Bollywood and Hinduism- हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय चित्रपट आणि हिंदुत्व}
हिंदुत्व आणि बाॅलीवूड

हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

गिरीश वानखेडे
चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते. आपल्या भारतीय चित्रपटांचा प्रवास ज्या सर्वधर्मसमभावाने सुरू झाला तो बंधुभाव आणि सहिष्णुता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आपली नैतिक जबाबदारी आहे...

भारताच्या क्लासिक चित्रपटांच्या यादीत महत्त्वपूर्ण स्थान असलेला संगीतप्रधान चित्रपट ‘बैजू बावरा’ १९५२ मध्ये पडद्यावर झळकला. या चित्रपटातील सुमधुर, सुश्राव्य गाणी जी आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या मनात जिवंत आहेत. या चित्रपटात ‘तु गंगा की मौज, मै जमुना का धारा; ओ दुनिया के रखवाले; मन तरपत हरि दरशन को आज; बचपन की मुहब्बत को; मोहे भूल गये सावरिया; झुले में पवन के आई बहार; दूर कोई गाए धून ये सुनाए अशी एकाहून एक सरस गाणी होती. यापैकी ‘मन तरपत हरि दरशन को आज’ हे आर्त भजन कानावर पडले की लोकांचे डोळे आपसूकच ओले व्हायचे. (Hinduism reflected in Indian Movies and Bollywood)

हे भजन पडद्यावर बैजू बावरा म्हणजे भारतभूषण गात असले, तरी आवाजाची आर्तता होती गॉड गिफ्टेड मुहम्मद रफी यांची. शब्दरचना केली होती प्रसिद्ध शायर शकिल बदायुनी यांनी; तर स्वरसाज चढवला होता लिजंडरी संगीतकार नौशाद यांनी. तसे पाहिले तर हे भावनात्मक सृजन होते तीन मुस्लिम कलाकारांचे; पण हरिला आठवताना या तिघांच्याही भावना एका हिंदूइतक्याच उत्कट होत्या. याचा अर्थ असा, की चित्रपटसृष्टीतील (Cine World) लोक हिंदू-मुस्लिम हा भेदभाव जाणत नव्हते. दोन्ही समाजांच्या लोकांचे एकमेकांशी सौहार्दाचे, सामंजस्यपूर्ण आपुलकीचे आणि स्नेहपूर्ण नातेसंबंध होते.

नायक-नायिकेपैकी एक जण हिंदू आणि दुसरा मुस्लिम अशा प्रेमकथेवर चित्रपट तयार करणे, ही तेव्हा सर्वसाधारण बाब होती. धर्मात्मा, बॉम्बे, गदर, वीर झारा असे अनेक चित्रपट तुम्हालाही आठवत असतील. मुहम्मद रफी यांनी अनेक भक्तीपर गीते आपल्या आवाजात अजरामर केली आहेत. सुख के सब साथी (गोपी), रामजी की निकली सवारी (सरगम), ईश्वर अल्ला तेरे नाम (नया रास्ता), बडी देर भई नंदलाला (खानदान), मुझे अपनी शरण में ले लो राम (तुलसीदास), मन रे तु काहे ना धीर धरे (चित्रलेखा) सारख्या अनेक गाण्यांना केवळ रफीच न्याय देऊ शकतात, हे आपल्यालाही मान्य आहे. त्यांनी गायलेली गाणी लावल्याशिवाय आजही आपल्याला सणाचे सेलिब्रेशन पूर्ण झाले असे वाटत नाही. (दहीहंडी उत्सव आठवा)

चित्रपटसृष्टीचा इतिहास (History) आपल्याला सांगतो की जेव्हा भारतात चित्रपटांची (Indian Movies) निर्मिती सुरू झाली तेव्हा त्यात धर्माचा शिरकाव झालेला नव्हता. चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते. भारतात पहिला बोलपट तयार झाला ‘आलम आरा’ तो १९३१ मध्ये. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते होते अर्देशीर इरानी; तर मास्टर विठ्ठल, झुबैदा आणि पृथ्वीराज कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

म्हणजेच हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) सामंजस्याची परंपरा पहिल्या बोलपटाच्या निर्मितीपासूनच चित्रपटसृष्टीत अस्तित्वात असल्याचे आपल्याला आढळते. १९४९ मध्ये ‘महल’ हा यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन केले होते कमाल अमरोही यांनी; तर संगीतकार होते खेमचंद प्रकाश आणि नायक-नायिका होते अशोककुमार आणि मधुबाला. ‘किस्मत’चेदेखील उदाहरण देता येईल. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांसोबत सलोख्याने वागत होते. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुत्व कधीही दुराग्रही, आक्रमक नव्हते. आता जरा हिंदू-मुस्लिम प्रेमकथेवर आधारित चित्रपटांची उदाहरणे पाहू. १९६३ मध्ये प्रदर्शित ‘मुझे जीने दो’ या चित्रपटात सुनील दत्त यांनी ठाकूर जर्नेल सिंग या हिंदू डाकूची; तर वहिदा रहेमान यांनी चमेलीजान ही भूमिका साकारली होती.

या चित्रपटाचे संगीतकार होते जयदेव. या चित्रपटातले सुश्राव्य गाणे होते ‘नदीनारे ना जाव शाम तोरे पैय्या पडूं’. हे गाणे वहिदा रहेमान या मुस्लिम अभिनेत्रीवर मुस्लिम भूमिका साकारताना चित्रीत करण्यात आले होते. याशिवाय ‘अब कोई गुलशन ना उजडे अब वतन आझाद है’ या गाण्यातून नुकत्याच स्वातंत्र्य मिळवलेल्या आणि चीनबरोबर झालेल्या युद्धानंतरची भारताची स्थिती दर्शवणाऱ्या चित्रपटात लोकांना सर्वप्रथम हिंदुत्वाची छटा अनुभवायला मिळाली होती; पण हा चित्रपट मुक्त विचारांचा होता. त्यानंतर तीन वर्षांनी १९६६ मध्ये ‘आम्रपाली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातल्या मुख्य व्यक्तिरेखा बुद्ध धम्माशी निगडित होत्या.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

१९७३ मध्ये प्रदर्शित ‘गरम हवा’ चित्रपटाच्या रूपात भारतीय प्रेक्षकांची प्रथमच कलात्मक चित्रपटांशी ओळख झाली. या चित्रपटात बलराज साहनी यांनी एका उत्तर भारतीय मुस्लिम व्यक्तीची भूमिका वठवली होती, ज्यांचे कुटुंब फाळणीमुळे भारतात राहावे की पाकिस्तानात जावे, या विवंचनेत आहे. पहिल्यांदाच फाळणीचे दु:ख पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाच्या कथानकात भावनिक तरलता होती. या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटानंतरच चित्रपटात हिंदू-मुस्लिम वाद दाखवण्याचा प्रघात सुरू झाला.

१९७३ नंतरच्या काळात अमिताभ बच्चनने जंजीर, दिवार, शोले अशा चित्रपटांद्वारे अँग्री यंग मॅन म्हणून फिल्म इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवायला सुरुवात केली होती; पण या काळातल्या चित्रपटातही हिंदू-मुस्लिम एकमेकांचे जीवलग मित्र म्हणून दाखवले जात होते. रमेश सिप्पी, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई असे नव्या दमाचे दिग्दर्शकदेखील याच काळात चित्रपटउद्योगात जम बसवू लागले होते. हे बिनीचे शिलेदार मुक्त विचारांचे होते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातले हिंदू आणि मुस्लिम धर्म कधीच आक्रमक नव्हते. म्हणूनच ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात लहानपणी वेगळे झालेले भाऊ तीन विविध धर्मसंस्कारात वाढलेले दाखवले गेले. हे भाऊ प्रेक्षकांना पचले आणि आवडलेदेखील.

‘मुक्कद्दर का सिकंदर’ हादेखील याच पठडीतील चित्रपट. हा काळ धार्मिक स्वातंत्र्याच्या विचारांचा होता, हे चित्रपटातूनही प्रतित होत होते. म्हणूनच हिंदू-मुस्लिमच नाही, तर हिंदू-ख्रिश्चन प्रेमकथा असलेले बॉबी, ज्युली असेही चित्रपट तयार झाले. नंतरच्या काळातही असेच चित्रपट बनत राहिले. ज्यामध्ये हिंदू-मुस्लिम धर्म असले, तरीही धर्मपालन करणारी पात्रे सहअस्तित्वावर, सहजीवनावर विश्वास ठेवणारी होती. हा काळ खूपच हळुवारपणे, सुसंस्कृतरीत्या हिंदू विचारप्रणालीचा प्रसार करणाऱ्या चित्रपटांचा होता.

‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटाची नायिका जेवढ्या सहजतेने ‘मोसे मेरा शाम रुठा’ गाताना दिसते तितक्याच भक्ती भावाने ‘बैराग’ चित्रपटात दिलीपकुमार ‘ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे’ आळवताना दिसले, ते याच काळात. लवकुश (१९६३), माया बाजार (१९५७), भक्त प्रल्हाद (१९६७), संपूर्ण रामायण (१९७२), श्री व्यंकटेश्वर महात्म्यम् (१९६०), सीता स्वयंवर (१९७६), कुरुक्षेत्र (१९७७), तुलसी विवाह (१९७१) असे अनेक हिंदू धर्माधारित चित्रपट या काळात तयार झाले. हे चित्रपट सर्व समाजांनी आवडीने पाहिले, कारण या चित्रपटात कोणत्याही विचारसरणीचा दुराग्रही अट्टहास नव्हता, तर मनुष्याला आपले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची शिदोरी हे चित्रपट कोणत्याही भेदभावाशिवाय देत होते.

हिंदुत्व आक्रमक बनले ते २००१ मध्ये आलेल्या ‘गदर - एक प्रेमकथा’ या चित्रपटात. यात एक शीख तरुण मुस्लिम युवतीवर प्रेम करतो, असे कथानक होते. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटातील हिंदू (शीख) नायक आक्रमकरीत्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेताना दिसला. ही आक्रमकता पुढे ‘इक्बाल’, ‘झुबैदा’ अशा चित्रपटांमधून दिसत राहिली. या दशकात अमेरिकेत ९/११च्या हल्ल्याची घटना घडली आणि राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक आक्रमकता वाढू लागली. २०१० मध्ये जेव्हा ‘माय नेम इज खान’ प्रदर्शित झाला, तोवर या आक्रमकतेने विक्राळ रूप धारण केले होते. त्यानंतर आजतागायत आलेल्या अनेक चित्रपटांतून धार्मिक आक्रमकतेचे रौद्ररूप दाखवले गेले आहे.

हे राम, जोधा अकबर, इश्कजादे, रांझना, केदारनाथ, मुल्क, कश्मीर फाईल्स असे अनेक चित्रपट आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो. इश्कजादे (२०१२) चित्रपटात हिंदू-मुस्लिम प्रेमकथा आक्रमकतेने मांडली होती. रांझना (२०१३) चित्रपटात छोट्या गावातील तीव्र धार्मिक तेढ दाखवणारी प्रेमकथा होती. केदारनाथ (२०१८) चित्रपटाला आपण प्रपोगंडा चित्रपट म्हणू शकतो. कारण चित्रपटात प्रेमकथा असली, तरीही मूळ उद्देश हिंदू-मुस्लिम धर्मभावना हाच होता. मुल्क (२०१८) या चित्रपटात मात्र दोन्ही धर्मांच्या भावना संतुलित रीतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हेही वाचा: एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

भारतीय फिल्म इंडस्ट्रीत मुस्लिम सामाजिक चित्रपट हा विशेष प्रकार काही वर्ष चलनात होता. भारतातील इस्लामिक संस्कृतीचे चित्रण या चित्रपटात केलेले असायचे. १९५० आणि ६० च्या दशकात या प्रकारच्या चित्रपटांची भरभराट झाली. या चित्रपटांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करता येते. एक ‘क्लासिक मुस्लिम सामाजिक चित्रपट’ जे नवाबी संस्कृतीचे दर्शन घडवणारे किंवा उच्चभ्रू मुस्लिम कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर केंद्रित असणारे आणि दुसरी श्रेणी ‘सद्यस्थितीतील मुस्लिम सामाजिक चित्रपट’ जे आर्थिक समस्या, धार्मिक भेदभाव आणि सांप्रदायिक हिंसाचार यांच्यासह इतर मध्यमवर्गीय प्रश्नांचा सामना करणाऱ्या मुस्लिम कुटुंबांचे चित्रण करणारे आहेत. या चित्रपटांमध्ये उर्दू गझल, कविता यांचा समावेश असायचा. त्यातून सर्वच लोकांना इस्लामी संस्कृतीची ओळख व्हायची.

मिर्झा गालिब, चौदहवी का चांद, मेरे महेबुब, बहु बेगम, मेरे हुजूर, पाकिजा, लैला मजनू, महेबुब की मेहंदी ही काही क्लासिक मुस्लिम सामाजिक चित्रपटांची उदाहरणे; तर गरम हवा, दस्तक, निकाह, बाजार, सरदारी बेगम, तवायफ ही काही कंटेम्पररी मुस्लिम सामाजिक चित्रपटांची उदाहरणे. बी. आर. चोप्रांसारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांचा या प्रकारचे चित्रपट बनवण्यात विशेष हातखंडा होता. ८०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत असे चित्रपट बनत राहिले. रहिम चाचा, दादा, अब्दुल्ला यांसारखे मुस्लिम संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट याच काळात हीट झाले होते.

अब्दुल्ला चित्रपटात तर मुख्य भूमिकेत राज कपूर होते; पण त्यानंतर रझिया सुलतान, ताजमहल, मुघल ए आझमसारख्या चित्रपटांचा काळ संपला. या धार्मिक सामंजस्याला ओहोटी लागली आणि २००१ नंतर असे चित्रपट बनणे जवळपास बंद झाले. याच काळात चित्रपटात हिंदू आक्रमकता वाढू लागली. या आक्रमकतेला खतपाणी घातले ते नव्या फळीच्या लेखकांनी. कारण या नव्या लेखकांनी धार्मिक सलोखा निर्माण करणाऱ्या चित्रपटांकडे कानाडोळा करत गदरसारख्या चित्रपटाला आपला आदर्श समजण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यांच्या चित्रकृतीही त्याच पठडीतल्या होत्या. ‘गदर’ नंतरची लेखकांची पिढी ‘केदारनाथ’, ‘हुडदंग’, ‘काश्मीर फाईल्स’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आनंद मानत आहे. हिंदी चित्रपटांचा धार्मिक आलेख पाहिल्यावर हे स्पष्ट जाणवते, की हा प्रवास सुरू झाला सलोख्याच्या नोटवर, पण आता तो आक्रमकतेच्या मार्गावरून होत आहे.

२००० पर्यंतच्या चित्रपटांमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तिरेखा एकमेकांच्या मित्र, स्नेही, प्रेमळ शेजारी असायचे. (जंजीरमधल्या हिंदू नायकाला मदत करणारा शेरखान आठवा.) त्यानंतर चित्रपटात बदल झाले आणि कथानकात आक्रमकतेबरोबर कट्टरतेचाही समावेश झाला. सलीम जावेद या जोडीने हिंदी चित्रपटात मुस्लिम व्यक्तिरेखा नेहमीच सकारात्मक रूपात; तर लाला, चौधरी यांसारख्या हिंदू व्यक्तिरेखांना बलात्कारी, इतरांचे शोषण करणारे अशाच रूपात पेश केल्याचा आरोप गेल्या काही वर्षांत होत आहे, जो पूर्ण चुकीचा आहे. ते दोघेही सुशिक्षित लेखक होते. चित्रपटाच्या कथा लिहिताना त्यांनी नेहमी मुक्त विचारांनी लेखन केले आहे. त्यांनी कधीही योजनापूर्वक धर्माचा विचार करून कोणतेही पात्र लिहिले नाही. त्यांच्यावर याप्रकारे आरोप करणारे जे कट्टर हिंदूवादी आहेत, ते चित्रपटाला कलेचे माध्यम न मानता आपल्या कट्टर विचारांना महान समजतात.

जे कलेचे खरे दर्दी जाणकार असतात ते धार्मिक वादात न पडता कलेच्या सृजनाचा आनंद घेतात. नव्या पिढीचे चित्रपट निर्माते मात्र वरचेवर उजव्या विचारसरणीचे पाईक होत चालले आहेत. त्यामुळे पूर्वी चित्रपटात गुंड, डाकू, स्मगलर असलेला खलनायक आता मुस्लिम झाला आहे. ही धार्मिक आक्रमकता हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी हितकारक नाही. यामुळे चित्रपट क्षेत्राची हानी होत आहे.

हिंदी चित्रपटात हिंदू आक्रमकता किंवा कट्टरता वाढण्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जगभरात सर्वत्र हिंदू धर्माला मिळत असलेले विशेष स्थान. याउलट मागच्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये मुस्लिम व्यक्तींचा वाढता सहभाग आढळत असल्यामुळे सरसकट सर्वच मुस्लिम निंदेस पात्र ठरत आहेत. जगभरातल्या महत्त्वपूर्ण पदांवर हिंदू कार्यरत असल्याचे दिसत आहे. हॉलीवूडच्या निर्मात्यांवरही हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्याचे आता मान्य केले जात आहे. जेव्हा इंटरस्टेलर आणि इनसेप्शन हे हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले होते तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी हे चित्रपट हिंदू तत्त्वज्ञानापासून प्रेरित असल्याचे म्हटले होते.

मॅट्रिक्स ट्रायोलॉजी प्रदर्शित झाली तेव्हाही या चित्रपटाची संकल्पना हिंदू तत्त्वज्ञानामधल्या माया या घटकांवर आधारित असून आपण माया या घटकाने खूपच प्रभावित झाल्याचे चित्रपटाचे निर्माते पिटर रॅडर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. पिटर रॅडर यांनी उत्तर अमेरिकेतले हिंदू गूढवादाचे पहिले गुरू आचार्य योगानंद यांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटदेखील तयार केला आहे. जगविख्यात हिपहॉप कलाकार रसेल सिमन्स हे आपल्या नृत्य सादरीकरणात योगाचा वापर करत होते. स्टिव्ह जॉब्स यांनी जेव्हा आपले उत्पादन आयपॅड लॉन्च केले तेव्हा आपल्या क्रिएटिव्हिटीवर हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्याचा स्वीकार केला होता.

स्टार वॉर्समधील ल्युक्स स्कायवॉकरसारखी पात्र हिंदू मायथॉलॉजीपासून प्रेरणा घेऊन लिहिल्याचे जॉर्ज लुकास यांनी सांगितले आहे. याशिवाय, अवतार हेदेखील हिंदू पुराणकथांचे पाश्चिमात्य रूप आहे, हे आपण जाणतोच. आपल्या देशातदेखील पुराणांवर आधारित रावण, बाहुबली, ब्रह्मास्त्र, कलियुग, अर्जुन द वॉरियर (ॲनिमेशनपट), रिटर्न ऑफ हनुमान (ॲनिमेशनपट) यांसारख्या चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि जगात लोकप्रिय ठरले आहेत. महाकाव्य रामायण हे शाश्वत जीवन मूल्याचे आगार असल्याचे जगाने यापूर्वीच मान्य केले आहे. मग जर जागतिक स्तरावर हिंदू तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र आणि पुराणांचा प्रभाव दिसत असेल, तर कोणत्याही हिंदूच्या मनात त्यांच्याबद्दल स्वाभिमान जागृत होणे स्वाभाविक आहे; पण जेव्हा या स्वाभिमानाची जागा गर्व बळकावतो तेव्हा मग आक्रमकता येते आणि मग गोंधळ होतो. स्वाभिमान आणि गर्व यामधला फरक जाणणे आवश्यक आहे. आपली महानता सिद्ध करण्यासाठी इतरांना हीन लेखणे गरजेचे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भारतीय चित्रपटांचा प्रवास ज्या सर्वधर्म समभावाने सुरू झाला तो बंधुभाव आणि सहिष्णुता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आपली नैतिक जबाबदारी आहे.
(लेखक भारतीय चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)