
‘दृष्टिआड सृष्टी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ज्या कोणा पूर्वजांनी ही म्हण प्रचलित केली असेल, त्यांनी पाहिलेली सृष्टी काही पिढ्यांनंतर खरोखरच दृष्टीआड आणि अस्तित्वापलीकडेही जाऊ लागणार आहे, याचा अंदाज मात्र त्यांना कदापि आला नसेल. ते दुर्भाग्य पुढील पिढ्यांच्या वाट्याला येत आहे.
ज्या जैवविविधतेने ही सृष्टी नटली आहे, ती झपाट्याने नष्ट होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील विविध प्रजाती नामशेष होण्याचे प्रमाण नैसर्गिक स्तराच्या १० ते १०० पटींनी वाढले आहे. ‘वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या नैसर्गिक व वन्यजीवन संरक्षण क्षेत्रात कार्यरत जागतिक संस्थेच्या ‘लिव्हिंग प्लॅनेट’ नावाने प्रसिद्ध होणाऱ्या द्वैवार्षिक अहवालानुसार, जगभर ज्ञात असणाऱ्या पृष्ठवंशी वन्यजीवांची संख्या फक्त गेल्या अर्धशतकामध्ये ७३ टक्क्यांनी घटली आहे! परागसिंचनाअभावी शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम, नैसर्गिक साधनस्रोतांच्या टंचाईमुळे औषधनिर्मिती क्षेत्रावर होणारा परिणाम अशा विविध क्षेत्रांतील अनुमान काढता या जैवविविधता हानीचा परिणाम वार्षिक १० सहस्राब्ज डॉलर एवढ्या नुकसानीच्या घरात गेला आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपण ‘साजरा’ करणार आहोत. जैवविविधतेच्या संदर्भात पुढील मुद्दे महत्त्वाचे वाटतात.