

Long-term investing discipline
esakal
राजीव ठक्कर
सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणूक कशी करावी, आहे ती गुंतवणूक काढून घ्यावी की तशीच पुढे सुरू ठेवावी, असे अनेक प्रश्न पडत आहेत. या पार्श्वभूमीवर, पराग पारिख म्युच्युअल फंडाचे सीआयओ राजीव ठक्कर यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत...
प्रश्न : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाने काही दिवसांपूर्वी प्रतिबॅरल १०० डॉलरचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. एक निधी व्यवस्थापक म्हणून तुम्ही या घडामोडीकडे कसे पाहता आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतील?
ठक्कर : कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १०० डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे निश्चितच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, १९९० किंवा २००७ मधील इराक युद्धाच्या काळाशी तुलना करता, आजच्या घडीला जागतिक आर्थिक क्रियाकलापात तेलाचा वाटा तुलनेने कमी झाला आहे. पर्यायी इंधन स्रोतांचा विकास, ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ आणि तांत्रिक प्रगतीमुळे अर्थव्यवस्था तेलावर पूर्णपणे अवलंबून राहिलेली नाही. भारताच्या संदर्भात पाहिले, तर परिस्थिती अधिक मजबूत आहे. देशाचा परकी चलनसाठा आता अंदाजे एका वर्षाच्या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पुरेसा आहे. याउलट, पूर्वीच्या काळात हा साठा केवळ एक ते दोन आठवड्यांच्या आयातीपुरताच मर्यादित होता. ही एक अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाची सुधारणा आहे.
जागतिक स्तरावरही तेलाचा कोणताही संरचनात्मक तुटवडा नाही. रशिया, व्हेनेझुएला, पश्चिम आशिया आणि अमेरिकेतील शेल तेल व वायू उत्पादनामुळे पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे. सध्याच्या अडचणी या मुख्यतः भू-राजकीय स्वरूपाच्या आहेत. रशियन तेलावरील निर्बंध, पश्चिम आशियातील वाढता तणाव, तसेच व्हेनेझुएलाकडून होणारा खंडित पुरवठा हे घटक तात्पुरते असून, दीर्घकालीन दृष्टीने त्यांचा परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्यादृष्टीने पाहता, अशा घटना गतिरोधक म्हणून काम करतात. त्या अल्पकालीन अस्थिरता निर्माण करतात; पण काही आठवडे किंवा महिन्यांत परिस्थिती पुन्हा स्थिर होण्याची अपेक्षा असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी संयम राखणे अधिक योग्य ठरेल.