा शब्दांत पेटकर यांनी सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकला.
आज पॅरालिम्पिकमध्ये भारताचे क्रीडापटू यशोपताका फडकावत आहेत. पण या सुवर्णाध्यायाला प्रारंभ करणाऱ्या पेटकर यांची कथा प्रेरणादायी आहे, तर मांडलेली व्यथासुद्धा वास्तवदर्शी आहे. करेज बियाँड कम्पेअर (संजय शर्मा, मेडिनी शर्मा), बॉइज विल बि बॉइज (अपर्णा जैन), प्रवास वादळातील दिव्यांचा (शारदा गायकवाड), गो : इंडियाज स्पोर्टिंग ट्रान्सफॉर्मेशन (नंदन कामत, अपर्णा रामचंद्रन), संकल्प से सिद्धी तक (विनय जैस्वाल), रिडिंग लिटरसी (सीबीएससी अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक) अशा अनेक पुस्तकांमध्ये त्यांचे कथानक रेखाटण्यात आले आहे.