Ravi Amale writes special articles on facebook and whats app role in married life
Ravi Amale writes special articles on facebook and whats app role in married life

फेसबुक, WhatsApp तुमच्या वैवाहिक आयुष्याला चूड तर लावीत नाही ना?

आपल्या समाजात विवाहबाह्य अनैतिक संबंध हे पाप गणले जाते. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारीच ती बाब. पण तरीही असे संबंध आणि त्यातून होणारे गुन्हे यांत वाढ होताना दिसत आहे. व्यभिचार हा काही आजचा आजार नाही. पण आज त्यास तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. फेसबुक, WhatsApp यांमुळे एरवी जे अवघड होते ते अनैतिक संबंध ठेवणे सहजसाध्य झाले आहे…. ते नेमके कसे आणि का? वाचा

एखादी व्यक्ती वा गोष्टीतील मोठा ऐब समोर आला, की तिच्यातील छोट्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. हेच आपल्याकडे फेसबुकबाबत झाले. अलीकडेच अमेरिकेतील 'वॉल स्ट्रीट जर्नल' या वृत्तपत्राने फेसबुक आणि भाजपचे जवळचे नातेसंबंध उजेडात आणले. त्यावरून भारतात मोठा गदारोळ माजला. या निमित्ताने फेसबुक या संदेशपीठाचे प्रोपगंडातील महत्त्व आणि त्याचे राजकीय-सामाजिक परिणाम याबाबत सखोल चर्चा झाली. ते होणे आवश्यकच होते. फेसबुक आणि तत्सम व्हाट्सॅपादी समाजमाध्यमांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात घातलेला धुमाकूळ लोकांसमोर सातत्याने येणे गरजेचेच होते. पण या सर्व चर्चेत फेसबुक, WhatsAppया संदेशपीठांचा आपल्या खासगी जीवनावरील परिणाम मात्र बेदखलच राहिला. त्याची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आता आलेली आहे. याचे कारण म्हणजे कोरोना कहराच्या काळात आलेल्या काही बातम्या. राज्याच्या वेगवेगळ्या गावांतून, शहरांतून अधूनमधून आलेल्या त्या बातम्या. उदाहरणार्थ -

1. 22 फेब्रुवारी - मुंबई - मालवणी परिसरात प्रियकराच्या मदतीने कट रचून पतीचा खून.
2. 23 फेब्रुवारी -  पुणे - कासारवडवली - अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या. 
3. 12 मे - नागपूर - कॉलेजमधील वर्गमित्राशी पत्नीचे अनैतिक संबंध. WhatsAppवरून गप्पा. त्यामुळे चिडून पत्नीचा गळा चिरून खून. 
4. 15 मे - सटाणा - प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या.
5. 22 ऑगस्ट - मुंबई - पतीचे अनैतिक संबंध. त्यामुळे चिडलेल्या महिलेकडून गळ्यावर वार करून पतीची हत्या. 

या बातम्यांमध्ये तसे काय विशेष आहे? पूर्वीही - अगदी पुराण काळापासून - अशा घटना घडतच होत्या. त्याने त्या-त्या परिसरात थोडीफार खळबळ माजे. कालांतराने सामान्य गुन्हेवृत्त म्हणून त्या विसरल्या जात. एकट्या महाराष्ट्रात २०१८ साली दोन हजार १९९ हत्या झाल्या. त्यातील २५६ हत्या या अनैतिक संबंधांतून आणि १२५ खून प्रेमसंबंधांतून झाल्याचे २०१८ चा राष्ट्रीय गुन्हे अहवाल सांगतो. महाराष्ट्र या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असल्याचेही हा अहवाल सांगतो. हे कोणी गांभीर्याने घेतले? परंतु अशा बातम्यांच्या जोडीला गेल्या फेब्रुवारीत आलेली आणखी एक बातमी ठेवली म्हणजे त्यांतील गांभीर्य लक्षात येईल. ग्लिडेन नामक 'एक्स्ट्रामॅरिटल डेटिंग अॅप'ने केलेल्या सर्वेक्षणाचे हे वृत्त. ग्लिडेन हे फ्रेंच अॅप. ते महिलांना डेटिंगसाठी योग्य व्यक्ती शोधण्यास साह्य करते. त्यांच्या गाठी घालून देते. एप्रिल २०१७ पासून ते भारतात कार्यरत आहे. आणि आतापर्यंत त्यांचे सुमारे आठ लाख भारतीय खातेदार आहेत. २०१८ मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

त्यानंतर या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला. तर या अॅपने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा, की 55 टक्के भारतीय पुरुषांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी पत्नीस धोका दिला आहे.  56 टक्के भारतीय नारींनी आपल्या वैवाहिक जीवनात एकदा तरी पतीचा विश्वासघात केला आहे. आणि असे असूनही भारतातील घटस्फोटाचा दर जगात सर्वांत कमी म्हणजे अवघा एक टक्का आहे. याचा अर्थ असा, की आपले विवाहित स्त्री-पुरुष एकमेकांना समजून घेतात आणि तसे नाहीच जमले तर मग वर बातम्यांत झाले तसे काही करून मोकळे होतात.

आता कंपन्या वा कॉर्पोरेट संस्था अशी सर्वेक्षणे करतात तेव्हा त्यामागे त्यांचे काही छुपे स्वार्थ असतात. ते गृहित धरले तरी त्यातून समाजात काय वारे वाहात आहे हे काही प्रमाणात तरी स्पष्ट होते. ग्लिडेनचे सर्वेक्षण असे सांगते, की भारतातील ४८ टक्के व्यक्तींना एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबंध असणे शक्य वाटते, तर ४६ टक्के भारतीयांना असे वाटते की आपले जोडीदारावर प्रेम आहे याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्याशी संबंध ठेवू शकत नाही. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला धोका देण्यात काहीही गैर नाही असे त्यांना वाटते. 

याहून लक्षणीय बाब म्हणजे - जिला आपल्या समाजात अनैतिक संबंध, व्यभिचार, जारकर्म असे म्हटले जाते, जिचा सर्वच धर्मांनी अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला आहे, एवढेच नव्हे तर त्यास कडक शिक्षाही सांगितल्या आहेत, ती कृती खासकरून पुरुषांची मक्तेदारी म्हणून गणली जात असे. म्हणजे पुरुषच असे काही धंदे करतात असा आपला भ्रम असे. परंतु या सर्वेक्षणाने तो समजही फोल असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे. आता विवाहित महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दैहिक वा मानस व्यभिचारात पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. ग्लिडेन अॅपवर असलेल्या महिलांचा वयोगटही या दृष्टीने येथे लक्षात घेण्यासारखा आहे. येथे अधिक करून ३४ ते ४९ या वयोगटातील महिला दिसतात. म्हणजे संसारात कालदृष्ट्या स्थिरावलेल्या, सर्वसाधारणतः एक-दोन मुले असलेल्या या माता-वर्गीय महिला.

येथे एक आक्षेप येऊ शकतो, की महिलांचा अशा प्रकारे निर्देश करणे ही घाणेरडी पुरुषी मनोवृत्ती असून, पुरुषांनी शेण खाल्ले तर चालते आणि महिला तसे करू लागल्या तर त्यांच्याकडे बोट दाखविले जाते, हे अयोग्य आहे वगैरे वगैरे. येथे मुळात मुद्दा स्त्री-पुरुष समानतेचा नाही. तर त्यांच्या सामायिक वैवाहिक जीवनाचा आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या भीषण कौटुंबीक समस्यांचा आहे. या समस्यांना उत्तर काय हा या पुढचा प्रश्न आहे. मुळात त्याचे एकच एक, सर्वांना लागू होईल असे उत्तर नाही.  ते त्या त्या व्यक्तींनी शोधायचे असते.  मानसोपचारतज्ञ, प्रशिक्षित सल्लागार त्यासाठी मदत करू शकतात.
आता येथे प्रश्न येतो, या सगळ्याचा फेसबुकादी समाजमाध्यमांशी काय संबंध? फेसबुक वगैरे गोष्टी तर काल-परवाच्या. २६ सप्टेंबर २००६ पूर्वी या देशात फेसबुक नव्हते. फेब्रुवारी २००९ पूर्वी जगात व्हाट्सअॅप नव्हते. पण व्यभिचार होता. मग त्याची याच्याशी जोडी कशी जुळवता येईल? 

अनेक माणसे संधीचा अभाव आणि समाज काय म्हणेल या भयाचा प्रभाव यामुळे सज्जन असतात. अशा माणसांना संधी मिळाली आणि तिचा लाभ गुपचूप उठवता येण्याची खात्री असेल, तर ती चळतात. आपल्या वैवाहिक आयुष्यात समाधानी नसलेल्या वा आपल्या उबलेल्या आयुष्यात काही तरी चटकदारपणाची ओढ असलेल्या व्यक्तींना इंटरनेटने विवाहबाह्य संबंधांबाबतच्या संधीची अशी कवाडे खुली करून दिली. त्यासाठी उपयोगी ठरल्या डेटिंग साईट्स. आपला असा समज असतो, की हे डेटिंग वगैरे फॅड फक्त पाश्चात्यांचे वा त्यांच्या देशी वारसांचे. पण ते तसे नाही हे अॅशले मॅडिसनचा जो माहितीसंच फुटला त्यातून दिसले. 

हे ग्लिडेनसारखेच एक डेटिंग अॅप. २०१५ मध्ये इंपॅक्ट टीम नामक हॅकर गटाने त्यांचा माहितीसंच (विदा वा डेटा) चोरला. १९ ऑगस्ट २०१५ रोजी त्यातला दहा जीबी विदा त्यांनी डार्कनेट आणि टोरेन्ट संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला आणि मोठी खळबळ उडवून दिली. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी पुन्हा २० जीबी विदा खुला केला. त्यातून अॅशले मॅडिसनच्या भारतातील विविध शहरांतील खातेदारांची माहिती उघड झाली. त्यानुसार या अॅपचे शहरनिहाय खातेदार असे - 

1. नवी दिल्ली - 38 हजार 652
2. मुंबई - 33 हजार 36
3. चेन्नै - 16 हजार 434
4. हैदराबाद - 12 हजार 825
5. बंगळुरू - 1 हजार 561
6. पुणे - 9 हजार 859

राज्यातील मुंबई, पुण्याबरोबरच नागपूर (दोन हजार ३१३), नवी मुंबई (दोन हजार ५२४), पिंपरी चिंचवड (५७४), आणि उल्हासनगर (३४७) यांचाही त्यात समावेश होता. 

गेल्या पाच वर्षांत यात मोठीच वाढ झाली असणार हे गृहित धरण्यास हरकत नाही. परंतु तरीही डेटिंग अॅपचा वापर काही समाजमाध्यमांइतका सार्वत्रिक नाही. फेसबुक आणि व्हाट्सअॅप यांचा समावेश आता जीवनावश्यक बाबींत करावयास हरकत नाही, इतके त्यांचा आपल्या आयुष्यात शिरकाव झालेला आहे. ही संदेशपीठे आपल्या कौटुंबीक आयुष्यास चूड लावू शकतील अशी शंकाही कोणास आली नव्हती. याबाबत आपल्याकडील विदा उपलब्ध नाही. पण ब्रिटनमधील 'लेक लीगल' या विधीकंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, तेथील न्यायालयांतील घटस्फोटाच्या एकतृतीयांश खटल्यांत फेसबुकचा उल्लेख आलेला आहे. हे नक्कीच चिंताजनक आहे. आपल्याकडील काही हत्यांच्या घटनांत व्हाट्सअॅपचा उल्लेख आलेला आहे. 

येथे हे स्पष्ट करावयास हवे, की डेटिंग अॅपप्रमाणे फेसबुक वा व्हाट्सअॅप वापरल्याने माणसे व्यभिचार करीत नाहीत. विवाहबाह्य अनैतिक संबंधांची कारणे वेगळी असतात. त्या संबंधांना फेसबुक, व्हाट्सअॅप मात्र नक्कीच साह्यभूत ठरते, सहज-सोपे-सुलभ करते. याची कारणे त्यांच्या स्वरूपात दडलेली आहेत. 

या समाजमाध्यमांनी ज्या गोष्टीमुळे आपल्या ऑनलाईन सामाजिक आणि राजकीय जीवनात जल्पकांना - ट्रोल्सना - जन्म दिला, तीच गोष्ट अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांनाही उपयुक्त ठरली आहे. ती म्हणजे - यातील (आभासी) गोपनीयता. यातून आपल्या जोडीदाराच्या न कळत इतर कुणाशी संबंध ठेवता येणे शक्य आहे. आपल्याला आवडणारी व्यक्ती कुठेही असो, तिच्याशी या माध्यमातून स्वतःला जोडता येते. 'ऑफलाईन' संबंधांतील अनेक मर्यादांवर ही संदेशपीठे मात करतात.

पण फेसबुक याहून अधिक काम करते. आपल्या पूर्वायुष्यातील एखादी व्यक्ती, 'पास्ट फ्लेम' महाविद्यालयीन जीवनातील तथाकथित पहिले प्रेम वा 'क्रश'  - जे इतकी वर्षे आपल्यापासून दूर होते - ती व्यक्ती येथे सापडण्याची शक्यता खूप. हे फेसबुक नसते, तर 'ती वा तो सध्या काय करते वा करतो' हे शोधण्यातच अवघा वेळ गेला असता. एकदा ती सापडली की मग तिला सहज म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. तिच्या छायाचित्रांना लाईक करा, पोस्टवर कॉमेन्ट करा हे सोपे. त्यातून संबंध वाढवता येतात. वाढतात. तेथे फेसबुकचे 'अॅल्गॉरिदम' कामास येते. तुमच्या लाईक्स आणि कॉमेन्ट पाहून तुमच्या फेसबुकवर भिंतीवर कुणाला पहिल्यांदा आणून ठेवायचे, तुमच्या मित्रयादीत कुणाचे छायाचित्र पहिल्या ओळीत ठेवायचे हे फेसबुक स्वतःच ठरवते. याशिवाय तुमच्या आवडीचे विषय, गाणी, हल्ली ते प्रेमाचे फालतू कोट्स येतात ते… हे सारे मग तुमच्या नजरेस सतत आणून दिले जाते. तुम्ही त्यातच गुरफटले जाता.

हे सर्व सुरू होते ते साध्याशा लाईकमधून, 'काय ओळखले का? कसा वा कशी आहेस?' यांसारख्या साध्या संवादातून. पुढे हे सर्व आपल्या जोडीदारापासून लपविले जाते. ते शक्य असते. ते सारे आपल्या घरातून, आपल्या वेळेत, आपल्या हातातील मोबाईल फोनमधून गुपचूप तर करता येते. 'ऑनलाईन इन्फेडिलिटी' म्हणतात ती हीच. पण फेसबुक केवळ संवादातील गोपनीयताच देते असे नव्हे, तर त्याच्या अतिरिक्त वापराने आपले वास्तवाचे भानही बिनसते. टेक्सास टेक विद्यापीठातील सहायक प्रोफेसर जॅकलिन क्रॅव्हेन्स या तंत्रज्ञान आणि इंटरनेटची खासगी व्यक्तिगत आयुष्यातील भूमिका याविषयातील तज्ज्ञ. 'फेसबुक इन्फेडिलिटी : व्हेन पोकिंग बिकम्स प्रॉब्लेमॅटिक' या शोधनिबंधात त्या सांगतात, बहुसंख्य लोक त्यांचा संघर्ष, समस्या, वेदना अशा गोष्टी पोस्ट करीत नाहीत. त्यांचे 'आता मी मस्त मजेत सुटी घालवतोय' किंवा 'मी ही छान गोष्ट केली' किंवा मग 'आम्ही आज ही चवदार डिश खाल्ली' असे काही चाललेले असते.

लोकांच्या आयुष्यातील हे चित्र नेहमीच आकर्षक असते. पण ते वास्तवाहून दूर असते. आपल्या आयुष्यातील आनंद, आपले वैवाहिक नाते याबद्दल शंका घेऊन आपण जेव्हा फेसबुकवरील इतरांकडे पाहतो तेव्हा ते सारेच झकास वाटते. ती व्यक्ती आपल्या जोडीदाराहून अधिक आकर्षक भासते. फेसबुकच्या वॉलवरचे डोंगर नेहमीच साजरे वाटतात. पण ती वाट खूप निसरडी असते. आणि अतिरिक्त वापराचे म्हणाल, तर 'ग्लोबल वेब इंडेक्सेस सोशल मीडिया ट्रेंड्स २०१९ रिपोर्ट' आपल्याला सांगतो, की साधारणतः आपली सर्वसामान्य भारतीय व्यक्ती समाजमाध्यमांवर दिवसातील किमान २ तास ४० मिनिटे घालवते. हा वेळ वास्तवाचे भान बिनसण्यासाठी चांगलाच पुरेसा.

फेसबुक, WhatsApp यांच्या या परिणामाबद्दल आपल्याकडे तितकीशी जागरुकता दिसत नाही. एकूणच समाजमाध्यमी वर्तन आणि त्यांचे परिणाम यांबाबत आपण झोपेतच आहोत. ही झोप देशातील राजकीय-सामाजिक वातावरणाची वाट लावण्यास जेवढी पुरेशी आहे, तेवढीच ती आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करण्यासही कारणीभूत ठरू शकते.

फेसबुकचा व्यक्तीच्या मनावर असा काय परिणाम होतो, त्यामागील कारणे आणि एखादी व्यक्ती जर बाहेरख्यालीपणा करू लागली असेल, कुणा दुसऱ्या व्यक्तीत गुंतली असेल, तर ते कसे ओळखावे हा महत्त्वाचा विषय आहे. त्याबाबत पुढच्या भागात…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com