
उमेश बांबरे
वाढत्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधाही तितक्याच चांगल्या प्रकारे उभारल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या पाच दहा वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रस्त्याचे सक्षम जाळे उभारले गेले आहे. यातून रस्त्यांची स्थिती सुधारल्यामुळे वाहतूक जलद होऊ लागली आहे.
मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि बदलत्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांमध्ये बदल झाले नाहीत. त्यामुळे सातारा-कराड या प्रमुख शहरांसह सर्वच भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक हे प्रमुख आव्हान आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या प्रचंड आहे आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे, ही गोष्ट विसरता येणार नाही.