ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय? Rishi Panchami 2022 Significance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषिपंचमीचे व्रत का करतात}
जाणून घ्या ऋषिपंचमीचे महत्त्व.....

ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय?

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

व्रते केल्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात. कळत घडलेली पापे नष्ट होत नाहीत. पूजा करणे म्हणजे केवळ कर्मकांड करणे नव्हे. तर थोर ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे. आधुनिक काळात ऋषिपंचमी ही पूर्वींपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरी होण्याची खरी गरज आहे...का ते घ्या जाणून

भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. ही पंचमी मध्यान्हकाल व्यापिनी हवी. दोन दिवशी मध्यान्हकाल व्यापिनी असली किंवा नसली तर पूर्व दिवशीची घ्यावी असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. पूर्वी अनेक महिला हे व्रत करायच्या...जाणून घ्या या व्रताची महती (Rishi Panchami 2022 Significance Vrat Vidhi Puja in Marathi)

आपल्या काही धार्मिक व्रतांच्या आचरणामध्ये कालमानानुसार बदल करण्याची खरी जरुरी आहे. त्यामध्ये ‘ऋषिपंचमी’ हे एक व्रत आहे. कालप्रवाहात इतर काही व्रतांप्रमाणेच ऋषिपंचमी हे व्रतही लुप्त होण्याची शक्यता आहे. कालमानानुसार हे व्रत करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ऋषिपंचमीचे व्रत हे सात वर्षे करावयाचे असून अज्ञानस्थितीत घडलेला मासिक पाळी स्पर्शास्पर्शाच्या दोषाचे निवारण व्हावे ही त्यामागची श्रद्धा आहे.

परंतु ही गोष्ट आता कालबाह्य झाली आहे. म्हणून ऋषिपंचमीचे व्रत हे वेगळ्या उद्देशाने करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पूर्वी महिला (Women) हे व्रत अतिशय कडकपणे आचरण करीत असत. घरी पाटावर तांदळाचे आठ पुंजके घालून त्यावर १) कश्यप २) अत्री ३) भारद्वाज ४) विश्वामित्र ५) गौतम ६) जमदग्नी ७) वसिष्ठ आणि ८) अरुंधती यांच्यासाठी आठ सुपाऱ्या मांडून पुढील मंत्र म्हणून त्याची षोडशोपचार पूजा करीत.

Rishi Panchami Mantra chanting

Rishi Panchami Mantra chanting

हे सप्तर्षी महान होते. त्यांचे पूजन (Worship) ऋषिपंचमीच्या दिवशी करण्यास सांगण्यात आले आहे. पूजन करणे म्हणजे त्यांच्या कार्याची ओळख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करणे होय. कश्यप हे ब्रह्माचे पुत्र मरिची यांचे पुत्र होते. ऋग्वेदात कश्यप ऋषींचा उल्लेख आहे. अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. चंद्रमा, दत्तात्रेय आणि दुर्वास हे अत्री ऋषींचे पुत्र होते. अत्री ऋषींनी अनेक भजनांची रचना केलेली आहे.

भारद्वाज ऋषींनी आयुर्वेद, व्याकरण, धनुर्वेद, राजनीतीशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी ग्रंथ लिहिले. विश्वामित्र ऋषी हे तेजस्वी महापुरुष होते. ते धनुर्विद्येत प्रवीण होते. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. गौतम ऋषी यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे महान तपश्चर्या केली. ऋग्वेदात त्यांचा उल्लेख आहे. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते. ते महान तपस्वी होते. रेणुका ही त्यांची पत्नी. वसिष्ठ ऋषी हे दशरथ राजाचे राजगुरू होते. अरुंधती ही ब्रह्माची मानस कन्या आणि वसिष्ठ ऋषींची पत्नी होती. या महान ऋषींचे म्हणूनच ऋषिपंचमीला पूजन करण्यास सांगण्यात आले आहे.

ऋषिपंचमी व्रताची कहाणी

ऋषिपंचमी व्रताची कहाणी कथा व्रतराज ग्रंथात सांगण्यात आली आहे. हे व्रत केल्याने सुख-शांती प्राप्त होते, हातून नकळत घडलेली पापे नष्ट होतात असे सांगण्यात आले आहे. महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची व्याख्या अगदी सुलभ रीतीने करून दिलेली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य होय. व्रते केल्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात. कळत घडलेली पापे नष्ट होत नाहीत ही गोष्ट इथे नीट लक्षात घ्यायला पाहिजे.

आधुनिक काळात या व्रतामागचा आणि कथांमागचा उद्देश नीट समजून घेण्याची खरी गरज आहे. या व्रतामध्ये सात ऋषी आणि अरुंधती हिची पूजा करण्यास सांगितले आहे. पूजा करणे म्हणजे केवळ कर्मकांड करणे नव्हे. तर या थोर ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे होय. पाश्चात्त्य देशात ‘ॲाल सेंटस् डे’ जसा पाळला जातो तसाच हा दिवस आहे. विद्वान साधू-संतांच्या स्मृतीसाठी हा दिवस पाळला गेला पाहिजे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सोपानदेव, संत चोखोबा महाराज, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सावता माळी इत्यादी महान संतांचे कार्य, त्यांनी दिलेली शिकवण ऋषिपंचमीच्या दिवशी समजून घेण्याची गरज आहे.

त्याचप्रमाणे गार्गी, लोपामुद्रा, सुलभा, अरुंधती, अनसूया, द्रौपदी, सीता, तारा इत्यादी तेजस्वी तपस्वी स्त्रिया होऊन गेल्या. मुक्ताबाई, जनाबाई, पन्नादाई, जिजामाता, अहिल्याबाई, सावित्रीबाई अशा तपस्वी स्त्रियांनी समाजसुधारणेचे कार्य केलेले आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी संत महंतांच्या शिकवणुकीची आठवण करून देण्याची गरज आहे. आधुनिक काळात ऋषिपंचमी ही पूर्वींपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरी होण्याची खरी गरज आहे.

उपवासामागचा हेतू

ऋषिपंचमीच्या दिवशी करावयाचा उपवास (Fasting) हा इतर उपवासांसारखा नाही. या दिवशी नांगरलेल्या जमिनीतून निर्माण झालेले धान्य खायचे नाही. बैलाच्या श्रमांचे काही खायचे नाही. कंदमुळे खाण्यास हरकत नाही. आपण नेहमी खात असलेल्या गोष्टी कशा निर्माण होतात हे प्रथम समजून घेऊन मग काय खायचे आणि काय खायचे नाही हे ठरवायचे आहे. उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितलेले आहे. उपवास ही धार्मिक आहारातील शिस्त आहे. उपवासाने जप, तप, ध्यान, इत्यादी गोष्टींना तेज येते असेही सांगण्यात आले आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी ऋषींची व थोर कार्य करणाऱ्या संतांची पूजा व त्यांच्या कार्यांचे स्मरण करावयाचे असते. उपवासामुळे त्या उपासनेत मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते आणि आपले हेतू साध्य होण्यास मदत होते. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची गरज आहे.