डॉ. श्रीमंत कोकाटे
shrimantkokate1@gmail.com
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव डोंगर जिंकून गड बांधला. त्याला ‘राजगड’ असे नाव दिले. तेव्हा महाराज फक्त १७ वर्षांचे होते. म्हणजे कुमार वयातच त्यांनी निश्चय केला होता, की अन्यायाविरुद्ध लढायचे, जिंकायचे आणि उत्तम राज्यकारभार करायचा. अभेद्य, अजिंक्य अन् दुर्गम असलेला राजगड महाराजांच्या इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे. महाराजांनी जिंकून बांधून घेतलेला तो पहिला गड आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात गडकिल्ल्यांचे महत्त्व खूप आहे. त्यांनी स्वतः बांधून घेतलेल्या गडांमध्ये राजगड पहिला आहे. राजगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. या गडावर महाराजांची सुमारे २५ वर्षे राजधानी होती. स्वराज्य उभारणीत या गडाचे महत्त्वाचे योगदान आहे. पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी याच गडावरून झाल्या आहेत.
हा गड अत्यंत अभेद्य, अजिंक्य आणि दुर्गम आहे. तो गुंजन मावळ खोऱ्यात आहे. तेथे जाण्यासाठी निरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी नद्या अन् मोठे डोंगर पार करावे लागतात. त्यामुळे हा गड अतिशय दुर्गम आणि सुरक्षित आहे. पुण्याच्या नैऋत्य दिशेला सुमारे ६० किलोमीटर अंतरावर राजगड आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाच्या पश्चिम दिशेला सुमारे २५ किलोमीटर अंतरावर तो आहे. नसरापूर-वेल्हे मार्गावर मार्गासनीवरून दक्षिण बाजूला हा गड आहे. तेथे जाण्यासाठी पाली दरवाजा, गुंजवणे गाव, गुंजवणे दरवाजा, भूतोंडीवरून आळू दरवाजा इत्यादी चार मार्ग आहेत.