

Renewable Energy India
esakal
एकंदर ऊर्जानिर्मितीत नवीकरणीय आणि पर्यायी ऊर्जेचे प्रमाण वाढविण्यावर सरकारचा जोर आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, आण्विक ऊर्जा, जैविक ऊर्जा आणि हरित हायड्रोजन अशा सर्व ऊर्जा स्रोतांसाठी सरकारने प्रोत्साहनपर धोरणे, सुस्पष्ट आराखडे आणि उद्दिष्टे सुनिश्चित केली आहेत. या क्षेत्रात सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी आहे.
सौर, पवन आणि एकूण नवीकरणीय ऊर्जानिर्मिती क्षमतेत भारत सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मार्च २०२५ पर्यंत भारतात सर्व स्रोतांची मिळून एकूण ऊर्जा निर्माण क्षमता ४७५ गिगावॉट होती आणि त्यात नवीकरणीय म्हणजे सौर, वात, जल आणि जैविक या ऊर्जास्रोतांचा वाटा २२० गिगावॉट होता. त्यात सौर उर्जेचा वाटा सर्वांत जास्त म्हणजे १०६ गिगावॉटचा होता. एकूण निर्मितीक्षमतेत या ऊर्जास्त्रोतांचा वाटा सुमारे ४६ टक्के असला, तरी प्रत्यक्ष ऊर्जानिर्मितीत तो वाटा फक्त २४ टक्के होता. याचे कारण म्हणजे जैविक ऊर्जा सोडली, तर बाकीच्या या ऊर्जास्रोतांपासून ऊर्जानिर्मिती बऱ्याच अंशी हवामानावर अवलंबून असते.