

Digital estate planning India
esakal
आपला संपूर्ण पत्रव्यवहार, आपला वैयक्तिक माहितीचा खजिना हा आपल्या पश्चात आपल्या योग्य त्या वारसांना सहजपणे मिळेल, याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले ऑनलाइन बँक खाते, आपल्या ऑनलाइन गुंतवणुकीचे व्यवहार, आपले ई-मेल खाते, आपल्या सोशल नेटवर्किंगचे खाते या सर्वांची आपण नीट व्यवस्था न केल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना नंतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो व त्यातून अनेक घोटाळे होऊ शकतात. आपल्या देशात अशा प्रकारच्या डिजिटल ॲसेटच्या (संगणकनिर्मित मालमत्ता) वारसाहक्काने हस्तांतर करण्यासंबंधातील वेगळ्या कायद्याची गरज आहे. मात्र, तो कायदा येईपर्यंत आपल्याला विचार करून सोयीस्कर मार्ग काढणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्या परिचित उच्चशिक्षित गृहस्थांचे ६२व्या वर्षी निधन झाले. उत्तम नियोजन आणि व्यवहार डिजिटली करत होते म्हणजे सर्व महिन्याची बिले भरणे, लोकांचे पगार, शेअर ट्रेडिंग अकाउंट, म्युच्युअल फंड अकाउंट, नेट बँकिंग अकाउंट, स्वतःची सल्लासेवा कंपनी, त्याची वेबसाइट वगैरे गोष्टी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या हाउसवाइफ (गृहिणी) असलेल्या पत्नीला परत ताब्यात घ्यायला खूपच त्रास झाला.