Navaratri- महाराष्ट्राला देवी म्हणून परिचित असलेल्या अलकाताईंचा गुंडांशी सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलका कुबल मुलाखत}
अलकाताईंना अजूनही देवी मानतात.,,,

महाराष्ट्राला देवी म्हणून परिचित असलेल्या अलकाताईंचा गुंडांशी सामना

महाराष्ट्र आणि आदिशक्ती यांचं नातं अतूट आहे. मग पुराणकथा असो, वारकरी संप्रदाय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रसन्न झालेली तुळजाभवानी. इथे घराघरात देवीची पूजा होते. तीची नाना रूपं कुलस्वामिनी, ग्रामदेवता म्हणून मनामनात घर करून आहेत. पण इथे कुणालाही विचारलं.. की कोणती अभिनेत्री तुम्हाला साक्षात देवीच्या रुपासमान वाटते.. तर उत्तर एकच मिळतं.. ‘अलका कुबल’.....

तीनशेहून अधिक चित्रपट करणाऱ्या अलकाताईंनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील देवींवर आधारीत काही चित्रपट केले, ते चित्रपट हीट होतील असे अलकाताईंनाही कधी वाटले नव्हते, पण लोकांनी या चित्रपटांना (Movies) अक्षरशः डोक्यावर घेतलं. अलका कुबल म्हणजे साक्षात देवीचाच अवतार आहे अशी ग्रामीण भागात (Rural Area) धारणा झाली. आजही त्या गावखेड्यात गेल्या तर वयस्कर मंडळीही देवी समजून त्यांच्या पाया पडतात. म्हणूनच अलकाताईंचे नवरात्रीशी खास नाते आहे. तेच खास नाते, देवीची प्रचिती आणि वेळप्रसंगी दुर्गा होऊन आजारपणाशी, गुंडांशी आणि परिस्थितीशी लढणाऱ्या अलका कुबल यांचा प्रवास जाणून घेणार आहोत ‘सकाळ’च्या या नवरात्री विशेष मुलाखतीत..(Marathi Actress Alaka Kubal tell about her movie charecters as Devi)

देवीचे उपवास आणि घटस्थापना..

अलका ताई म्हणतात, ‘नवरात्री (Navratri) हा उत्सव माझ्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि आनंद देणारा आहे. कारण हे नऊ साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते. त्यामुळे दारात रांगोळी काढण्यापासून, देवपूजा, घट बसवणे, माळा घालणे, नैवेद्य सगळं पारंपरिक पद्धतीने मी करते. हे आजचं नाही, माझ्या लग्नाला ३० वर्षे झाली आणि त्या आधी जवळपास मी पाच सहा वर्षे नवरात्रीचा उत्सव करायचे. पूर्वी तर मी ९ दिवस केवळ पाणी पिऊन आणि फलाहार घेऊन उपवास (Fasting) करायचे. आता ते शक्य नसले तरी घट बसताना आणि उठताना माझे उपवास असतातच. या काळात मी सहसा घर सोडून कुठेही जात नाही. कारण देवीच्या सानिध्यात, त्या सकारात्मक ऊर्जेत आपणही प्रसन्न होत असतो.’   

हेही वाचा: नवरात्रीचा सण अन्नसुरक्षेसाठीचा आशिर्वाद...

‘त्या’ दिवशी ‘अलकाताई म्हणजेच देवी’ हे समीकरण तयार झालं..

अलका कुबल आणि देवी हे समीकरण तयार झालं ते मांढरदेवी काळूबाई मुळे. याबाबत त्या सांगतात...... अरुण कचरे आणि प्रकाश हिलगे यांनी हा चित्रपट माझ्याकडे आणला तेव्हा मला या चित्रपटात काही विशेष वाटले नाही. कारण फक्त देवी होऊन बसणं, आशीर्वाद देणं यात काय विशेष असणार असं मला वाटलं. पण चित्रपटात देवी ही मानवरूपात येऊन नायिकेच्या मदतीला धावून जाते, असं दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात माझे अवघे आठ दहा सीन होते. पण हा सिनेमा इतका चालला की ग्रामीण भागात अक्षरशः प्रेक्षकांची झुंबड उडायची. हा चित्रपट खरतर नायिकाभिमुख होता, पण नायिकेपेक्षा काळूबाई लोकांना अधिक भावली. त्यांनंतर खऱ्या अर्थाने मला अशा धाटणीच्या चित्रपटांची विचारणा होऊ लागली. मग मी खानदेशातली मनुआई, अष्टभुजा, वैभवलक्ष्मी आणि अशा अनेक देवींवर चित्रपट केले. काही देवींची गाणीही केली आणि हे समीकरण तयार झाले.  

चित्रीकरण सुरू असतानाही लोक पाया पडायला यायचे..

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ हा चित्रपट पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड गाजला. चित्रीकरणावेळी तर लोकांची गर्दी व्हायची. आणि मी जेव्हा देवीचा साज करून, नऊवारी नेसून, मुकुट घालून बाहेर यायचे तेव्हा लोक अक्षरशः माझ्या पाया पडायचे. अगदी वयस्कर माणसंही माझ्या पाया पडायचे, दृष्ट काढायचे, हे मलाच आवडायचं नाही, त्यामुळे मी त्यांना वारंवार सांगायचे की अरे मी फक्त भूमिका करतेय. पण लोक ऐकायलाच तयार नसायचे. ते तेव्हाचीच गोष्ट नाही तर ग्रामीण भागात कित्येक लोकांच्या मनात आजही माझी प्रतिमा तीच आहे. आजही कामानिमित्त गावखेड्यात गेलं की बायका नमस्कार करू लागतात. एवढंच नाही तर मांढर गडावर काळूबाईचे पूजारीही मला जेव्हा म्हणतात की ताई, तुमच्यात आम्हाला काळूबाईचा भास होतो. तेव्हा क्षणभर धक्का बसतो. पण सर्वांना एकच सांगते मी एक माणूस आहे आणि मी केवळ देवीची भूमिका करते.......असंही त्या विनम्रतेनं सांगतात.

श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नको..

मी स्वतः आई काळूबाईची भक्त आहे. मी दरवर्षी गडावर जाऊन आईची ओटी भरते, तिच्यापुढे नतमस्तक होते. मी धार्मिक असल्याने पूजा अर्चा, अगदी कितीही घाईत असले तरी देवापुढे हात जोडूनच बाहेर पडायचं अशा काही गोष्टी मी प्रकर्षाने पाळते. जेव्हा पण त्या देवाकडे पाहतो तेव्हा त्याचं तेज पाहुन आपल्या मनाची सर्विसिंग होते असं मी मानते. आमची कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. मी जेव्हा जेव्हा देवीच्या दर्शनाला जाते तेव्हा मनोभावे तीची पूजा करते, ओटी भरते पण कधीही तिच्याकडे काही मागत नाही. तू मला हे दे मग मी तुला ते देईन, हे मला अजिबात पटत नाही. परमेश्वराकडे मागायची गरज नसते, जे योग्य आहे ते मार्ग तो आपल्याला दाखवतोच.

परमेश्वरावर श्रद्धा असताना समाजाने कुठेही अंधश्रद्धेकडे झुकू नये असं मला वाटतं. कारण आजही आपण बघतो देवाच्या दारात कर्मकांड होतं, बळी दिला जातो, काळी जादू केली जाते. हे सगळं पाहून मला प्रचंड राग येतो. त्यामुळे अशा गोष्टींच्या आहारी न जाता केवळ देवावर निस्सीम भक्ती ठेवा एवढंच मी म्हणेन...असाही सल्ला अलकाताईंनी या मुलाखतीत दिला.

लोक म्हणाले या आजारपणातून अलका उठणार नाही पण तिनं मला बळ दिलं..

२००७ मध्ये एक वेळ माझ्यावर अशी आली की, माझा मोठा अपघात झाला. त्या अपघतात माझ्या पाठीच्या शस्त्रक्रिया झाल्या. मी पूर्णतः बेडवर झोपून होते, माझं वजन प्रचंड वाढलं होतं, मला चालता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीत माझ्याकडे सहा सिनेमे होते. पण माझी तब्येत पाहून कुणीही माझ्यासाठी थांबलं नाही. प्रत्येकाने अपापल्या पद्धतीने ते सिनेमे पूर्ण केले. शिवाय अलका कायम आता व्हीलचेअरवर बसूनच राहणार अशा गोष्टी पसरवल्या गेल्या. त्यामुळे माझ्या मनावरही याचा प्रचंड मोठा आघात झाला. पण माझे डॉ. रामाणे आणि परमेश्वराची कृपा यामुळे मी उभी राहू शकले. त्यांनी मला आत्मविश्वास दिला. देवाने मला परत माझ्या पायावर उभं केलं यासाठी त्याचे आणि मायबाप रसिकांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

वितरकाने पाठ फिरवली, पण मी पदर खोचून तिकीट बारीवर उभी राहिले..

अभिनयात बरंच नाव मिळवल्यानंतर एका चित्रपट वितरकाने मला निर्मिती करण्यासाठी खूपच विनंती केली. निर्माते तुमच्या चित्रपटांवर इतके पैसे कमावतात मग तुम्हीच का नाही तुमच्या चित्रपटाची निर्मिती करत, असं म्हणून त्यांनी मला निर्मिती करण्याचं सुचवलं. मी अभिनयात समाधानी असल्याने माझ्या या गोष्टीला नकार होता. पण शेवटी ते स्वत: जबाबदारी घ्यायला तयार झाले आणि मग आणि माझ्या बहिणीने म्हणजे शिल्पा मसूरकरने मिळून २००४ मध्ये ‘सुवासिनीची सत्वपरिक्षा’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट प्रदर्शनाचा दिवस आला. आम्ही सर्वच खूप उत्सुक होता. मी, माझी बहीण, माझे पती समीर, कलाकार आम्ही सर्व चित्रपटगृहाकडे जात असतानाच वाटेत त्या वितरकांचा कॉल आला.

ते म्हणाले मी तुमच्या चित्रपटाचं डिस्ट्रिब्यूशन नाही करणार. आता डिस्ट्रिब्यूशनच झालं नाही तर चित्रपट चालणार कसा या विचाराने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. निर्मिती करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने काहीच माहिती नव्हती. पण एक गोष्ट माहीत होती की गावच्या जत्रांमध्ये चित्रपट दाखवले जातात आणि अशा ठिकाणी बरीच गर्दी होते. आम्ही लगेचच जालन्याला गेलो, तिथल्या एका जत्रेत चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केली. काय होईल, कसं होईल काहीच कल्पना नव्हती. दिवसभरात एकही माणूस तंबूकडे फिरकला नाही. मला वाटलं आपलं सगळं संपलं आता. पण संध्याकाळी लोकांची जी गर्दी झाली ती पाहून डोळे दिपले. अक्षरशः तंबू वाढवूनही अपुरा पडला पण लोक थांबत नव्हते. तिथून एक एक जत्रा करत या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले.

माझ्यावर आलेल्या प्रसंगाला मी पदर खोचून सामोरे गेले. पण काही लोकांना हे देखील सहन झालं नाही. ‘अलका कुबल चित्रपट चालवण्यासाठी स्वतः तिकीट बारीवर बसते’ अशी टीका माझ्यावर झाली, पण त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. कारण मला माहितीय तेव्हा मी काय केलं ते. चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना तेव्हा आम्ही माझी सही असलेला माझा फोटो देत होतो. तो फोटो देण्यासाठी मी स्वतः तिकीट बारीवर उभी राहायचे. त्यावेळी चार आण्याला एक फोटो प्रिंट होऊन यायचा. असे मी त्यावेळी दीड लाख रुपयांचे फोटो वाटले. मला हे करावंचं लागलं कारण माझ्या मेहनतीचे ५० लाख त्या चित्रपटात अडकले होते. त्यावेळी ही रक्कम प्रचंड मोठी होती. पण अतोनात मेहनत घेऊन मी दुपटीने नफा मिळवला. त्यावेळी ठोकर बसली म्हणून खूप काही शिकले आणि एक यशस्वी निर्माती होऊ शकले.

त्या मध्यरात्री मी गुंडांना अक्षरशः जेरीस आणलं..

पूर्वी जत्रांमधले शो झाले की रात्री घरी निघायचे. मला घरी यायला कायमच मध्यरात्र व्हायची. साधारण मध्यरात्री तीनचा सुमार होता आणि मी घरी पोहोचणार तोच दिसलं की, रस्त्यावर दोन गुंडांनी एका रिक्षावाल्याला दोरीने बांधून ठेवलं होतं. त्यांच्या हातात चाकू होता. त्या रिक्षावाल्याच्या नाकातून रक्त येत होतं. हे मी पाहिलं आणि कसलाही विचार न करता गाडीतून उतरले आणि त्यांच्या मागे धावत सुटले. ते गुंड तिथल्या गल्ली बोळात शिरले पण त्याच परिसरात माझे बालपण गेल्याने मीही त्यांच्या मागे धावले. त्यावेळी माझ्याकडे मोबाइल असल्याने धावता धावताच पोलिसांना फोन केला. ते गुंड पळून हैराण झाले पण मी त्यांना सोडलं नाही. ते एका गल्लीच्या दाराशी येऊन थांबले, त्यांच्या मागे मी आणि समोर पोलिस उभे होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. रिक्षावाल्याच्या सोबत जाऊन मी त्या दोघांविरोधात स्वतः जबाब नोंदवला. या सगळ्या प्रकारात रिक्षावाल्याचे प्राण वाचले याचं मला खूप समाधान वाटलं.

सुखी संसाराचा मूलमंत्र..

माझी सर्व महिलांना एकच विनंती आहे की, तुम्ही कधीही अन्याय सहन करू नका. पण ते करत असताना मला हेही वाटतं की महिलांनी त्यांचा सात्विकपणा, सोज्वळपणाही सोडता कामा नये. हल्ली मी पाहते की, मुलींना वाटतं की मी कमावते म्हणजे मी कसंही वागलं तरी चालेल. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं पण आपले संस्कार विसरता कामा नये. हल्ली घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढलंय कारण आपल्यातली सहनशक्ती आपण संपवत चाललोय. अन्याय होताना बघ्याची भूमिका घेऊ नका आणि आपल्याकडूनही ते होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. सासूने सुनेचा आणि सुनेने सासूचा आदर हा करायलाच हवा. मुलीने केवळ नवरा न बघता त्याच्या आई वडिलांचाही विचार करायला हवा आणि मुलाचा आई वडिलांनी सुनेला मुलीसारखं स्वातंत्र्यही द्यायला हवं. तरच आपल्याला चांगला संसार सांधता येईल.