
Prison Camps
esakal
आपल्या बऱ्याच धारणा, दृष्टिकोन हे लहानपणीच आपण ऐकलेल्या पौराणिक कथांमधून तयार होत असतात. कंसाने देवकी-वसुदेवाला कारागृहात टाकलं आणि तिथेच त्यांची सात मुलं मारल्यावर आठवा जन्म कृष्णाचा... मग भरपावसात वसुदेव साऱ्यांची नजर चुकवत कारागृहातून कृष्णाला घेऊन निघाला... यमुनेला इतका भर आला, की वसुदेवाच्या कंठापर्यंत पाणी लागलं आणि मग तान्ह्या कृष्णाच्या पदस्पर्शाने यमुना शांत झाली. ओसरली... सामान्यतः साऱ्यांचा कारागृहाशी पहिला संबंध या कथेपुरताच असतो. अगदी आपल्या बालपणी ऐकलेल्या या कथेतून ‘कारागृह म्हणजे छळ-छावणी’ असं आपल्या मनाचं सर्जन झालेलं असतं. तसंच ते माझ्यासोबतच्या इतरांचंही झालेलं होतं... पौराणिक कथांमधून ऐकलेल्या कारागृहाला आम्ही आता प्रत्यक्ष अनुभवत होतो आणि हा कारागृह आमच्या पूर्वकल्पना, पूर्वधारणांपेक्षा वेगळा ठरत होता. त्यात त्रास होताच; परंतु माणुसकीचं दर्शनही होतं...
तिथे एक भलामोठा, दोन्ही बाजूंना उतार असणारा लांबलचक चौथरा होता आणि त्यामध्ये म्हशींना पाणी प्यायला जसं नळकांड असतं, तसं मोठच्या मोठं नळकांड होतं. त्यामध्ये सकाळी-संध्याकाळी काही वेळासाठी पाणी सोडलं जात असे. आम्हाला दिलेल्या कटोऱ्यात ते पाणी घ्यायचं आणि अंघोळ करायची. उतार इतका माफक होता, की त्यातल्या उथळ पाण्यात कटोरा जेमतेम अर्धा भरत असे... आम्ही सगळ्यांनी आमच्याकडे असलेले कपडे घेतले आणि त्या ठिकाणी जाऊन कटोऱ्यात पाणी घेऊन पटापट पटापट कावळ्यासारखी अंघोळ करायला सुरुवात केली. तिथे लाज-लज्जा याच्याशी कुणाचा काडीचाही संबंध नसतो; कारण सगळेच कैदी असतात. इथे कुणी गरीब नसतो की कुणी श्रीमंत नसतो... सगळ्यांना सारखी वागणूक. खऱ्या अर्थाने समानता... कारागृहातील सर्वात जास्त कैदी, कच्चे कैदी असतात. गुन्हा सिद्ध झालेले गुन्हेगारच कारागृहात असतात असं नाही, तर जामीन मिळू न शकल्यामुळे छोट्याशा गुन्ह्यासाठी वर्षानुवर्षं कारागृहात खितपत पडलेल्या असंख्य कैद्यांनी आज आपल्या देशातील कारागृहं भरून गेली आहेत.