

Narendra Modi Speech on Nehru Inflation
esakal
सरकारने निवडणुकांसाठी अडवून ठेवलेली इंधन दरवाढ अखेर करावीच लागली... ती महागाईत भर टाकेल. त्याआधीच एप्रिलचे महागाईचे आकडे वाढीचा कल दाखवणारे आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची झाल्याचे नगारे वाजवले जात होते, ती घटत्या रुपयानं एप्रिलमध्ये सहाव्या क्रमांकावर गेली. हे सारं गांभीर्यानं हाताळण्याचं प्रकरण आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना लक्ष्य करणं हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता छंद आहे. कोरिया युद्धाच्या वेळी नेहरूंनी मागच्या शतकात लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर त्यांनी एकविसाव्या शतकात संसदेत हल्ला चढवला. तेव्हा त्यांनी नेहरूंचे, कधी कधी कोरियातील लढाईही आपल्यावर परिणाम घडवते, त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढू शकतात, हे आपल्या नियंत्रणात राहत नाही, हे विधान ऐकवून नेहरूंनी महागाईवर हात वर केल्याचा हल्लाबोल केला होता.
तेच पंतप्रधान इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अडीच महिन्यांनी देशाला बचतीचे सल्ले देत आहेत कारण उघड आहे, युद्धाचे परिणाम सरकारच्या हाताबाहेरचे आहेत. आंतरराष्ट्रीय उलथापालथींचे परिणाम सरकार कोणाचंही असो... चुकत नाहीत. मुद्दा आहे दुटप्पीपणाचा. साहजिकच ताज्या बचतीच्या सल्ल्याचं महत्त्व कमी होत नाही, पण तो देताना केवळ सरकारला हे सांभाळता येत नाही याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली जाते आहे.