जैविक संप्रेरकाने फुलवा अधिक फुलोरा अन् शोभेच्या वनस्पती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

More flowering and ornamental plants through biological hormones}

जैविक संप्रेरकाने फुलवा अधिक फुलोरा अन् शोभेच्या वनस्पती


ग्राहकांची वाढती गरज विचारात घेऊन फुले आणि शोभेच्या वनस्पतींचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. हे विचारात घेऊन उत्तराखंडमधील संशोधकांनी जैविक संप्रेरकांचा शोध लावला आहे. ही संप्रेरके पिकाच्या जोमदार वाढीस सहायक ठरतात. मुळांची, खोडाची, फुलांची जोमदार वाढ होते. साहजिकच उत्पादनात वाढ तर होतेच तसेच किड अन् रोगांचा प्रादुर्भावही कमी होण्यास मदत होते. या संदर्भातील संशोधनावर आधारित लेख...


आधुनिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पादन आणि गुणवत्ता वाढीवर भर दिला जात आहे. तशा पद्धतीचे तंत्र विकसित करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये सध्या सेंद्रिय व इको-फ्रेंडली पद्धती शोधल्या जात आहेत. कमी कालावधीत आणि सोप्या व स्वस्त पद्धतीने व सेंद्रिय घटकातून पिकाची वाढ उत्तम कशी होईल, यावर संशोधकांचा भर आहे. वनस्पतीपासून मिळणारी अनेक जैविक संप्रेरके आणि जैविक घटक अद्यापही अज्ञानातच आहेत. हेच घटक पिकाच्या वाढीची क्षमता आणि जैविक-अजैविक ताणाची सहनशीलता वाढवितात. यामुळेच यावर सध्या अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

ग्राहकांची वाढती गरज विचारात घेऊन फुले आणि शोभेच्या वनस्पतींचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने उत्तराखंडमधील जी. बी. पंत कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील उद्यानविद्या शाखेच्या सईद खुडस आणि अजित कुमार या संशोधकांनी यावर संशोधन केले. जैविक संप्रेरकांचा वापर फुलवर्गीय व शोभेच्या वनस्पतींमध्ये फायदेशीर परिणाम दाखवत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या संदर्भातील या संशोधकांचा शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस यामध्ये प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा: पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

वनस्पती संप्रेरके म्हणजे काय ?


वनस्पतीच्या नैसर्गिक वाढीस प्रोत्साहित करणारे घटक ज्या पदार्थामध्ये असतात त्यांना वनस्पती संप्रेरके असे संबोधले जाते. याचा वापर वनस्पतीवर केल्यानंतर वनस्पतीची सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते. अन्नद्रव्ये शोषण्यासाठी पोषक स्थिती त्यामुळे निर्माण होते. पिकाच्या गुणवत्ता
वाढीसाठी आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास हे घटक सहाय्यभूत ठरतात.

२०१५ साली जार्डिन यांनी संप्रेरकांच्या पदार्थांचे सात प्रकारांत वर्गीकरण केले आहे. ते प्रकार असे - ह्युमिक आणि फ्लुविक अॅसिड, प्रोटीन हायड्रोलायसेट्स, समुद्री शैवाल अर्क, कायटोसन, अजैविक संयुगे, फायदेशीर बुरशी आणि जीवाणू.

ह्मुमिक आणि फ्लुविक अॅसिड


वनस्पती, प्राणी आदींचे जीवाणू आणि कृमींच्यामुळे विघटन झाल्यानंतर जमिनीत तयार होणारे सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमिक व फ्लुविक ॲसिड. हे पदार्थ जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या संशोधकांनी याचा वापर ग्लॅडिओलस, क्रायसॅन्थेमम, क्रोटॉन आणि जास्वंद या वनस्पतींवर केल्यानंतर त्यांना चांगले परिणाम आढळले. कंपोस्टपासून तयार केलेल्या ह्युमिक अॅसिडची फवारणी ग्लॅडिओलसवर करण्यात आली. यामुळे ग्लॅडिओलसच्या वाढीस प्रोत्साहन मिळाले ते लवकर फुलोऱ्यावर आल्याचे पाहायला मिळाले, असे मत या संशोधकांनी मांडले आहे.

क्रायसॅन्थेमममध्ये ह्युमिक अॅसिडची फवारणी केल्याने खोड आणि मुळांची वाढ झपाट्याने झालेली पाहायला मिळाली, तर फुलांचा आकार ३३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. क्रोटॉन आणि जास्वंदमध्ये गांडूळ खतापासून तयार केलेल्या ह्यमिक अॅसिडची फवारणी कलमांवर करण्यात आली. यामध्ये कलमाच्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले, असेही मत या संशोधनात मांडले आहे.

हेही वाचा: आखातातील श्रीमंत शेखांची होरपळ

प्रोटिन हायड्रोलायसेट्स


कृषी-औद्योगिक उप-उत्पादनांमधून रासायनिक आणि एंजाइमॅटिक प्रोटिन हायड्रोलिसिसद्वारे अमीनो-अॅसिड आणि पेप्टाइड्सचे मिश्रण प्राप्त केले जाते. इतर नायट्रोजनयुक्त रेणूंमध्ये बेटेन्स, पॉलिमाइन्स आणि नॉन-प्रोटिन अमीनो ॲसिड यांचा समावेश होतो. ही संयुगे वनस्पतींच्या वाढीवर जैविक संप्रेरके ( बायोस्टिम्युलंट्स) म्हणून फायदेशीर प्रभाव पाडतात.
लिलीच्या झाडावर प्रोटिन हायड्रोलायसेट्सची फवारणी केल्यास फुलाच्या कळ्यांची वाढ जोमदार होते. खोडाच्या वाढीवरही चांगला परिणाम संशोधकांना दिसून आला आहे.

समुद्री शेवालाचा अर्क


प्राचीन काळात शेतीमध्ये ताज्या समुद्री शेवालाचा अर्क सेंद्रिय खत म्हणून वापरला जात असे. पण जैविक संप्रेरक म्हणून याचा वापर संशोधकांनी प्रथमच नोंदविला आहे. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी तसेच जमिनीतील हवा खेळती ठेवण्यास समुद्री शेवालातील पॉलिसॅकेराईड्स मदतगार ठरतात, असे संशोधकांचे मत आहे.
ए. नोडोसमचा अर्क अमरॅन्थस ट्रायकलरच्या पानावर फवारल्यास फुलांच्या देठाची लांबी आणि फुलांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. क्षारपड जमिनीतील पिकाच्या फुलांमध्ये तजेलपणा वाढतो. असे संशोधकांना आढळले. एकलोनिया मॅक्सिमा अर्क मेरिगोल्ड (झेंडू) वनस्पतीवर फवारल्यास झाडाची वाढ जोमाने होते. पेटुनिया, पॅन्सी आणि कॉसमॉस यामध्ये ए नोडोसम अर्क एनपीके खतासोबत दिल्यास मुळांची लांबी, पानांचा आकार वाढतो. मुळे व खोडांत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता सुधारते. समुद्री शेवालाच्या अर्कामुळे पेपर ब्रीचमध्ये क्लोरोफिल आणि कॅरोटिनाईडचे प्रमाण वाढते, असेही संशोधकांनी या संशोधनात नमूद केले आहे.

हेही वाचा: होळीला मोदी सरकारकडून मिळणार 'गिफ्ट'; PF संदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता

कायटोसन आणि अन्य बायोपॉलिमर्स

एन अॅसिटिल डी ग्लुकोमाईन आणि डी ग्लुकोमाईन या पॉलिमरच्या कायटीनपासून कायटोसन तयार होते. याचा वापर जैविक संप्रेरक म्हणून करण्यात येतो. क्रायसॅन्थेमम वनस्पतीवरील ओइडियम क्रायसॅन्थेमी आणि पुचीनिया होरियाना या रोगांच्या संरक्षणासाठी ०.०१ ते ०.०५ टक्के कायटोसनची फवारणी उपयुक्त ठरते. ग्लॅडिओलसमध्ये बियाण्यावर कायटोसनचा वापर केला जातो. बियाणे लागवडीपूर्वी कायटोसनमध्ये बुडवून ठेवण्यात येते. यामुळे बियाण्याची वाढ जोमदार होते. फुले व पाकळ्यांची संख्या वाढते. गुलाबामध्ये पावडरी मिलड्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायटोसनची ०.०१ ते ०.०२ टक्के या प्रमाणात फवारणी करावी. तसेच स्फेरोथेका पॅनोसा वर रोसा, पेरोनोस्पोरा स्पार्सा आणि डिप्लोकार्पोन रोसा. याच्यापासून संरक्षणासाठी कायटोसनची फवारणी उपयुक्त ठरते असे संशोधनात स्पष्ट केले आहे. ग्लोक्सिनिया वनस्पतीच्या बियांची वाढ जोमदार होण्यासाठी व लवकर फुलोरा येण्यासाठी पेरण्यापूर्वी बियाण्यास एक टक्के कायटोसिन लावण्यात येते किंवा जमिनीत याची मात्रा देण्यात येते.

अजैविक संयुगे

गुलाबावर सिलिकॉनच्या फवारणीमुळे नवीन पाने लवकर येतात, तसेच मुळांची संख्या वाढते, असे संशोधकांनी या संशोधनात नमूद केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”