
पंजाब आणि हरियाना यांच्यातील पाणी प्रश्नाने आता तीव्र रूप धारण करण्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर दोन्ही राज्यांतील संबंधही तणावपूर्ण होऊ शकतात.
पंजाब आणि हरियाना ही दोन शेजारी राज्ये एकेकाळी एकाच पंजाबचा भाग होती, ती आज पाणीवाटपावरून एकमेकांशी भांडत आहेत. अलीकडेच, पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने भाक्रा कालव्यातून हरियानाला होणारा पाणीपुरवठा बंद केला, त्यानंतर दोन्ही राज्यांमधील तणाव वाढला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की हरियानाने आपल्या वाट्यापेक्षा जास्त पाणी घेतले आहे आणि आता पंजाब एक थेंबही अतिरिक्त पाणी देणार नाही. प्रत्युत्तरादाखल, हरियानाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी आरोप केला की पंजाबने करारांची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे हरियानाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीसंकट वाढू शकते.