
डॉ. सदानंद मोरे
ज्याप्रमाणे मार्क्सला इंग्लंड हा सर्वांत परिपक्व व प्रगत भांडवलशाही देश असल्यामुळे श्रमिकांची क्रांती तेथे सर्वांत अगोदर होईल असे वाटत होते. त्याप्रमाणे आणि विशेष म्हणजे त्याच कारणाने सोरोसला खुला समाज पहिल्यांदा अमेरिकेत असणार व म्हणून अमेरिका खुल्या समाजरचनेचे नेतृत्व करण्यास समर्थ देश आहे असे वाटत होते? पण कसचे काय! अमेरिकेने त्याची घोर निराशा केली.
आचार्य रजनीश तथा ओशो यांच्या ज्या मताचा संदर्भ याआधीच्या लेखात (भाकिते मार्क्सची आणि ओशो रजनीशांची -ता. १ फेब्रुवारी) दिला होता ते ज्यात मांडले होते त्या पुस्तकाचे नाव अस्वीकृती मे उठा मेरा हाथ. पुस्तक अर्थातच हिंदी भाषेत होते. रजनीश विचारवंत म्हणून ज्या काळात प्रसिद्ध होत होते व त्यांना ऐकण्यासाठी लोक गर्दी करीत होते, तो काळ भारताच्या संदर्भात नेहरू पर्व संपण्याचा होता, नेहरू जाऊन शास्त्री-इंदिरा गांधी यांनी सत्ताधीश होण्याचा होता. विशेषतः इंदिरा गांधींच्या काळात भारताचे सरकार बऱ्यापैकी डावीकडे झुकले होते. अर्थात, ती इंदिरा गांधींची अगतिकताही होती.