

Rashtrasant Tukadoji Maharaj
esakal
किशोर बळी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ३० आॅक्टोबर रोजी पुण्यातिथी होती. त्यानिमित्त त्यांच्या विचारकार्याचे स्मरण करताना ग्रामविकास, सामाजिक समता, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या भजनांचे मोल पुन्हा अधोरेखित होते. बालपणी भजनांच्या माध्यमातून मनावर झालेले संस्कार
पुढे विचारांची शिदोरी बनत गेले...
गुरुदेव सेवा मंडळाद्वारे सर्वत्र तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेचे आयोजन होत असते. लहानपणी आम्ही बाल भजन स्पर्धेकरिता जायचो. गावातील मोठी मंडळी आम्हा मुलांना घेऊन जायची. केवळ दिवसाच नव्हे; तर रात्र- रात्रभर स्पर्धा चालायची. त्या स्पर्धेत कधी एखादे बक्षीस मिळायचे आणि आनंद गगनात मावेनासा व्हायचा. त्या वयात फारसे कळत नव्हते; परंतु राष्ट्रसंतांच्या भजनांचे संस्कार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मनावर होत गेले आणि जसजशी समज येत गेली तसतसे हे विचार प्रभावित करायला लागले, अंतर्मुख करीत गेले. राष्ट्राच्या दृष्टीने ही एक अनमोल अशी संपदा आहे, याचे आकलन होत गेले. ग्रामगीतेतून त्यांनी लिहिलेले ग्रामीण विकासाचे सूत्र असो अथवा हजारो भजनांमधून उमटलेल्या सामाजिक जाणिवा असोत, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे राष्ट्राला विधायक दिशा देणारे एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते, याची प्रचीती आल्यावाचून राहत नाही.