Bhagwadgeeta- श्रीमद्‌भगवद्‌गीता शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीमद्‌भगवद्‌गीता मानवतेचे गीत}

श्रीमद्‌भगवद्‌गीता- शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम'

भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. आज (ता. तीन डिसेंबर) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -

कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव-पांडवांची सैन्ये उभी आहेत. प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत. हे युद्ध म्हणजे काहीच नाही. जीवनात अशी अनेक संकटे येतात, ज्यांच्यात जडलेली अस्त्रे-शस्त्रे आपल्याला दिसू शकत नाहीत. आपलेच नातेवाईक आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकतात. दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाल्यावर एका भावाकडे सहा इंच जमिनीचा पट्टा कमी आला, एवढ्यावरून तंटे होताना दिसतात. युद्ध काही काळ चालते, पण नंतर जीवन चालूच असते. (Bhagwatgita Jayanti how to balance yourself with geeta teachings analysis by Sriguru Balaji Tambe)

कुरूक्षेत्रावर दिसणारे युद्ध( War) तात्कालिक आहे, हे एक रूपक आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाला आपल्या स्वतःशीच युद्ध करायचे आहे. मनुष्याला (Human) युद्ध करायचे आहे व्यसनांशी, कुविचारांशी, त्याच्या आत असलेल्या राक्षसत्वाशी. शांती कशी मिळेल यासाठी भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सविस्तर उपदेश केला आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता (Bhagwadgita) युद्धभूमीवर सांगितली गेली. युद्धभूमीवर आत्मा व मन सचेतन होते, सर्व इंद्रिये सावध होतात. येथे झालेली छोटीशी चूक मनुष्याला सरळ वरचा रस्ता दाखवते. युद्धभूमीवर एखाद्याच्या कानावर समजा शब्द आले, "अरे, तुझ्याकडे अस्त्र येत आहे, खाली बैस', तर हा संदेश अत्यंत सावधानतेने ऐकला जातो, ती व्यक्‍ती विनाविलंब खाली झुकते व बाण सूऽऽ सूऽऽ करत पलीकडे निघून जातो.

तेव्हा युद्धभूमीवर सावधान असणे, साक्षीत्वता असणे खूपच आवश्‍यक असते. येथे तर प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत व भगवंत जे सांगत आहेत ते आपल्याला ऐकायचे आहे. "या स्वयं पद्मनाभस्य' म्हणजे प्रत्यक्ष भगवंत (God) येथे उपदेश करत आहेत. सध्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे सल्ले मिळत असतात. "मित्र जोडण्यासाठी काय उपाय करावेत', वगैरे विषयांवरही आज पुस्तके उपलब्ध असतात. मित्र तर आपला जिवलग सखा असतो. तो आपलाच एक भाग असल्यासारखा असतो. मित्र-मित्र, पती-पत्नी यांच्यात एकमेकांना जिंकायची, एकमेकांवर कुरघोडी करायची भावना कदापि नसावी. त्यांच्यात एकमेकांना जिंकण्याची भावना आली तर या नात्यांनाच सुरुंग लागतो. मैत्री, प्रेम हे जन्मतःच असलेले आकर्षण असते, फक्‍त ते वाढवायचे असते. 

आपल्याला जायचे आहे भगवंतांपर्यंत. आपल्याला शांतीचा (Peace) अनुभव घ्यायचा आहे, परमचैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवंतांपर्यंत पोचण्याच्या मार्गात जे काही येईल त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमद्‌भगवद्‌गीतेत मिळते. श्रीमद्‌भगवद्‌गीता वाचायला, तिचा अभ्यास करायला, ती आचरणात आणायला जात-पात, धर्म, देश, काळ असे कशाचाही बंधन नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचा मनुष्याशी असलेला संवाद आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तो एक जीवनशास्त्रीय ग्रंथ आहे, एक मानवता गीत आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा आमच्याशी काय संबंध असे म्हणून या मानवता गीताकडे कानाडोळा केला तर प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याने केलेली चर्चा ऐकण्याच्या संधीला मुकावे लागेल.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्‌भगवद्‌गीतेत केलेले आहे. शांतीचा अनुभव घेण्यासाठी हिमालयाच्या गुहेतच जायला पाहिजे असे नाही, तर शांती आपल्यातच असते. आपण शांत झालो की जगातील कुठलाही कोलाहल आपल्याला त्रास देऊ शकत नाही. सारांश असा, की भगवंतांच्या चरणांपाशी जायचे आहे, शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाच्या डोहात आनंदाने पोहायचे आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. इतरांना मदत करत आयुष्यक्रमण करताना जीर्ण झालेले शरीर एक दिवशी सोडावे लागतेच. शरीर सोडताना भावना अशी असते की, मी हे शरीर सोडत आहे; पण दुसरे नवे शरीर घेऊन पुन्हा इतरांच्या मदतीला येईन. 

सप्तश्‍लोकी गीता म्हणजे जणू गीतेच्या सातशे श्‍लोकांचा सारांशच आहे. 

तसे पाहता, श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे प्रत्येक अक्षरच जाणून घेण्यासारखे आहे. सप्तश्‍लोकी गीतेतील पहिला श्‍लोक आहे, 

1) ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।8-13।।

(जो कोणी ॐ या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करत, माझे चिंतन करत, देह सोडून जातो तो पुरुष परम गतीला प्राप्त होतो.)

या श्‍लोकाआधी त्याच्या जोडीचा श्‍लोक आहे, 

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।

मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।।8-12।।

(सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांचा विषयांपासून निरोध करून, मनाला हृदयात स्थिर करून, आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून व योगधारणेत स्थित होऊन)

हे दोन श्‍लोक वाचताना डोळ्यांत अश्रू येतात. माझे काय भाग्य असावे की प्रत्यक्ष भगवंतांनी कृपा करून मला या दोन श्‍लोकांचा दृष्टांत दिला होता. 1965-66 चा प्रसंग आहे. एकदा मी पाचगणी येथे बसलो होतो. गीतेचा अभ्यास चालू होता. इंद्रियांना ताब्यात आणण्याचा प्रयत्न होता. मनाला हृदयात (जे भगवंतांचे स्थान आहे.) आणून दारावर टिकटिक करण्याचा प्रयत्न सुरू होता, इच्छा होती, "हे भगवंता, एकदा तरी दर्शन द्या'. एकदम या दोन श्‍लोकांचा दृष्टांत झाला. भगवंतांनी सांगितले, ""मरण्याची आवश्‍यकता नाही. आपल्या स्थूल शरीराचा भाव सोडून द्या. हा भाव सुटला तर सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून सुटे होईल व त्याला परमगती प्राप्त होईल.'' यासाठी मरून देह सोडण्याची गरज नसून, ॐकार उपासनेची गरज आहे. 

भगवंतांना स्मरावे, त्यांच्या परमशक्‍तीचे, त्यांच्या स्पंदनांचे स्मरण करावे, ॐकाराची उपासना करत त्यांच्याशी एक होऊन जावे. असेही ॐकाराच्या उपासनेत स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर सुटे होणे शक्‍य असते. "सोम' साधनेतही हाच फायदा मिळतो. यामुळे साधकाची सर्जनशक्‍ती वाढते, झोपेत फरक पडतो, परमशक्‍तीचे मार्गदर्शन मिळते. शांत झोप आल्यामुळे दिवसही शांततेत जातो. 

जीवनभरात ॐ उच्चारलेला नसला, तर मृत्यू येत असताना शेवटच्या क्षणी ॐ कसा आठवेल? आठवला तरी एकदा ॐ आठवल्याने परमगती कशी काय मिळेल? तेव्हा "त्यजन्‌ देहं' याचा अर्थ "मृत्यूनंतर' असा नाही, हे नक्की. भगवंतांनी गीतेकडे, या दोन श्‍लोकांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली. 

2) अर्जुन उवाच

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या

जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति 

सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ।।11-36।।

(हे हृषीकेशा, हे योग्यच आहे की, आपल्या नावाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्‍तही होते. तसेच भयभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात.)

हा श्‍लोक सप्तश्‍लोकी गीतेत का अंतर्भूत असावा? 

प्रभाव दोन प्रकारचा असतो. सृष्टीचे निर्माणकर्ता, परमपुरुष, भगवंतांचा निर्देश आपण "तत्‌' या शब्दाने करतो. भगवान म्हणजे कोणी पुरुष वा स्त्री नाही, ते एक पूर्ण आहेत. भगवंत ही एक संकल्पना आहे. एक प्रोग्रॅम आहे. भगवंतांच्या ठायी स्फुल्लिंग आहे, स्फुरण आहे. म्हणजे त्यांच्यापासून स्पंदन निघते. गाडीत भरलेले पेट्रोल विशिष्ट ठिकाणी आले की त्यात स्पार्क पडतो. त्यातून शक्‍ती तयार होते व गाडी सुरू होते. पेसमेकर मनुष्याच्या हृदयाला एक स्पंदन, ठिणगी (स्पार्क) देतो. पेसमेकरने हृदयाला स्पार्क दिला की हृदयाचे आकुंचन प्रसरण होते, इतकेच नाही तर यामुळेच ओजही सर्व शरीरभर पोचायला मदत होते.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

भगवंतांच्यातून निर्माण झालेले स्पंदन विश्वात सर्वदूर पोचते, यामुळेच सर्व विश्वाचे व्यवहार सुरू राहू शकतात. तेव्हा हे स्पंदन किती शक्‍तिशाली असावे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. सर्व विश्व ज्यामुळे चालते ते स्पंदन किती मोठे असावे व असे स्पंदन ज्यांच्यातून निर्माण होते त्यांची शक्‍ती किती असावी? अशा महान शक्‍तीच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही आनंद मिळतो. बागेत बी पेरले, तर त्याला अंकुर येतो, त्याला दोन पाने फुटतात, रोप वाढायला लागते. हे सर्व पाहणाऱ्याला आनंद होतो, मन प्रसन्न होते. हे सर्व ज्या भगवंतांच्या संकल्पनेच्या जोरावर चालत असते, त्या भगवंतांचे सुंदर, रमणीय रूप पाहिले तर मन प्रसन्न होते. "स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या' म्हणजे आपल्या प्रभावामुळे सर्व जग हर्षित होते. परमेश्वर हे शांतिस्वरूप आहेत, तेच सत्यस्वरूपही आहेत.

जेथे जेथे सत्य व शांती असेल, तेथे आनंदाचा अनुभव येतोच. असे झाले की मन प्रसन्न होते. अशा अफाट शक्‍तीच्या संपर्कात कोणी दुर्जन, नकारात्मक शक्‍ती असलेले आले तर ते भयभीत होतात, नष्ट होतात. ज्यांनी भगवंतांची आभा, प्रभाव जाणला आहे असे सिद्धगण भगवंतांना वारंवार नमस्कार करतात. आपली सिद्धी, आपली शक्‍ती, याच शक्‍तीतून आलेली आहे याची या सिद्धांना पुरेपूर कल्पना असते; आपली समृद्धी, आपली शांती, आपला आनंद ही त्यांचीच देणगी आहे या कल्पनेतून सिद्धगण त्यांना वारंवार नमस्कार करतात. भगवंतांशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही, शक्‍ती मिळणार नाही, त्यांच्याशिवाय जीवनच असू शकणार नाही.