

Saree wearing experience
Sakal
लग्नाच्या खरेदीची वेळ आली तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं, की मला भरपूर वेळ लागणार. पण खरंतर माझी साडीखरेदी एका दिवसात झाली. ते म्हणतात ना, व्हेन यू नो यू नो! खरंतर हे वाक्य लोकांच्या संदर्भानं वापरलं जातं, पण मला साड्यांच्या बाबतीत होतं तसं. एखादी साडी बघताक्षणी मला माहीत असतं, की ही ‘माझी’ साडी होऊ शकते की नाही...
कधीकधी असं होतं ना, की आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टीबद्दल लिहायला घेतल्यावर कुठून सुरुवात करायची तेच सुचत नाही. या लेखाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. साडीवर लिहायचं तर प्रचंड उत्साहात ठरवलं, पण सुरुवात केल्यावर एक अक्षर सुचेल तर शपथ... ऑफिसमधल्या मैत्रिणीला म्हटलं, ‘सुचत नाहीये गं काय लिहू ते’, तर ती म्हटली, ‘कसं शक्यय! तुझ्याकडून मी किती किस्से ऐकलेत साडीविषयी. किती भरभरून सांगत असतेस नेहमी, तेच उतरवून काढायचंय तुला फक्त...’