Hindu Religion- एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व}
अन्य धर्मिय हिंदुत्वाकडे कसे पाहतात

एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

डॉ. सुजात अली कादरी
उर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे...अन्य धर्मिय नक्की कसा पहात आहेत हिंदुत्वाकडे......

हिंदुत्व म्हणजे हिंदू असणे किंवा हिंदू असण्याचा गुण धारण करणे होय. ही विचारधारा भारतात हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. याला ‘हिंदू राष्ट्रवाद’ असेही म्हटले जाते. काही भारतीयांची अशी आग्रही भूमिका आहे, की हिंदुत्व ही एक सांस्कृतिक संज्ञा आहे, जिचा संबंध भारत या राष्ट्र-राज्याच्या पारंपरिक आणि मूल वारशाशी आहे. हाच आधार घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे राजकीय वाटचाल करीत असल्याचे दिसते. (Hinduism in the eyesy of Sufi Scholar)

नवरात्री आणि त्या आसपासच्या काळात दिल्लीतल्या रस्त्यांवर आणि वसाहतींमध्ये एक चित्र सामान्यतः दिसते, ते म्हणजे भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे जमले आहेत आणि धार्मिक विधी करण्यासाठी निघाले आहेत. अर्थातच यात बहुधा हिंदू (Hindu) भाविक असतात. अतिशय उत्साहाने ते दुर्गामातेची मिरवणूक काढतात आणि अनवाणी पायाने लांब अंतर चालत जातात. ते ठिकठिकाणी रामलीला आयोजित करतात.

हे प्रभू श्रीरामाच्या (Sri Ram) कथेचे नाट्य रूपांतर असते. त्याचप्रमाणे, मुस्लिम (Muslim) वसाहतींमध्ये संध्याकाळी भाविक ‘मिलाद’ (पवित्र मेळावे) आयोजित करतात. प्रेषित मोहम्मद यांच्या पृथ्वीवरील आगमनाच्या दिवसाचे स्मरण म्हणून हे केले जाते. यासह शीख, ख्रिश्चन यांच्याही वैविध्यपूर्ण सहभागामुळे जो एकोपा तयार होतो, यामुळे भारत एक बहुविध श्रद्धा असणारा पुष्पगुच्छ बनतो. मात्र, असे परिपूर्ण चित्र राजकीय क्षेत्रात दिसत नाही. राजकीय लाभ मिळवण्यासाठी सर्व धर्मांचे त्यांच्या अनुयायांकडूनच शोषण केले जात आहे. यात सर्वात आघाडीवर आहे हिंदुइझम किंवा हिंदुत्व.

हेही वाचा: का जिंकली भारतीयांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची मनं.....

हिंदुत्वाची व्युत्पत्ती
ऑक्सफर्ड (Oxford) डिक्शनरीनुसार हिंदुत्व म्हणजे हिंदू असणे किंवा हिंदू असण्याचा गुण धारण करणे होय. ही विचारधारा भारतात हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. याला ‘हिंदू राष्ट्रवाद’ असेही म्हटले जाते. ऑक्सफर्ड डिक्शनरीने याची फोड पुढीलप्रमाणे केली आहे - आधुनिक संस्कृतमधील हिंदू + शास्त्रीय संस्कृतमधील ‘त्व’ = हिंदुत्व. हे एक नाम आहे. याचा अर्थ हिंदीमधील ‘हिंदूपन’ या शब्दाशी समानार्थी आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने हिंदुत्व शब्दाची सांगितलेली व्युत्पत्ती ही अंशतः हिंदी व उर्दू आणि अंशतः पारशीमधील आहे.

उर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे. जुन्या पर्शियनमध्ये ‘अचिमेनिद’ साम्राज्याच्या पूर्वेकडील राज्यात राहणाऱ्या लोकांचा उल्लेख हिंदू असा केला जात असे. मेरियम-वेबस्टरच्या वर्ल्ड रिलिजन्सच्या विश्वकोशानुसार, हिंदुत्व ही भारतीय सांस्कृती, राष्ट्र आणि धार्मिक ओळखीची संकल्पना आहे. भौगोलिक आधारावरील धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख सांगणारी ही संज्ञा आहे.

जो हे ‘हिंदूपण’ जपतो तोच खरा भारतीय. काही भारतीयांची (Indians) अशी आग्रही भूमिका आहे, की हिंदुत्व ही एक सांस्कृतिक संज्ञा आहे, जिचा संबंध भारत या राष्ट्र-राज्याच्या पारंपरिक आणि मूल वारशाशी आहे. तसेच, ते हिंदुत्व व भारताचा संबंध ते झिओनिझम व इस्रायलशी जोडतात. हिंदुत्व या शब्दाचा वापर पहिल्यांदा चंद्रनाथ बसू यांनी केला; तर एक राजकीय तत्त्वज्ञान म्हणून त्याची मांडणी विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ मध्ये केली. हा शब्द सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) वापरला जातो. ज्यांना आपण संघ परिवार म्हणून ओळखतो.

हिंदुत्वाचा राजकारणातील उदय
हिंदुत्वाच्या राजकारणाचे प्रतिनिधित्व करणारा भाजप मोठ्या सामाजिक चळवळीपासून वेगळा काढला जाऊ शकत नाही, जिच्यातून त्याचा उगम झाला आहे. भाजप हा या संघटनेच्या कुटुंबातील सदस्य आहे, ज्याला ‘संघ परिवार’ म्हटले जाते. जो अनेक सामाजिक आणि संस्थात्मक स्वरूपात हिंदुत्वाची विचारधारा लोकांसमोर नेतो. सर्वप्रथम या परिवारातील संघटना आहे, विहिंप म्हणजे विश्व हिंदू परिषद. तिच्यासोबतच आहे युवकांची संघटना, बजरंग दल. आरएसएस ही पूर्ण चळवळीचा कणा आहे. जिचे स्वरूप निमलष्करी संघटना आहे. हिंदुत्वाची संघटनात्मक मुळे १९१४ पर्यंत जातात, जेव्हा हिंदू संस्कृतीच्या नावाखाली ब्रिटिशांशी लढण्याच्या हेतूने हिंदू महासभेची निर्मिती करण्यात आली होती. १९२५ ला डॉ. केशव हेडगेवार यांनी आरएसएसची स्थापना केल्यानंतर महासभेच्या कामाला बळ मिळाले.

हिंदूइझम हा असा धर्म आहे, ज्याची रचना उदार आहे. त्याचे पालन करण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य आहे. तो अनेकेश्वरवादी आहे. ही मूल्यव्यवस्था महासभेला कमकुवतपणा वाटली. हिंदूंना एकत्रित करण्यासाठी त्यांनी काही आखणी केली. त्यामुळे मुस्लिम नेत्यांचा किंवा युरोपीयन साम्राज्यवाद्यांचा थोडाबहुत प्रतिकार केला जाईल, असे त्यांना वाटले; पण, हिंदू धर्माचे सामाजिक चरित्र हे उच्च जातीयांना विशेषाधिकार देते. याच्या जोडीला जटिल प्रादेशिक आणि भाषिक वैविध्य असल्यामुळे त्यांना अपेक्षित हिंदूंच्या एकतेत अनेक अडथळे होते.

हिंदुत्व चळवळीने हिंदूइझमचे सुवर्णयुग पुन्हा अवतरित करण्याची मागणी केली, ज्याला रामराज्याच्या रूपात पाहिले गेले. राम हा भगवान विष्णूंचा मानवी अवतार आहे. रामराज्याच्या संकल्पनेवर आधारित हिंदुराष्ट्राची निर्मिती हे हिंदुत्व चळवळीचे उद्दिष्ट होते. या सुवर्णयुगाच्या घटकांची आणि एकसंध हिंदू धर्माची निर्मिती करणे हे आवश्यक आहे आणि ही संघ परिवारासाठी एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

हेही वाचा: ..महासत्ता बनायचे तर गरज आहे सावरकरांचे हिंदुत्व समजून घेण्याची

स्वातंत्र्य चळवळीदरम्यान हिंदुत्व चळवळ काँग्रेसच्या (Indian National Congress) धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक व्यासपीठाच्या विरोधात संघटित करण्यात आली. महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नेतृत्वाखाली खिलाफत चळवळीच्या माध्यमातून १९१९ ला मुस्लिम ब्रिटिश सरकारच्या विरोधात एकवटले. यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांना असुरक्षिततेने ग्रासले. त्यानंतर मुस्लिमांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी मुस्लिम लिगच्या काँग्रेससोबतच्या वाटाघाटींनी हिंदुत्ववादी नेत्यांच्या असुरक्षिततेत भरच घातली. त्यांनी सुरुवातीपासून हिंदुत्वाची संकल्पना तयार केली होती. त्यानंतर मुस्लिम लिगच्या पाकिस्तानच्या मागणीचा काँग्रेसकडून स्वीकार आणि पाकिस्तानची निर्मिती ही घटना ‘अखंड हिंदुराष्ट्रा’च्या तत्त्वाचा विश्वासघात समजली गेली.

काँग्रेस आणि महात्मा गांधींना छद्म धर्मनिरपेक्षतावादी संबोधले गेले. हिंदू स्वाभिमान आणि हिंदू राष्ट्राचा बळी देऊन मुस्लिम अल्पसंख्यकांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली, असा आरोप काँग्रेसवर केला गेला. मुस्लिमांकडून हिंदूंचा स्वाभिमान दुखावला जाणे आणि पीडित असल्याचे चित्र रंगवल्याने बहुसंख्यकांचा न्यूनगंड पोसला गेला. जो चळवळीत नेहमीच मोठ्या प्रमाणात जोपासला गेला. महात्मा गांधी हे भारतीय समाजातील कनिष्ठ जातींना संघटित करत होते, त्यामुळे त्यांच्यावर हिंदुत्ववाद्यांचा रोष होता. कनिष्ठ जाती सशक्त झाल्या, तर हिंदू राष्ट्र परिभाषित करणाऱ्या उच्चजातीय विचारसरणीला धोका उत्पन्न होण्याची भीती त्यांना वाटत होती.

१९३० आणि १९४० मध्ये हिंदू महासभा आणि आरएसएसची थोडीफार लोकप्रियता होती. स्वातंत्र्यानंतर लगेच १९४८ मध्ये एका हिंदू कट्टरपंथीयाच्या हातून महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतरचा काळ हा चळवळीसाठी कलाटणी देणारा होता. गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा आरएसएसचा माजी स्वयंसेवक आणि हिंदू महासभेचा सदस्य होता. फाळणीदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी गांधींनी भारत सरकारवर आणलेला दबाव हे या हत्येचे तत्कालीन कारण होते.

गांधींच्या हत्येनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच, मोठ्या प्रमाणात आरएसएस आणि महासभेविरोधात जनक्षोभ उसळला. नेहरू आणि सरकारने हिंदुत्ववादी संघटनांवर ताशेरे ओढले आणि जरी या संघटना नंतर कार्यरत राहिल्या, तरी समाजातील मोठ्या घटकापासून त्या वेगळ्या पडल्या. हिंदुत्वाचा वैचारिक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. संघ परिवाराची राजकीय शाखा आणि भाजपचा पूर्वावतार जनसंघ या पक्षाची संसदेतील उपस्थिती नाममात्र होती.


भाजपची घोडदौड : मंडल आणि रथ
१९८० नंतर राजकीय वातावरण बदलण्यास दोन घटकांनी मदत केली. एक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी वर्चस्वाला धक्का बसला. त्यामुळे भारतीय राजकारण अनेक सत्ताकेंद्रात विभागले गेले. १९८९ पासून २०१४ पर्यंत कुठल्याच एका पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे केंद्रात अनेक अस्थिर सरकारांनी राज्य केले. प्रादेशिक पक्ष सबळ झाले आणि सत्तेपर्यंत आले. काँग्रेसची मक्तेदारी संपताच नेहरूंच्या विविधतेत एकता या एकसंध दृष्टिकोनाचाही अंत झाला. फेबियन समाजवादी मॉडेल आणि केंद्रीकरण झालेली सत्ताही संपुष्टात आली. यानंतर भाजपसह इतर प्रादेशिक पक्षांना राजकीय अवकाश मोकळे झाले.

तोपर्यंत भाजपचा आधार उत्तर भारतापुरताच- ज्याला ‘काऊ बेल्ट’ म्हणतात- मर्यादित होता. काँग्रेसची मक्तेदारी संपल्यामुळे एक वैचारिक पोकळीही निर्माण झाली. जी हिंदू बहुसंख्याक भावनांनी भरली गेली. प्रादेशिक पक्षांशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेसने धार्मिक राजकारणाचा वापर केला आणि लोकप्रिय हिंदूइझमचा आधार घेतला. भारताच्या उत्तर भागात संघ परिवाराने आपल्या रणनीतीचे प्रयोग केले.

दुसरे कारण १९९० मध्ये केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून सुधारणा घडवून आणणे, हे होते. हा एक सकारात्मक कृती कार्यक्रम होता, ज्यामुळे भारतातील इतर मागासवर्गाला विद्यापीठात आणि शासकीय नोकऱ्यात आरक्षण मिळाले. भारतातील कनिष्ठ जातींना राजकारणात सबळ करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. पारंपरिकदृष्ट्या ही काँग्रेसची मतपेढी होती. भाजपचा आधार हा पारंपरिकदृष्ट्या उच्च जातीय नागरी मतदार होता. कनिष्ठ जातींच्या सक्षमीकरणामुळे हिंदू समूहात फूट पडली. एकूण हिंदू समाजात ओबीसींची संख्या ५० टक्के आहे. भाजपला एवढी मोठी मतपेढी गमावणे परवडणारे नव्हते. मंडल आयोगाला सार्वजनिकरीत्या विरोध करणेही परवडणारे नव्हते. त्यामुळे एवढा मोठा समूह नाराज होण्याची भीती होती.

त्यामुळे संघ परिवाराने हिंदू अस्मितेला एकत्र करण्यासाठी सोळाव्या शतकातील मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा मुद्दा निवडला. या मशिदीचे नाव पहिला मुघल सम्राट बाबर याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. ही मशीद राम जन्मभूमीवर उभी असून, जुने मंदिर उद्ध्वस्त करून ती बांधण्यात आल्याचा दावा भाजपने केला. या जागेवर रामाचे मंदिर बांधून अयोध्येतील इतिहासाची पुनर्रचना करणे हा संघ परिवाराच्या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होता. या मुद्द्याचा राजकीय वापर त्यांनी अतिशय नाट्यमय पद्धतीने केला.

उत्तर भारतात रथयात्रा काढण्यासाठी लालकृष्ण अडवानी एका सुवर्णरथात स्वार झाले. जसे काही राम एखाद्या धार्मिक मोहिमेवर निघाले आहेत. भारत सरकारच्या त्यांना रोखण्याच्या प्रयत्नामुळे त्यांना एखाद्या जिवंत हुतात्म्याचे स्थान मिळाले. त्यामुळे नागरी आणि ग्रामीण कनिष्ठ मध्यमवर्गात त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थक मिळाले. तसेच, ज्या उच्चजातीय विद्यार्थ्यांना मंडल आयोगाचा फटका बसला होता, त्यांचेही समर्थन मिळाले. संघ परिवाराने अखेर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली आणि देशभर हिंदू-मुस्लिम दंगल उसळली.

सत्तेचा व्यावहारिक मार्ग
एक विचारसरणी म्हणून हिंदुत्वाला १९८० पासून समर्थन मिळू लागले होते; पण केंद्रात सत्ता स्थापन करायला १९९९ चे वर्ष उजाडले. महत्त्वाचे म्हणजे १९९९ ला भाजपचे सरकार स्थापन होण्यात वैचारिक घटक महत्त्वाचा नसून संरचनात्मक घटक महत्त्वाचा होता. १९९९च्या निवडणुकीनंतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी भाजपने अनेक वैचारिक तडजोडी स्वीकारल्या आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली २३ प्रमुख प्रादेशिक पक्षांसह सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले. वाजपेयींची संयमी नेत्याची प्रतिमा आणि त्यांनी सामाजिक व आर्थिक मुद्द्यांवर दिलेला भर यामुळे ही आघाडी टिकण्यास मदत झाली. ही एक यशस्वी राजकीय खेळी ठरली. पण, यामुळे संघ परिवारात विशेषतः आरएसएस आणि विहिंपमध्ये तणाव निर्माण झाला.

परिवाराच्या सर्वच विचारांची अंमलबजावणी न करता भाजपने संघापासून; तसेच आपल्या आघाडीच्या मित्रपक्षांपासूनही एक सावध अंतर राखले. हे राजकीय सत्ता आणि वैधता दोन्हींवर अवलंबून होते. दोन परस्परविरोधी गरजांमुळे भाजपने अनेक मुद्द्यांवर परस्परविरोधी विधाने केली आणि धोरणे अवलंबली. काश्मीर वाद, बाबरी मशीद, गुजरात दंगल ही याची उदाहरणे आहेत. मुख्यत्वे केंद्रीय धोरणांचा अवलंब करून, भाजपने सत्तेसाठी व्यावहारिक मार्ग आखला.
१९९९च्या निवडणुकीनंतर व्यापक युतीसाठी भाजपने आपला वैचारिक अजेंडा बाजूला ठेवला. अगदी ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे होणाऱ्या हिंदूंच्या धर्मांतरांविरुद्ध विहिंपने आपल्या उग्र भूमिकेबाबत निष्क्रियता पत्करली.

फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातमध्ये जी धर्मांध दंगल उसळली त्यात सरकारने आपले संवैधानिक कर्तव्य पार पाडले नाही. अयोध्येहून परतणाऱ्या हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या कथित हल्ल्याचा बदला म्हणून राज्यात मुस्लिमविरोधी दंगल उसळली. हा भारताच्या इतिसातील काळा क्षण होता. हा हिंसाचार थांबवण्यासाठी भाजपशासित राज्य सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे ही दंगल मुस्लिमांविरोधात राजकीयदृष्ट्या समर्थित होती, असा निष्कर्ष विश्लेषकांनी काढला. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असतानाही संघ परिवाराच्या दबावामुळे भाजपने नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहू दिले. केंद्रातील भाजपच्या धर्मनिरपेक्ष मित्रपक्षांनी नावापुरता विरोध केला. भाजपला विरोध करण्यासाठी ते स्वतःची सत्ता गमावण्याचा धोका पत्करू इच्छित नव्हते. त्याच्या वर्षभरानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचे सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

गुजरात मॉडेल आणि प्रचंड यश
२००० नंतर भाजपने राज्यातील निवडणुकांत सातत्याने यश मिळवले. त्यांचे यश केवळ अस्वस्थ करणारेच नव्हते, तर दंगलीनंतरच्या मताधिक्यात झालेली वाढ आश्चर्यजनक होती. दंगलीनंतर काँग्रेस पक्ष निवडणुकीत प्रबळ दावेदार बनेल, असा अंदाज बांधला जात होता. दंगलीनंतरच्या काही महिन्यांत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी हिंदूंच्या भावना भडकावण्यासाठी आणि देशभक्तीचा आवेश जागवण्यासाठी एक अत्यंत जातीयवादी मोहीम चालवली.

हिंदू असणे आणि राष्ट्रवादी असण्यातील हा संबंध हिंदुत्ववादी विचारसरणीचे मुख्य तत्त्व आहे आणि गुजरात निवडणुकीत याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील लोकांच्या असुरक्षिततेचा फायदा घेण्यासाठी मोदी यांनी परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत राजकारण यांची सांगड घातली. तसेच, पाकिस्तानविरोधी आणि मुशर्रफविरोधी विधानांचा प्रभावीपणे वापर केला.

हिंदुत्ववादी राजकारणाशी सहमत नसणाऱ्या मध्यमवर्गीयांची निष्क्रियता आणि धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची राजकीय मजबुरी यामुळे कट्टरपंथी राजकारणाच्या वाढीस पोषक वातावरण मिळाले. गुजरात निवडणुकीनंतर भाजप त्यांचे मध्यममार्गी धोरण सोडून विहिंपचे आक्रमक धोरण किंवा ज्याला मोदीइझम/मोदित्व म्हटले गेले ती विचारसरणी पूर्णपणे अंगिकारण्याची भीती निर्माण झाली. राजकीय क्षेत्रात धार्मिक संज्ञांच्या वापराला मिळणाऱ्या स्वीकारार्हतेमुळे राजकीय अवकाश उजवीकडे सरकण्याची भीतीही निर्माण झाली.

गुजरात निवडणूक अनेक कारणांनी वेगळी ठरली. गुजरातची शहरी घनता, औद्योगिकीकरणाचे प्रमाण, आर्थिक प्राधान्यक्रम आणि जातीय ओळखीच्या आधारावरील राजकारणाचा अभाव हे सर्व भाजपच्या पथ्यावर पडले. दंगलीने गुजरातमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण, ही दंगल देशातील इतर राज्यात पसरली नाही. गुजरातमधील प्रयोगामुळे गुजरातमधील संघ परिवाराचे काम अधोरेखित झाले. आरएसएस आणि विहिंपने गुजरातमध्ये आपला पाया तयार करण्यासाठी अनेक वर्षे घातली. कामगार संघटना, सामाजिक कार्य, शाळा सुरू करून, मागास, आदिवासी समुदायाला काँग्रेसपासून दूर नेण्यावर लक्ष केंद्रित केले. संघ परिवाराच्या संघटनांना कनिष्ठ जातींपर्यंत पोहोचण्यातही पुरेसे यश मिळाले. २००२ मध्ये गुजरात राज्याची निवडणूक जिंकल्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने अनपेक्षित यश मिळवले.

२००४ व २००९ मधील अपयश
भाजपने २००४ मध्ये मुदतीच्या आधीच लोकसभा निवडणुका घेण्याचे जाहीर केले. विजयाचा सिलसिला सुरू राहून आणखी एकदा सत्तेत परतण्याची त्यांना अपेक्षा होती. निवडणुकीत भाजपचा पराभव अनेक कारणांमुळे झाला. यात अँटी इन्कम्बन्सीचा मोठा वाटा होता. भाजपच्या मध्यमवर्गीय केंद्रित शायनिंग इंडिया या मोहिमेला नागरी आणि ग्रामीण गरिबांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. याला गुजरातमधील घटनांचा परिणाम म्हणून पाहिले गेले. मतदारांनी राष्ट्रीय पातळीवर वैचारिक आधारवर दिलेला हा कल समजला गेला. भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी निवडणुकीत खराब कामगिरी केली याचा फटकाही भाजपला बसला. याउलट काँग्रेसच्या मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली. २००९ मध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांनी रालोआला अधिक सुस्पष्टपणे पराभूत केले.

२०१४ आणि त्यानंतर...
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने युती करताना खास काळजी घेतली. आपले पारंपरिक उच्चजातीय मतदार त्यांनी राखून ठेवलेच; पण ओबीसी, दलित आणि आदिवासी मतदारांचीही मोट बांधली. कट्टर सांप्रदायिक हिंदुत्वाच्या राजकारणाची सरमिसळ करून हे सामाजिक समीकरण भाजपने बारकाईने आखले. २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीनंतर भाजपच्या बाजूने अधिकच उत्साह निर्माण झाला होता. काही मुस्लिमांकडून एका युवकाची हत्या झाल्यानंतर भाजप आमदार-खासदारांच्या नेतृत्वात संतप्त झालेल्या जाट समुदायाची दंगल उसळली.

या दंगलीमुळे हजारो मुस्लिम उद्ध्वस्त झाले आणि २०१४ मध्ये भाजपसाठी मतांचा पाऊस पडला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना टोमणे मारणाऱ्या आणि हिंदूंना खूश करणाऱ्या भाषेचा वापर केला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, भाजपने संपूर्ण भारतभर आपला विस्तार केला. विशेषत: ज्या राज्यांमध्ये पक्षाला पूर्वी दखलपात्र मानले जात नव्हते. हिंदू हिताला बाधा येत आहे, असे सांगत मोदींच्या पक्षाने राज्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. (उदा. केरळमधील शबरीमाला प्रकरण). काही मुस्लिम चालीरीतींविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली.

भविष्य
आता निवडणुकीच्या राजकारणातील महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की हिंदुत्वाचे आणि भारताच्या बहुधर्मीय जनतेवर होणाऱ्या परिणामाचे भवितव्य काय? भाजपने आपल्या मूळ वैचारिक मुद्द्यांना प्रशासन आणि विकासाला जोडण्याचे धोरण अवलंबले. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जगभरातील ब्रँड इंडियाची लोकशाहीची प्रतिमा सातत्याने पोकळ होत आहे. अतिराष्ट्रवादी हिंदुत्वाचे राजकारण हे विरोधाभासावर आधारलेले आहे. जागतिक मान्यता मिळवण्यासाठी भारताच्या लोकशाहीचे श्रेय मोदी घेत आहेत. पण, देशांतर्गत संस्था आणि लोकशाही मात्र कमकुवत करत आहेत. म्हणून, हिंदुत्वाच्या टोकदार छायेत असतानाही, मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च या वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांचे मोर्चे भारतात सुरूच आहेत.

(लेखक हे सुफी विचारक आहेत. ते इंडो इस्लामिक सेंटरचे उपसंचालक आणि मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत. शुजात हे व्यवसायाने अभियंता आहेत. त्यांच्या कार्यासाठी आणि वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कार्याची दखल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमात घेतली गेली. ‘भारतीय मुस्लिम तरुणांचे डेरेडिकलायझेशन’ हा त्यांचा संशोधन प्रबंध प्रसिद्ध आहे.)