
Emotional Intelligence
esakal
आजच्या माहितीच्या ओघात, काल्पनिक साहित्य वाचणं फार उपयुक्त ठरते. कथा हळूहळू उलगडतात, एकेक प्रकरण समजून घेता येतं. त्यामुळे वाचकांमध्ये संयम येतो, लक्ष देण्याची सवय लागते आणि गोष्टी नीट समजून घेण्याची क्षमता वाढते. हे आजच्या ‘झटपट माहिती’च्या युगात फार कमी होत चाललं आहे.
ल्पनिक (ललित) साहित्य वाचणं हे अनेकदा फक्त मनोरंजन किंवा विरंगुळा मानलं जातं. विज्ञान, तांत्रिक अभ्यास किंवा समस्या सोडवणं यांसारख्या ‘गंभीर’ गोष्टींपेक्षा ते वेगळं आहे, असा समज आहे; पण हा एक मोठा गैरसमज आहे. कारण ते मानवी बुद्धिमत्ता कशी विकसित झाली आहे आणि मेंदू आपल्या जीवनाचे नियोजन कसे करतो याकडे दुर्लक्ष करते.
काल्पनिक साहित्याला ‘वेळेचा अपव्यय’ म्हणणं म्हणजे कथा आपल्या विचारांवर, भावनांवर आणि समाजावर करत असलेला खोल परिणाम नाकारणं होय. उत्तम दर्जाचं काल्पनिक साहित्य वाचल्याने सहानुभूती वाढते, भावनिक बुद्धिमत्ता मजबूत होते. इतकंच नाही तर तर्कशुद्ध अभ्यासाने शक्य न होणाऱ्या पद्धतीने मन प्रशिक्षित होतं. हा गैरसमज नेमका का होतो? कारण तर्क आणि बुद्धिमत्ता यांचा गोंधळ केला जातो. तर्क म्हणजे विचार करण्याचा ठरावीक, आखीव मार्ग आहे. गणित, तत्त्वज्ञान किंवा विज्ञानाच्या पद्धतींमधून तर्कशास्त्र शिकवलं जातं; पण बुद्धिमत्ता फक्त तर्कापुरती मर्यादित नसते; ती उत्क्रांतीजन्य असते.