Ganesh Festival: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदेश बांदेकर आणि गणपती}
काय आहे आदेश बांदेकर आणि गणपती यांचे नाते

लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

आदेश बांदेकर हे नाव आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. विश्वास बसणार नाही पण एकेकाळी गणेशोत्सवात गिरणगावात आदेश बांदेकर नारळ विकत होते. हेच आदेश बांदेकर आज त्याच गिरणगावातल्या गणेशोत्सवात सन्मानमूर्ती म्हणून सहभागी होतात......वाचा काय आहे हे नातं.....

गणेशोत्सव (Ganeshotsav) आता फक्त धार्मिक किंवा सामाजिक करणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गणेशोत्सव आणि त्याचे सार्वजनिक स्वरूप हा खऱ्या अर्थाने तरुणांच्या स्वयंविकासाचा मार्ग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गणेशोत्सवातला कार्यकर्ता म्हणजे फक्त थिललरपणा, उन्माद हा केवळ गैरसमज आहे, त्यापलीकडे सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवतेची कास धरून काम करतो तो खरा कार्यकर्ता, अशी आजची व्याख्या आहे. कदाचित कोविड (Corona) काळात त्याची प्रचिती अनेकांनी घेतलीही असेल. (Aadesh Bandekar Tells about his relation with Gananpati)

आता तुम्ही म्हणाल आज गणेशोत्सवानिमित्त गणपतीवर लिहायचं सोडून थेट कार्यकर्ता मध्ये कुठून आला. पण आजचा विषयच तसा आहे. एक कार्यकर्ता आज अभिनेता, निर्माता, नेता अशा अनेक भूमिका लीलया सांभाळत आहे आणि विशेष म्हणजे त्याची जडणघडण ही गणेशोत्सवातून झाली आहे. ती व्यक्ती आहे, महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर. (Aadesh Bandekar)

आदेश बांदेकर हे नाव आज उभ्या महाराष्ट्राला (Maharashtra) परिचित आहे. विश्वास बसणार नाही पण एकेकाळी गणेशोत्सवात गिरणगावात आदेश बांदेकर नारळ विकत होते. वर्गणी काढण्यापासून ते मिरवणुकीत बेभान होऊन नाचणारे आदेश बांदेकर आज त्याच गिरणगावातल्या गणेशोत्सवात सन्मानमूर्ती म्हणून सहभागी होतात.

याबद्दल आदेश म्हणतात.....आज मी जे काही आहे ते केवळ गणपतीचे (Ganapati) आशीर्वाद आहेत म्हणून आहे. तो आपलं आराध्य दैवत असला तरी त्याचं आणि माझं खास नातं आहे. त्याचे संकेत त्याने वेळोवेळी दिले आहेत. एवढंच नाही तर माझ्या आयुष्यातील सूर, ताल, लय जे काही आहे, ते केवळ या गणेशोत्सवामुळेच आहे.

याशिवाय गणेशोत्सवाचं त्यांच्या आयुष्यातील महत्व, त्यांच्या आयुष्यात आलेले काही अनुभव, गमतीशीर किस्से आणि विशेष म्हणजे गणेशोत्सवाने त्यांना एक माणूस आणि कलाकार म्हणून कशा पद्धतीने घडवलं, याचा सारा प्रवास आदेश बांदेकरांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत उलगडला आहे.

चाकरमान्यांचा गणेशोत्सव..

आदेश म्हणतात.... ‘गणपती हे आपलं आराध्य दैवत आहेच पण माझी गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे, अगदी लहानपणापासून. याचं कारण माझं गिरणगावात गेलेलं बालपण असलं, तरी याचा एक धागा वडिलांच्या बालपणाशीही जोडला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘वाडोस’ हे आमचं मूळ गाव, तिथेच माझ्या वडिलांचं बालपण गेलं. पुढे ते नोकरी निमित्त गिरणगावात आले खरे; पण गावाच्या गणेशोत्सवाशी जोडलेली नाळ मात्र काही तुटली नाही. त्यामुळे लहानपणी गणपती जवळ आला की कधी एकदा गावी जातोय, असं आम्हाला व्हायचं. किंबहुना गिरणगावातल्या प्रत्येक चाकरमानी माणसाची हीच स्थिती असायची.’

त्यावेळी गावाला जाण्याआधी गणपतीचं डेकोरेशन कोणतं करायचं हे जसं महत्वाचं काम असायचं तसच एक महत्वाचं काम असायचं ते म्हणजे शाळेतून ‘एसटी’साठी कन्सेशन मिळवणं. तिकीट दरात सवलतीसाठी दिला जाणारा हा फॉर्म शाळेत मिळायचा, पण त्यासाठी अनेक खेटे घालावे लागायचे. मग तो पास व्हायचा आणि तो झाल्यानंतर आम्ही तिकीट मिळवण्यासाठी रात्रभर बॉम्बे सेंट्रल डेपो मध्ये झोपायचो, जेणेकरून पहाटे तिकितीसाठी आपला पहिला नंबर लागेल.

तिकीट मिळून बस सिंधुदुर्गाकडे जाईपर्यंत जीवाची घालमेल असयाची. गणपतीत सारेच चाकरमानी कोकणात (Konkan) चालले असल्याने गाडी सुटताना ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जोरदार जयघोष व्हायचा. पुढे गाडी वाटेला लागली की सगळे प्रवासी मिळून कधी भजनं, कधी आरत्या तर कधी गणपतीची पारंपरिक मालवणी गाणी म्हणायचे.

हे सगळं आठवलं की आजही भारावून जायला होतं. आज कामानिमित्त सगळेच मुंबईत आल्याने हा गावचा बाप्पा आम्ही मुंबईमध्ये घेऊन आलो. माझ्या मोठ्या भावाकडे तो दरवर्षी येतो आणि सर्व कुटुंबीय एकत्रित येऊन गणेशोत्सव आजही तितक्याच जल्लोषात साजरा करतो.

गिरणगावातल्या गणेशोत्सवाने घडवलं..

आपली जडण-घडण सांगताना आदेश बांदेकर म्हणतात.....

एकीकडे हा कोकणातला गणपती आणि दुसरीकडे आमच्या गिरणगावातला गणेशोत्सव. माझं बालपण काळचौकीतील अभ्युदय नगरात गेल्याने अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी माझं वेगळं नातं आहे. ४३ इमारतींचा मिळून बसणारा हा बाप्पा म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाचा वाटायचा. या मंडळाप्रमाणेच ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ही मला जवळचेच. लहानपणी लालबागच्या मच्छी मार्केट मधून मासे आणताना बाजूलाच एका पत्रे लावलेल्या खणात काहीतरी घडत असायचं, ते पत्रे जितके शक्य तितके वाकवून आम्ही आत डोकावायचो आणि आतमध्ये गणपतीची मूर्ती कशी आकार घेते हे पहायचो. मध्येच कुणीतरी आम्हाला हुसकावून लावायचं, आणि जेव्हा तो पत्रा बाजूला व्हायचा तेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन घडायचं.

मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला मात्र मी अभ्युदय नगरच्या राजाच्या मिरवणुकीत आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत नाचताना किंवा ढोल वाजवताना दिसणारच, हा कित्येक वर्षांचा ठरलेला कार्यक्रम आहे. कारण याच गणेशोत्सवाने मला ताल, सूर, लय यांचं शिक्षण दिलं; तेही कोणतीही फी न आकारता..

लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आणि मोठा धक्का..

आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवाबद्दलही आदेश बांदेकरांकडे आठवणी आहेत....

याबद्दल ते सांगतात.......

सूचित्रा आणि मी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. तो काळ अत्यंत संघर्षाचा होता. सूचित्राच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारलं नव्हतं आणि अशातच तिच्या मावशीकडून आम्हाला गणपतीचं निमंत्रण आलं. त्यांच्या गिरगावच्या घरी आम्ही गेलो. पण नेमका तिथे एक गोंधळ झाला. गणपतीच्या प्रतिष्ठापने आधीच माझा धक्का त्या मूर्तीला लागला आणि त्या मूर्तीचा हात तुटला. आधीच लग्नाला विरोध होता त्यात माझ्याकडून ही चूक झाल्याने मला प्रचंड टेन्शन आलं.

मी तसाच गणपती घेऊन गिरगावच्या फडकेवाडी मंदिरात गेलो. तिथले गुरुजी म्हणाले अजून प्रतिष्ठापना झाली नसल्याने चिंता करू नका. मी तिथून निघालो आणि गणपती विसर्जन करून पुन्हा मंदिरात आलो. मी अक्षरशः रडत होतो. मंदिरात नारळ ठेवला, गुरुजी म्हणाले, घाबरू नकोस.. सगळं काही चांगलं होईल, आणि तसंच झालं. अनंत चतुर्दशीच्या काही दिवस आधी मला दूरदर्शन मधून कॉल आला. ‘अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचं सूत्रसंचालन करशील का’, म्हणत निना राऊत यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. ती माझ्या आयुष्यात आलेली सर्वात पहिली आणि महत्वाची संधी होती. बाप्पाच्या आशीर्वादाने तिथून सुरू झालेला प्रवास आजही अविरत सुरू आहे.

अभ्युदय नगरच्या गणेशोत्सवातील गमतीशीर किस्से...

अभ्युदय नगरात बांदेकर यांचं बालपण गेलं. त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना बांदेकर सांगतात......

गणपती येण्याची मी प्रचंड आतुरतेने वाट पाहत असतो. वर्षभर आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात पण त्या सगळ्यावर मात करून नवी भरारी घेण्याचा काळ म्हणजे हा गणेशोत्सव. प्रचंड चैतन्य या उत्सवात आहे.

लहानपणीची गणेशोत्सव जवळ आला, की माझ्या आई-बाबांना प्रचंड टेंशन यायचं. कारण आमच्या घरातली भांडी कमी व्हायची. मंडळात काही लागलं, स्पर्धेसाठी परीक्षक आले तर त्यांना तांब्या, पेले देण्याची वेळ आली की मी लगेच ती भांडी घरातूनच आणायचो, आणि एकदा मंडळात आलेलं भांडं परत कधीही घरी जायचं नाही. त्यामुळे गणपती जवळ आला की आईबाबा घरातली भांडी लपवायचे.

त्यावेळी आणि आजही गणेशोत्सवात अंगावर गुलाल मिरवणं म्हणजे मला मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, असं वाटतं. त्या गुलालाच्या रंगात मी इतका रंगून गेलोय की गणेशोत्सव मंडळ ते सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष इतका मोठा प्रवास कधी पार केला कळलच नाही. त्या गणरायाने इतकं काही दिलंय की प्रत्येक अनंत चतुर्दशीला मी त्याला सांगतो, की बाबा जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे आणि म्हणूनच की इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो.

पुढे ते म्हणतात....‘या गिरणगावातील गणेशोत्सवाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वी अभ्युदय नगरच्या राजाची मिरवणूक सकाळी निघाली की ती चार पाच तासांनी म्हणजे दुपारी बाराच्या सुमारास कॉलनीमध्ये यायची. त्यावेळी नाचून प्रचंड भूक लागलेली असयाची. मग जेवायला कुठे जाणार, तर माझ्या हेमंत पांचाळ नावाच्या मित्राकडे त्यादिवशी दुपारी घरी नैवेद्य असायचा. त्यामुळे त्याच्याकडे पाया पडायला जायचो. तिथे गेल्यावर स्वाभाविकच जेवणासाठी विचारलं जायचं आणि मी तिथे पोटभर काळ्या वाटण्याची उसळ आणि पुऱ्यांवर ताव मारायचो. ती परंपरा मी आजही कायम राखली आहे. आता बदल इतकाच झालाय की पूर्वी मी एकटाच जायचो आणि आता मात्र माझ्यासोबत तीस-चाळीस जण त्याच्या घरी विसर्जनाच्या दिवशी जातात. त्यामुळे त्या छोट्या जेवणाचा आज जणू भंडाराच झाला आहे.

या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे गिरणगावात राहणाऱ्या माणसांची घर ‘दहा बाय दहा’ची असली तरी मनं एखाद्या राजवाड्यासारखी मोठी आहेत. जिथे काहीही कुणालाही उपाशीपोटी परत पाठवलं जात नाही.

याच मिरवणुकीची आठवण सांगायची झाली तर, आजच्या सारखी तेव्हा मिरवणुकांमध्ये नवे कपडे घालण्याची पध्दत नव्हती. गुलाल खेळत असल्याने जुनेच कपडे वापरले जायचे. मी आणि माझा मित्र शशी बनसोडे आम्ही कायम मिरवणुकीत एकत्र असायचो. पुढे आमच्या दोघांचीही परिस्थिती थोडी सुधारली तेव्हा आम्ही ठरवलं, की दोघांनीही प्रत्येक मिरवणुकीत नवं पांढरं शर्टच घालायचा. एक वर्ष तो माझ्यासाठी शर्ट खरेदी करतो आणि एक वर्ष मी त्याच्यासाठी. हा क्रम गेली २५ वर्षे सुरू आहे.

आता उत्सवाची परंपरा नव्या खांद्यावर...

यात मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की ही परंपरा पुढेही सुरू राहणार आहे. कारण दोन वर्षांपूर्वी मी माझ्या मुलाला म्हणजे सोहमला या विसर्जनाच्या मिरवणुकीत घेऊन गेलो होतो. ते सगळं पाहुन तो इतकं भारावून गेला की यावर्षी त्याने स्वत:हून मला विचारलं, की बाबा आपल्याला कधी जायचं आहे. हिरानंदांनी सारख्या परिसरात वाढलेल्या माझ्या मुलालाही सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी व्हावसं वाटतं याचा मला प्रचंड आनंद आहे.

गणेशोत्सवानं काय दिलं हे सांगताना आदेश बांदेकर म्हणतात....

या गणेशोत्सवाने तीन गोष्टी शिकवल्या.. एक म्हणजे जुने संस्कार, जुनी संस्कृती कधीच विसरू नका, आपले पाय जमिनीवर ठेवा आणि असं कार्य करत राहा की दरवर्षी बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला ते काम सांगता आलं पाहिजे. ते सांगताना तुमची मान खाली जायला नको.

जे मला माझ्या बाबांनी दिलं तेमी आज सोहमला देतोय....

गणेशोत्सवाची बाबांनी घालून दिलेली एक परंपरा मी पुढे सुरू ठेवली आहे. माझे बाबा आम्हाला दरवर्षी गणपती घडवण्याच्या कारखान्यात न्यायचे आणि मूर्ती कशी घडते हे दाखवायचे. मीही सोहम ला दरवर्षी न चुकता मूर्तिकार विजय खातू यांच्या कार्यशाळेत घेऊन जायचो. माझे बाबा आम्हाला गिरगाव चौपाटीला घेऊन जायचे आणि तिथून डबल डेकर मध्ये बसून उंच मूर्ती बघत आम्ही घरी यायचो. हेच मी आणि सोहम ही करतोय. आज आमच्या दोघांकडेही स्वतंत्र गाड्या असल्या तरी आम्ही ट्रेन, बस अशा पब्लिक ट्रान्सपोर्टने विसर्जनाच्या दिवशी मुंबईत येतो आणि त्या सोहळ्याचा आनंद घेतो.

बांदेकर पुढे म्हणतात.....

लहानपणी मला व्यवसाय करण्याची खूप आवड होती. त्यासाठी व्यासपीठही याच गणेशोत्सवाने दिलं. गणपतीच्या निमित्ताने मी कधी नारळ विकले तर काही दिव्यांची तोरणं. पुढे व्यवसायात अनेक प्रयोगही करून पाहिले, आणि अखेरीस कलाकार म्हणून तुमच्या समोर आलो.

एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, गणेशोत्सव आपल्याला बरंच काही शिकवतो. आयुष्यात काय करायचं आणि काय नाही, हे शिकवणारा मुंबईचा गणेशोत्सव आहे. आज गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना त्या गर्दीत कुणी एखादा येतो आणि म्हणतो..... बांदेकर तुम्ही मोठे झाले आता. त्यावेळी असं वाटतं की धावत दूरदर्शनला जायला हवं जिथून माझी सुरुवात झाली होती. कारण अशा ठिकाणीच आपल्याला कळतं आपण नेमके कुठे आहोत ते.

बाप्पाचे संकेत आणि यशाची पायरी....

जसं लग्नानंतर अनंत चतुर्दशीला मला दूरदर्शनच काम मिळालं तसंच अनेक संधी याच उत्सवात माझ्याकडे चालून आल्या, जणू हा त्याचाच प्रसाद. एक किस्सा असा की, लालबागच्या राजाची मिरवणूक दोन टाकीला वळत होती, मीही त्या मिरवणुकीत होतो. त्यांनी मला सत्कारासाठी स्टेजवर बोलावलं. स्टेजवर मी आणि समोर लालबागचा राजा (Lalbaug Cha Raja) होता. त्याचवेळी माझा फोन वाजला.. तो फोन शिवसेनेतून (Shivsena) होता. त्या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला आणि माझा राजकीय प्रवास सुरू झाला.

आश्चर्य वाटेल पण दूसरा किस्साही असाच आहे. मी पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि मला उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले.. आदेश तुम्हाला सिद्धिविनायकाची जबाबदारी घ्यायची आहे आणि त्या दिवशी मी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचा अध्यक्ष झालो....

.....माझ्या राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील करकीर्दीमागे त्याचे आशीर्वाद आहेत. मी जे प्रामाणिकपणे काम करतोय ही त्याचीच शिकवण आहे. आज सिद्धिविनायकमध्ये अध्यक्ष म्हणून काम करताना जेव्हा गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी आम्ही २५ हजारांचा धनादेश देतो तेव्हा तो स्वीकारताना लोकांच्या डोळ्यातले अश्रु, धनादेश डोक्याला लावून दाखवलेली लीनता हे पाहतो तेव्हा मला साक्षात बाप्पा भेटल्यासारखं वाटतं. शेवटी एकच सांगेन जे दिलंय ते त्याने दिलंय. म्हणून मी माझ्या प्रत्येक कृतीतून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. हा गणेशोत्सव होता म्हणूनच हा आदेश घडला. इथून पुढे मी कितीही मोठा झालो तरी अनंत चतुर्दशीला मात्र मी गिरणगावातच दिसेन. कारण पाय जमिनीवर ठेवणं याच उत्सवानं शिकवलंय मला.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”