Rahul Dravid Unsuccessful Coach: द वॉल ढासळतेय का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravin Failed }

Rahul Dravid Unsuccessful Coach: द वॉल ढासळतेय का?

प्रशांत केणी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे कळल्यावर सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण आपल्या कारकीर्दीत 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा द्रविड प्रशिक्षक म्हणून आधाराची भिंत होऊ शकला नाही.

प्रत्यक्षात द्रविडचं चुकतंच चाललं आहे, एकामागोमाग एक पराभवांना भारत सामोरा जात आहे. सध्या भारताच्या ‘अपयशपर्वात’ द्रविड यांची हकालपट्टी करण्यात यावी, ही मागणी तीव्रतेनं होऊ लागली आहे.

प्रशिक्षक द्रविडचा उदय

२०१२मध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर द्रविडनं २०१४मध्ये राजस्थान रॉयल्सच्या प्रेरक (मेंटॉर) पदाची सूत्रं स्वीकारली. याच वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, तेव्हा या संघाचा तो प्रेरक होता. राजस्थाननं २०१५च्या ‘आयपीएल’ हंगामात तिसरं स्थान मिळवलं.

त्यानंतर भारताचा ‘अ’ संघ आणि १९ वर्षांखालील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली. द्रविडची यशोमालिका लक्षवेधी ठरत होती. भारताच्या १९ वर्षांखालील संघानं २०१६चं उपविजेतेपद पटकावलं, तर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपदाला गवसणी घातली.

भारताच्या भावी पिढीचे शिलेदार घडवण्याचं श्रेय द्रविडला मिळू लागलं. ऋषभ पंत, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, आदी अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्षितिजावर चमू लागले. दिल्ली डेअरडेव्हिल्ससह काही ‘आयपीएल’ संघांचं मार्गदर्शनही द्रविडकडून सुरू होतं.

भारताच्या कनिष्ठ संघांच्या प्रशिक्षकपदाचा चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जुलै २०१९मध्ये द्रविड यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं प्रमुखपद सोपवण्यात आलं.

खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण, सराव आणि दिशादर्शन ही त्यांच्या पदाची प्रमुख वैशिष्ट्यं होती.

भारताच्या वरिष्ठ संघाला गुणी खेळाडूंची रसद पुरवतानाच खेळाडूंची तंदुरुस्ती आणि दुखापतग्रस्त खेळाडूंचं पुनर्वसन हे द्रविडचं कार्य प्रशंसनीय होतं.

त्यामुळेच नोव्हेंबर २०२१मध्ये रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आपसुकच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविड विराजमान झाला.

याआधीच्या वर्षांतली कामगिरी आणि दृष्टीकोन तसंच सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष असल्यामुळे द्रविडची नेमणूक झाली.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

करिअर आलेखातील चढ-उतार

द्रविडच्या प्रशिक्षक कार्यकाळाची सुरुवात छान झाली. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मायदेशातील मालिकांमध्ये भारतानं उत्तम कामगिरी केली.

परंतु देशाची सीमारेषा ओलांडल्यानंतर द्रविडचा खरा कस लागू लागला. इंग्लंडमधील प्रलंबित एकमेव कसोटी सामना भारतानं सुस्थितीतून गमावला.

त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ झगडताना आढळला, तर ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं मानहानीकारक पराभव पत्करला.

मग बांगलादेशमधील एकदिवसीय मालिकेत तरी किमान भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल, अशी आशा होती. पण पहिल्या दोन सामन्यांमधील दयनीय पराभवांमुळे ती मावळली.

अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इशानचं वादळी द्विशतक आणि दिमाखदार विजय मिळवला तरी एकंदर कामगिरी ही भारताच्या प्रतिष्ठेला साजेशी मुळीच नव्हती.

द्रविडप्रमाणेच रोहित शर्माच्या फलंदाजी आणि नेतृत्वामधील उणिवा समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या अपयशाचं खापर दोघांवरही फोडलं जात आहे.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयश

भारतीय संघाचं सांघिक सामर्थ्य दिसून येत नसल्याचं सिद्ध होत आहे. २००७च्या भारताच्या विश्वविजेतेपदातील द्रविडचं योगदान सर्वात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे त्यानं सर्व वरिष्ठांना ट्वेन्टी-२० हे युवकांचं क्रिकेट असल्याचं समजावून त्यांना संघापासून दूर ठेवलं.

त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं इतिहास घडवला. पण ट्वेन्टी-२०ची संघनिवड करताना द्रविडनं वरिष्ठांबाबत ते धोरण राबवलं नाही. वर्षभरात ३५हून अधिक खेळाडूंची चाचपणी करून अंतिम १४ वीर निवडले.

त्यामुळेच मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांचं प्रशिक्षकपद द्रविडकडून काढून घेण्यात यावं, ही मागणी जोर धरू लागली. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची संघरचना काय असेल, याची द्रविड आणि रोहितलाही खात्री नव्हती. त्याचेच परिणाम भोगावे लागले.

परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दमदार सलामी नोंदवल्यानंतर काही दुबळ्या संघांविरुद्ध भारतानं मर्दुमकी गाजवली. परंतु दोन मोठ्या संघांविरुद्ध ही मात्रा अयशस्वी ठरली.

पर्थला दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढे भारताने हाराकिरी पत्करली, तर अ‍ॅडलेडच्या उपांत्य फेरीत इंग्लंडनं भारताच्या वाटचालीपुढे पूर्णविराम दिला.

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकवर विश्वास व्यक्त करण्यात आला, तर नंतरच्या सामन्यांत सूर हरवलेल्या ऋषभ पंतला खेळवण्यात आलं.

इतकंच नव्हे, तर फिरकी फळीत यजुर्वेंद्र चहलला डावलून रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलला खेळवण्याचा निर्णय फोल ठरला.

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पहिल्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघानं सपाटून मार खाल्ला. पुन्हा योग्य संघरचना भारताला साकारता आली नाही.

फलंदाजीच्या क्रमातील अनिश्चितता हे भारताच्या सामन्यात नेहमीचंच. पंत कधी सलामीला उतरायचा, तर कधी कोणत्याही क्रमांकावर. दीपक हुडानंही सलामी, तिसरं स्थान ते मधली फळी असे क्रम हाताळले.

सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर उतरायचा. हार्दिक पंड्याचा क्रमसुद्धा अनेकदा बदलला जायचा. या क्रमबदलांमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम व्हायचा.

हेही वाचा: प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

अडचणीचे मुद्दे

विश्रांतीच्या धोरणात कोणतीही सुसूत्रात नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे संघातील खेळाडूंचा सांघिक समन्वयच होऊ शकला नाही.

ताजंच उदाहरण द्यायचं, तर रोहित, विराट कोहली आणि केएल राहुल यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती दिली गेली. परंतु बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांना संघात स्थान देण्यात आलं.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी द्रविडनंही विश्रांती घेतल्यानं व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली. बांगलादेश दौऱ्यापेक्षा न्यूझीलंड दौऱ्याला कमी महत्त्व दिल्याचंच यातून स्पष्ट झालं.

दुसऱ्या फळीतल्या एकदिवसीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली. पण त्यानंतर अनुभवी फळीनं बांगलादेशविरुद्धही काही भव्यदीव्य कामगिरी साकारली नाही.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

गेल्या वर्षभरात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण, विश्रांती, पुनरागमन या नावाखाली अनेक खेळाडूंना संधी मिळाली. पण या अपुऱ्या संधीतून एकसंघता साधता आली नाही.

द्रविडच्या प्रशिक्षक कार्यकाळात दुखापती आणि तंदुरुस्ती हे विषय तीव्रतेनं भेडसावले. महत्त्वाचे खेळाडू मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त होणं, हे तर नेहमीचंच झालं आहे.

दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषकापासून एकही सामना खेळलेला नाही. वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणारा जसप्रित बुमरानं पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घेतली. त्याची दुखापत अद्याप सावरलेली नाही.

विश्वचषकात खेळवण्यात आलेला मोहम्मद शमी अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि मालिकेसाठी त्याला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे रोहित तसंच तंदुरुस्तीमुळे कुलदीप सेन आणि चहर संघात नव्हते.

शास्त्री यांच्या प्रशिक्षक कारकीर्दीत भारताचा गोलंदाजीचा मारा सामर्थ्यशाली होती. परदेशी खेळपट्ट्यांवरही भारतानं या बळावर संस्मरणीय विजय प्राप्त केले. परंतु द्रविडच्या प्रशिक्षक कारकीर्दीत भारताचा गोलंदाजीचा मारा बोथट झाला.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

तूर्तास, भारतापुढे महत्त्वाचं आव्हान हे पुढील वर्षी होणारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हे आहे.

भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या दृष्टीनं संघबांधणी करण्यासाठी द्रविडच्या प्रशिक्षकपदावर विश्वास राखणं अवघड ठरत आहे.

द्रविडकडे कसोटीचं प्रशिक्षकपद द्यावं, तर मर्यादित षटकांसाठी अन्य व्यक्तीकडे जबाबदारी द्यावी, हीसुद्धा मागणी होत आहे.

त्यामुळे द्रविडची आगामी कामगिरी ही त्याचं भवितव्य ठरणारी असेल.

prashantkeni@gmail.com