Rajendra Ghorpade writes special article about usage of raw eggs materials
Rajendra Ghorpade writes special article about usage of raw eggs materials

अंड्याचे कवच, कचरा नव्हे, तर.... 

एका अभ्यासानुसार भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. जगभरात अंड्यांच्या कवच्यांच्या कचऱ्याची समस्या भावी काळात उत्पन्न होऊ शकते. कारण याचे विघटन योग्य प्रकारे न झाल्यास दुर्गंधी पसरते व आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. यासाठी या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने काही संशोधकांनी याचे उपयोग शोधून काढले आहेत. काय आहेत हे उपयोग ? या कचऱ्याचे कशा प्रकारे व्यवस्थापन होऊ शकते ? यावर प्रकाश टाकणारा हा लेख.... 

जगात सर्वाधिक अंडी उत्पादन हे चीनमध्ये होते. 2018 साली चीनमध्ये 458 अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले. त्या खालोखाल अमेरिकेमध्ये 109 अब्ज, तर भारतात 95 अब्ज अंडी उत्पादन झाले. याचा विचार करता अंड्यांच्या कवच्यांच्या कचऱ्याचीही भावी काळात मोठी समस्या होऊ शकते. 2017 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. अमेरिकेत 1,50,000 टन, तर इंग्लंडमध्ये 1,10,000 टन इतका अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. या कवच्यांचे विघटन योग्य प्रकारे न झाल्यास यापासून दुर्गंधी उत्पन्न होते. तसेच आरोग्यासही अपायकारक ठरू शकते. यासाठी या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने काही संशोधकांनी याचे उपयोग शोधून काढले. 

यासंदर्भात रिसर्च गेटमध्ये तेहरान विद्यापीठातील एच. फरिदी व अकबर अरबहोस्सीनी यांचे आणि अमरनाथ येरनमला यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याचे उपयोग विचारात घेता भावी काळात यातून नव्या उद्योगांची निर्मिती करता येणे शक्‍य आहे. याचे औद्योगिक वापर विचारात घेता हा कचरा नव्हे, तर हे सोने ठरू शकते. यासाठी कचऱ्याकडे आता पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. असा बदल झाल्यास कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनातून नवनिर्मिती होऊ शकते. 

अंड्यांच्या कवच्यांतील रासायनिक घटक - 

कॅल्शियम कार्बोनेट - 94 टक्के 
मॅग्नेशियम कार्बोनेट - 1 टक्का 
कॅल्शियम फॉस्फेट - 1 टक्का 
सेंद्रीय पदार्थ - 4 टक्के 

संशोधकांनी शोधलेले कवच्यांचे उपयोग 

- कवच हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असल्याने त्याचा वापर खत, जनावरांच्या खाद्यातील घटक म्हणून केला जातो. 
- अमू यांच्या संशोधनानुसार कवच्यांची पावडर धारकक्षमता वाढवत असल्याने जमिनीची प्रत सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. 
- ए. जे. ओलरेवाजू यांच्या संशोधनानुसार रस्त्यांच्या निर्मितीमध्ये मातीचे स्थिरिकरण करण्यासाठी उपघटक म्हणून कवच उपयुक्त ठरते. 
- बायोडिझेलचे उत्पादन करताना होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अंड्यांचे कवच घन उत्प्रेरक म्हणून वापरण्यात येते. तसेच बायोडिझेलचा उत्पादन खर्चही कवच्यांच्या वापरामुळे कमी होतो. 
- प्रदूषित पाण्यातील पर्यावरणास हानी पोहोचवणारे जड धातू शोषण्यासाठी अंड्यांच्या कवच्यांचा वापर करता येतो. 
- हाडातील उती पुनर्स्थापित करण्यासाठी बायोमटेरियल म्हणून कवच्यांचा उपयोग होतो. 
- अंड्यांच्या कवच्यांपासून हायड्रोझायपेटाईट प्रक्रियेतून कृत्रिम हाडांची निर्मितीही शक्‍य आहे. 
- अंड्यांचे कवच म्हणजे CaCo3 याचा Tio2 शी संयोग करून CaTiO3 मिळवता येऊ शकते. याचा उपयोग न्यूक्‍लिअर कचऱ्यावरील प्रक्रियेत करता येतो. 
- महिलांना आवश्‍यक कॅल्शियमचा पुरवठा करणारी गोळी तयार करण्यासाठी. CIPCAL-500 ला पर्याय ठरणाऱ्या गोळीसाठी कवचाचा वापर. 

अंड्यांचे कवच खत म्हणून... 

अंड्यांचे कवच हे कॅल्शियम कार्बोनेटचा उत्तम स्त्रोत आहे. अन्य नैसर्गिक स्त्रोतांपेक्षा कवचांपासून मिळणाऱ्या कॅल्शियममध्ये विषारी घटकांचे प्रमाण कमी असते. कवच्यांपासून तयार केलेले खत जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक चुनखडीच्या साठ्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदतगार ठरू शकते. हे खत ब्लासूम एन्ड रॉट (बीईआर) रोगाची तीव्रता कमी करण्यास उपयुक्त ठरते. 

बायोडिझेल उत्पादनासाठी उपयुक्त 

बायोडिझेल उत्पादनासाठी एकजीनसी उत्प्रेरकचा वापर करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे उत्प्रेरक स्वतंत्र करण्याच्या प्रक्रियेसाठी उच्च तापमान लागते. त्यामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या उद्‌भवू शकते, तसेच झिज होण्याचा धोकाही असतो. बायोडिझेल उत्पादनात भेडसावणारी ही समस्या विजातीय उत्प्रेरकांच्या वापरामुळे सोडवता येते. अंड्यांच्या कवच्यांमध्ये असणाऱ्या अंतर्गत छिद्र रचनेमुळे तसेच सर्वाधिक कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रमाणामुळे यापासून विजातीय उत्प्रेरक म्हणून वापर करणे शक्‍य झाले. या उत्प्रेरकांची झिज होत नाही. त्याचा पुनर्वापरही शक्‍य आहे व शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत सहजपणे स्वतंत्र होऊ शकते. 

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी...

औद्योगिक प्रक्रियांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. जड धातूंमुळे ते पाणी शुद्ध करण्यातही अनेक अडचणी उद्‌भवतात. अशा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोळशाची पावडर, भुसा आदींचा वापर करण्यात येतो. यामध्ये आता अंड्यांच्या कवच्यांचाही वापर करून पाण्यातील जड धातू वेगळे करता येतात. अंड्यांचे कवच उत्तम अधिशोषक असल्याने प्रदूषित सांडपाण्यातून हायड्रोजन सल्फाईड काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. यासाठी अंड्यांच्या कवच्यांची भुकटी करून 800 अंश तापमानाला दोन तास ठेवून त्याचे कॅल्शिफिकेशन करण्यात येते. नैसर्गिक अंड्यांच्या कवच्यांमध्ये कॅडमियम, क्रोमियम, शिसे (लिड) वेगळे करण्याचे गुणधर्म आहेत. कॅलशिन्ड अंड्यांचे कवच सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पामध्येही वापरण्यात येते. 

कृत्रिम हाडांच्या निर्मितीसाठी उपयोग 

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. डी. एस. भांगे यासंदर्भात म्हणाले की, अंड्यांच्या कवच्यांपासून तयार केलेल्या पावडरमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा भरपूर असते. ही पावडर तापवल्यानंतर त्याचे कॅल्शियम ऑक्‍साईडमध्ये रुपांतर होते. कॅल्शियम ऑक्‍साईड ईडीटीए या रसायनाबरोबर अभिक्रिया करून शुद्ध रुपात आणले जाते. योग्य प्रमाणात फॉस्फेटबरोबर अभिक्रिया करून हे कॅल्शियम हायड्राक्‍सी ऍपेटाईट रुपात आणले जाते. याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, कृत्रिम हाडांच्या निर्मितीसाठी, हाडांची वाढ होण्यासाठी पूरक म्हणून केला जातो. कवच्यांपासून कृत्रिम हाडांच्या निर्मितीसाठीचे पेटेंट पेरियार विद्यापीठ व एसआयबीएआर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स, गुंटूर यांनी मिळवले आहे. अंड्यांच्या कवच्यांचा उपयोग सिमेंट निर्मितीसाठीसुद्धा केला जाऊ लागला आहे. सिमेंटमध्ये असलेले कॅल्शियम ऑक्‍साईड अंड्यांचे कवच 850 सेल्सिअस तापवून मिळवले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com