

IndiGo flight cancellations December 2025
esakal
नव्या ‘एफडीटीएल’ नियमावलीमुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘इंडिगो’ची विमाने मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली आणि देशभरातील विमानतळांवर हलकल्लोळ उडाला. हा गोंधळ पुढील चार ते पाच दिवस चालला. यातून परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असली, तरीही देशातील सर्वांत मोठ्या विमान कंपनीने प्रवाशांच्या मनातील विश्वास गमावला आहे. या परिस्थितीमध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि ‘डीजीसीए’नेही विलंबाने हस्तक्षेप केल्यामुळे प्रवासी वाऱ्यावर होते, असेही आरोप करण्यात आले.
देशभरातील विमान प्रवाशांनी दोन डिसेंबर रोजी पहाटेपासून ‘इंडिगो’च्या विमानांना मोठ्या प्रमाणात विलंब झाल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली. लवकरच हा विलंब अनेक विमाने आणि उड्डाणे रद्द होण्यापर्यंत वाढला. परिणामी लाखो प्रवासी देशभरातील विविध विमानतळांवर अडकले. एकेकाळी नियोजित वेळेवर उड्डाणे भरण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडिगो’ची दोन डिसेंबर रोजी केवळ ३५ टक्के विमानेच वेळेवर उड्डाण करू शकली. दुसऱ्या दिवशी यात आणखी घसरण झाली आणि फक्त १९.७ टक्केच उड्डाणे वेळेवर गेली. एवढेच नाही, तर विमानांच्या अनेक फेऱ्याही रद्द झाल्या. पहिल्या दोन दिवसांत २००हून अधिक उड्डाणे रद्द होण्यापासून हा गोंधळ सुरू झाला आणि चार डिसेंबर रोजी ५०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली; तर वेळेवर उड्डाण झालेल्या फेऱ्यांची संख्या एक अंकी झाली. पाच डिसेंबर रोजी संपूर्ण नेटवर्क रीसेट करण्यासाठी बहुतेक प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे रोखून ‘इंडिगो’ने अक्षरशः गुडघे टेकले. लाखो लोकांवर परिणाम झाल्याने हा विषय इतका मोठा झाला की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा चार वर्षांनंतरचा भारत दौरा चालू असतानाही ‘इंडिगो’ची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत राहिली. इतर विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवलेच, पण जास्त पैसे मोजूनही अनेकांना इच्छितस्थळी जाता आले नाही. कारण अनेक मार्गांवर तिकिटे उपलब्ध नव्हती आणि असंख्य मार्गांवर केवळ ‘इंडिगो’च सेवा पुरवते; त्यामुळे इतर कोणत्याही विमान कंपनीची सेवा उपलब्ध नव्हती.