

Retirement Planning
esakal
देवेंद्र बंगाळे - devendrabangale@gmail.com
‘पीएफ’ आहे, ‘एफडी’ आहेत, विमा पॉलिसीही आहेत; पण पुढची २५ वर्षे हा पैसा पुरेल का? निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांचा हा आजचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. कारण ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ म्हणजे फक्त पैसा साठवणे नाही; तर वाढती महागाई, आरोग्यखर्च आणि नियमित उत्पन्न यांचा विचार करून आर्थिक सुरक्षिततेची टिकाऊ रचना तयार करणे आहे.
पुण्यातील एका ५६ वर्षीय वरिष्ठ अधिकाऱ्याने अलीकडे एक साधा; पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला- ‘‘पीएफ, एफडी, विमा पॉलिसी सगळं आहे; पण तरीही पुढची २५ वर्षे हा पैसा पुरेल का, हे समजत नाही.’’ ही भावना आज हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची आहे. समस्या अनेकदा ‘पैसा नाही’ ही नसते; तर ‘पैशाची स्पष्ट रचना नाही’ ही असते. आयुष्यभर कष्ट करून पैसा साठवला जातो; पण निवृत्तीनंतर तो पैसा कसा वापरायचा, किती काळ टिकवायचा, महागाईचा सामना कसा करायचा आणि नियमित उत्पन्न कसे मिळवायचे, याचा विचार मात्र अनेकदा उशिरा सुरू होतो. पूर्वी निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवटचा टप्पा मानला जायचा. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. वयाच्या ५८-६० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही अनेकांसमोर पुढील २५-३० वर्षांचा आर्थिक प्रवास असतो. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे केवळ कॉर्पस तयार करणे नाही; तर त्या कॉर्पसमधून स्थिर, सन्मानाने आणि मानसिक शांततेने जगण्याची रचना तयार करणे आहे.
निवृत्ती जवळ आली, की जवळपास संपूर्ण पैसा मुदत ठेवींमध्ये (एफडी) हलवला जातो. कारण ‘एफडी’ सुरक्षित वाटते. नियमित व्याज मिळते. बाजारातील चढ-उतार दिसत नाहीत. मनाला स्थैर्य वाटते. निवृत्तीनंतरचा सर्वांत मोठा धोका ‘पैसा कमी होणे’ हा नसतो; तर ‘पैसा पुरत नाही’ हा असतो. आज ७० हजार रुपयांत चालणारा मासिक खर्च १०-१२ वर्षांनी सहज १.२५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. औषधे, आरोग्य खर्च, घराची देखभाल, मदतनीस, प्रवास हे खर्च वयानुसार कमी होत नाहीत; अनेकदा वाढतात.