

Pune Air Pollution
esakal
मीनाक्षी गुरव
एकेकाळी ‘आरोग्यदायी चांगल्या हवामानाचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ही ओळख आता पुसली जात आहे. गेल्या दशकभरात पुण्याच्या हवेचा दर्जा कमालीचा खालावला असून, पुणेकरांच्या प्रत्येक श्वासासोबत फुप्फुसात ऑक्सिजनपेक्षा विषारी वायू आणि धुलिकण जास्त जात आहे. दहा वर्षांपूर्वी वर्षातील जवळपास निम्मे दिवस म्हणजे १४० ते १६० दिवस पुण्यातील हवा चांगल्या दर्जाची असायची; पण आता चांगल्या हवेचे दिवस आता थेट ५२ वर आले आहेत.
केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने देश पातळीवरील ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ (एनसीएपी) अंतर्गत देशातील अनेक राज्यांतून १३१ प्रदूषित शहरांची यादी केली आहे. यात राज्यातील पुण्यासह १९ शहरांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ पर्यंत धुलिकणांचे (१० मायक्रॉनपर्यत आकार असलेले धुलिकण पीएम १० आणि २.५ मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धुलिकण पीएम २.५) प्रमाणे कमी करण्याचे ध्येय ठरविले होते. परंतु, प्रत्यक्षात २०२४-२५ मध्ये वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ५२ दिवसच पुणेकरांनी चांगल्या हवेचा अनुभव घेतला. तर २०२५ मध्ये जानेवारी ते मार्चमध्ये एकही दिवस हवेची गुणवत्ता चांगली आणि समाधानकारक नव्हती, तर ९० दिवस हवा मध्यम स्वरूपाची असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.