हम भी है जोशमें
हम भी है जोशमें

..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे 'फुटबॉल' अक्षरक्ष: 'जगला' जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.जिथं खरचं 'फुटबॉल' हा खेळ 'जगला' जातो...कोणते आहे हे शहर

अमरदीप बाबुराव कुंडले

( संस्थापक अध्यक्ष, कोल्हापूर युनायटेड फुटबॉल असोसिएशन ( KUFA ), कोल्हापूर. )

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे 'फुटबॉल' अक्षरक्ष: 'जगला' जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.जिथं खरचं 'फुटबॉल' हा खेळ 'जगला' जातो...कोणते आहे हे शहर

कोल्हापूर म्हणजे एक 'स्पोर्ट्स सिटी' आहे. राजर्षी शाहूं महाराजांनी (Chatrapati Shahu Maharaj) हा पाया रचला आहे. त्यांनी जसा कुस्ती खेळ जपला, वाढवला तसाच त्यांचेनंतर छत्रपती बनलेले राजाराम महाराज व‌ प्रिन्स शिवाजी महाराज या दोघांनी त्यावेळी फुटबॉलसाठी (Football) विशेष औत्सुक्य दाखवले. प्रिन्स शिवाजी स्वतः: फुटबॉल खेळायचे. खरे तर..! कोल्हापूरचे पहिले फुटबॉलपटू तेचं. त्यांचे अकाली निधन झाल्याने छत्रपती राजाराम महाराजांनी या खेळाला राजाश्रय दिला.आणि इथला खेळ वाढत गेला. म्हणून कोल्हापूरात आज गल्लो-गल्ली फुटबॉल खेळताना शेकडो लोकल मेस्सी, न्येमार आणि रोनाल्डो सापडतात. (Western Maharashtra City Famous for Football)

कोल्हापूरातील (Kolhapur) फुटबॉलची ही परंपरा संस्थानकाळापासून पासून अशीच सुरू आहे. आज शंभर-दीडशे संघ, हजारो खेळाडू, त्या सर्वांवर जीवापाड प्रेम करणारे प्रेक्षक, तितकेच खेळाला वेळोवेळी आर्थिक हातभार लावणारे प्रायोजक, प्रसंगी पदरमोड करून स्पर्धा यशस्वी करणारे आयोजक, बातमीतून खेळाला घरोघरी पोहचवणारे दैनिकांचे बातमीदार, व्यापक प्रसिद्धी देणारी दैनिके, वृत्तवाहिन्या या सगळ्यां अशा फुटबॉल वाढीसाठी पोषक वातावरणात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ( KSA) सारखी कोल्हापूरच्या खेळांची मुख्य संस्था आज ८३ वर्षे फुटबॉलसाठी कार्यरत आहे.

दूरदृष्टीने छत्रपती राजाराम महाराजांनी ८ एप्रिल १९४० मध्ये सुरू केलेल्या या संस्थेचा कारभार क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकरांच्या देखरेखेखाली शिस्तबद्धपणे वाढला. पुढे जेव्हा राजाराम महाराजांचे नंतर छत्रपती शहाजीराजें व त्यानंतर साधारणपणे सन १९८३ नंतर श्रीमंत शाहू महाराजांकडे KSA चे नेतृत्व आले. तिथून ख-या अर्थाने फुटबॉल प्रसाराचा वेग वाढत गेला. मागच्याचं आठवड्यात ७ जानेवारीला वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आताचे श्रीमंत शाहू महाराजांनी ही परंपरा टिकवली आहे, वाढवली आहे. आता मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती त्यांची धुरा सांभाळत आहेत.

आता या सगळ्या गोष्टी पुरूष फुटबॉल खेळाडू व संघांच्या झाल्या. परंतु महिला फुटबॉलचे काय..? असा जर प्रश्न विचारला तर.....तर म्हणावे लागेल, हम भी हैं जोशमें..!
खरचं..! तशीच परिस्थिती आता आहे असं म्हणता येऊ शकेल ही वस्तुस्थिती आहे. फुटबॉलम़ध्ये कोल्हापूरच्या मुली मुलांप्रमाणेच दिमाखदार कामगिरी करीत आहेत.

मुलींच्या फुटबॉलचे संघ सर्वप्रथम साधारणपणे २००६ साली सुरू झाले. शाहू विद्यालय व आर्यविन ख्रिश्चन येथे ही सुरवात झाली. न्यू पॅलेसवरील छत्रपती शाहू विद्यालयामध्ये रिची फर्नांडीस, मनोज जाधव हे क्रीडा शिक्षक होते तर आर्यविन ख्रिश्चन मध्ये पाॅल सुर्यवंशी..! आर्यविनसाठी नंदू जांभळे, धनजंय यादव व मिथून मगदूम या फुटबॉल खेळाडूंनी मुलींच्या संघांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तेव्हा दोन्ही शाळेतील राजबन्सी भोसले, समृद्धी पाटील, दिपाली घोरपडे, स्नेहल घोरपडे, मैथीली जाधव या खेळाडू सुरवातीच्या काळात राष्ट्रीय स्पर्धैत खेळल्या. कोल्हापूर पब्लिक स्कूल मध्ये विश्वनाथ कदम उर्फ रॅम्बो यांनी पुढाकार घेत तिथेही संघ सुरू केला होता.

हे देखिल वाचा-

हम भी है जोशमें
प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....


पण ख-या अर्थाने मुलींच्या फुटबॉलने 'बाळसे' धरले ते प्रायव्हेट हायस्कूलमध्येचं.
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये तत्कालीन कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणा-या फुटबॉलपटू विनायक चव्हाण याने सुरवातीला हौस म्हणून मुलांच्या संघाबरोबरच प्रायव्हेटच्या मुलींना फुटबॉल प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग मुलींच्या संघांसाठीही मेहनत वाढवली. मुली मुलांच्या बरोबरीने सराव करू लागल्या. कष्ट करू लागल्या. अगदी पावसाळ्यातही त्या दररोज यायच्या. प्रायव्हेटचे फुटबॉल प्रशिक्षक विनायक चव्हाण व क्रीडाशिक्षक दिलीप पाटील यांनी त्या मुलींचा संघ छान बांधला होता. पण त्यावेळी मुलींसाठी स्पर्धा नव्हत्या. (खरं तरं..! आजही नाहीतचं.)

त्यावेळी मुलींसाठी नुकतीच १७ वर्षाखालील शासकीय फुटबॉल स्पर्धा ही एकमेव स्पर्धा सुरू झालेली होती‌. दरम्यान कोल्हापूरात जिल्हा क्रीडा कार्यालयात मालती पोटे या महिला फुटबॉल प्रशिक्षक म्हणून आलेल्या होत्या आणि या सा-या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात ग्रास रूट फुटबॉल डेव्हलपमेंट साठी कोल्हापूर युनायटेड फुटबॉल असोसिएशन ( कुफा) ही संघटना आम्ही २३ ऑक्टोबर २००६ ला म्हणजे ब्राझीलचे फुटबॉल सम्राट पेलेंच्या जन्मदिनी सुरू केलेली होती.

त्यावेळी शासकीय स्पर्धेव्यतिरिक्त मुली़ंसाठी पहिली स्पर्धा 'कुफा कप' ६ व ७ जानेवारी २००७ ला श्रीमंत शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त गांधी मैदानावर संपन्न झाली होती. प्रायव्हेट हायस्कूल व कोल्हापूर पब्लिक स्कूल यांचेत अंतिम सामना झालेला होता. तो प्रायव्हेटने चार गोलनी जिंकला होता. यातून पुढे जाऊन सुचेता पाटील, पृथ्वी गायकवाड, रूकय्या थोडगे, स्वालीया थोडगे, भाग्यश्री स्वामी, संयोगिता घाटगे, रश्मी सय्यद, शलाका गवळी, श्रद्धा भोई यांसारख्या अनेक राष्ट्रीय खेळाडू घडल्या गेल्या. या अख्खा संघानेच पुढे महाविद्यालयात अनेकदा विजय मिळवले.

त्यानंतर कुफाने २००७ मध्येच मुलींसाठीही कुफा टॅलेंट हंट शिबीर घेतले होते. शासकीय प्रशिक्षक हरिहर मिश्रा यांनी मुलींची निवडही केलेली होती. परंतु काही राजकीय हस्तक्षेपांमुळे म्हणा किंवा श्रेयवादामूळे म्हणा, कुठे माशी शिंकली ते काही समजले नाही पण
मुलींचा प्रतिसाद अचानक घटला आणि आम्ही मुलींसाठीचे प्रशिक्षणाचा विभाग बंद करायचा निर्णय घेतला. अन्यथा आज कोल्हापूरातून काही मुली नक्की भारतीय संघातून खेळल्या असत्या. कारण तेवढ्या टॅलेंटेड मुली त्यावेळी कोल्हापूरात होत्या आणि भारतीय महिला फुटबॉलमध्ये तेव्हा खूपच शिथिलता होती. आजच्या तुलनेने स्पर्धा खूप कमी होती.

२००९ मध्ये १८ महिन्यांसाठी फिफाने भारतीय महिला फुटबॉलची क्रमवारीतून नोंद थांबवलेली होती. कारण त्यावेळी फारसे काही महिला फुटबॉलमध्ये घडतचं नव्हते‌. ना स्पर्धांचे आयोजन ना प्रशिक्षण शिबीरे..! सन १९९१ ते २०१० विशेष काही घडलेचं नाही. दोन संघटना व अधिकृतता यात बरेच दिवस घोंगडं भिजत पडले होते. कारण अगोदर महिला फुटबॉलचे नियंत्रण AIFF कडे नव्हते तर ते WFFI या वेगळ्या संघटनेकडे होते. जी AFC किंवा FIFA शी संलग्न नव्हतीचं.

AIFF कडे महिला फुटबॉलचे अधिकृत नियंत्रण आल्यावर सन २०१० नंतर महिला फुटबॉलचा प्रवास पुन्हा सुरू झाला असं म्हणता येईल. परंतु २०१६ ला इंडियन वुमेन्स लीगची सुरुवात झाली आणि महिला फुटबॉलच्या प्रसाराचा ख-या अर्थाने नारळ फुटला. तद्नंतर राज्य असोसिएशन्सही कात टाकत होत्या. त्यांनी महिला फुटबॉल हा विषय अजेंड्यावर घेतला. तेव्हा कोल्हापूरच्याच मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांचेकडे महाराष्ट्र राज्याच्या महिला फुटबॉल संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली.

हे देखिल वाचा-

हम भी है जोशमें
सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

त्याचवेळी इकडे कोल्हापूरातील प्रसिद्ध दानशूर उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे पुढाकाराने FC Kolhapur City हा महिलांचा व्यावसायिक संघ कोल्हापूरात सुरू झाला. त्यासाठी त्यांनी प्रचंड खर्च केला होता. कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला होता. प्रशिक्षक अमित पोवार यांनी या संघाची उभारणी केली. यासाठी हरियाणामधील महिला खेळाडूंनाही कोल्हापूरच्या संघातून खेळायला करारबद्ध केलेले होते. अमित शिंत्रे, संतोष पोवार, प्रमोद भोसले, प्रदीप साळोखे, युवराज पाटील, किरण अतिग्रे, नरेंद्र पायमल अशी मोठी टीम हे सगळे सांभाळत होती.ही कोल्हापूरातील महिला फुटबॉलसाठी मोठी घटना होती.

दरम्यान विवेकानंद महाविद्यालय मध्ये संतोष कुंडले व अमित साळोखे, उषाराजे हायस्कूलमध्ये रघू पाटील , बागल हायस्कूलमध्ये सतिश कुंभार व आनंदराव गवळी, काडसिद्धेश्वर हायस्कूल व महाविद्यालय, कणेरीमठ येथे अमित शिंत्रे, राधाबाई शिंदे स्कूलमध्ये योगेश सरनाईक यांनी आपापल्या शाळा, महाविद्यालयाचे मुलींचे संघ उभे केले. शिवाय S३ साॅकर ॲकडमीद्वारे अमित साळोखे नव्या मुलींसाठी मेरी वेदर मैदानावर प्रशिक्षण देत आहेत.

दरम्यान कोल्हापूर सिटीच्या महिला संघाने थेट मुंबईत जाऊन व्यावसायिक लीग स्पर्धा खेळण्याची कामगिरी केली. (IWL किंवा Indian Womens League ) ही महिलांची राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आहे.) कारण कोल्हापूरचा कोणताही पुरूष संघ अजूनही कोणत्याही भारतातील खुल्या गटात व्यावसायिक स्पर्धेत खेळलेला नाही. FC Kolhapur City या संघाद्वारे महिलांनी पुरूषांच्या अगोदर हा टप्पा पार पाडलेला आहे. इंडियन वुमेन्स लीगच्या दोन सिझन मध्ये त्या़चा सहभाग होता. ५ सामन्यात ७ गुणा़सह ते गटात तिस-या स्थानी होते.

तसेच मधुरिमाराजे छत्रपती अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे पुढाकाराने २१ जानेवारी २०१३ ला कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय संघासोबत एक प्रदर्शनीय महिला सामना आयोजित केला गेला. हाॅलंडच्या संघाविरुद्ध भारतीय महिला संघामध्ये हा सामना रंगला. राजर्षि शाहू स्टेडियमवर या महिलांचा खेळ पहायला प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामुळे महिला फुटबॉलचा चांगला प्रसार घडला.

या सगळ्या महिला फुटबॉलसाठी बनलेल्या सकारात्मक वातावरणात अचानक दुर्दैवी घटना घडली. १ डिसेंबर २०२१ ला आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने FC Kolhapur City हा महिलांसाठी सुरू झालेला संघ पोरका झाला. त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर अलिकडेच Warriors of Kolhapur म्हणून नवा महिला संघ अमित पोवार यांनी सुरु केलेला आहे.
त्यांनी पुन्हा मुंबई येथील स्पर्धेत चमक दाखवलेली आहे.

अशाप्रकारे फुटबॉल या खेळात आज पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना त्याहीपुढे वेगाने महिलाही प्रगती करीत आहेत. फुटबॉल खेळाडू म्हणून कामगिरी करीत असतानाच प्रशिक्षक म्हणूनही अनेक मुली कार्यरत आहेत. KSA द्वारे विविध आंतरजिल्हा स्पर्धासाठी संघ पाठवले जातात.
वीसहून अधिक मुलीं E Licence परिक्षा पास झालेल्या आहेत. शिवाय Grass root leader Coaches म्हणूनही तितक्याच मुली पात्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजची महिला फुटबॉलपटू अंजू तुरूंबेकर हिने AFC A Licence मिळवलेले आहे. अशी कामगिरी करणारी ती देशातील मोजक्या पुरूष निवडक प्रशिक्षकांत पहिली महिला म्हणून गणली जाते.

हे देखिल वाचा

हम भी है जोशमें
सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

भारतीय महिला फुटबॉलचे क्षितीज विस्तारणारी घटना मागील वर्षी घडलेली आहे. १७ वर्षांखालील महिला फिफा वर्ल्ड कप चे आयोजन भारतात गेल्या ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेले आहे. आणि यजमान असल्यामूळे भारतीय मुलींनी या जागतिक स्पर्धेत पात्रता फेरी न खेळता वर्ल्ड कप खेळायचा इतिहास घडवलेला आहे. कारण जगातील प्रत्येक फुटबॉल खेळाडूचं स्वप्न असते ते म्हणजे फिफा वर्ल्ड कप मध्ये खेळणे. ते त्यांचे स्वप्न १७ व्या वर्षीच.. तेही पात्रता फेरी न खेळताचं पूर्ण झालेले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोल्हापूरहून मुंबईला मुलींना नेण्यात आलेले होते.

अशा प्रकारे कोल्हापूरातील महिला फुटबॉलचा जर सारांश काय..? म्हणून विचार केला तर..
शालेय स्पर्धा, महाविद्यालयीन स्पर्धा नंतर आंतर विद्यापीठ स्पर्धा तसेच खुल्या गटातील
आंतरजिल्हा स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये आज कोल्हापूरच्या महिला फुटबॉलपटूंचा बोलबाला वाढत चाललेला आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या आॅलिपिक स्पर्धेत तिसरा क्रमांक कोल्हापूरच्या मुलींनी पटकाविलेला आहे
जणू त्या खरोखरीचं म्हणताहेत..हम भी हैं जोश में..!

परंतु सर्व फुटबॉल खेळाडू, सर्व संघटना व खेळाशी संबंधित सर्वच घटका़ंनी... आतापासूनच..हम भी हैं जोश में....म्हणणा-यांनी 'बातें कर अब होश में..!'
असे आत्मपरिक्षण करीत वाटचाल करायला हवी. स्पर्धा,शिबीरे यांचे सातत्याने आयोजन व्हायला हवे. केवळ जिंकणे हे उद्दिष्ट न ठेवता खेळाचा दर्जा कसा सुधारता येईल..? यावर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी सकारात्मकपणे व सर्वसमावेशक धोरणांची आखणी व अंमलबजावणी आवश्यक असेल. फुटबॉलसाठी कार्यरत असणा-या प्रत्येक घटकाची दखल घेऊन पुढील वाटचाल करणे फायद्याचे ठरू शकेल. केवळ स्तुती पाठक सोबत ठेऊन चालणार नाहीत तर टीकाकारही तितकेच आवश्यक असतील. तरच भविष्यात आज ६१ व्या स्थानावर असणारा भारतीय महिला फुटबॉल संघ अव्वल होण्यास मदत होईल ज्यातून भविष्यात कोल्हापूरच्या महिलाही भारतीय संघातून खेळतील.

आणि कुणीतरी म्हंटलय
Change the thought, the stars will change,

Change the view, views will change.

No need to change the boat,

Change the direction the shore will change.

याप्रमाणे बदल स्वीकारीत पुढील वाटचाल करायला हवी.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com