Share market trap
Esakal
पुणे - पूर्वीच्या काळी लोक गुप्तधनाच्या मागे लागायचे किंवा जमिनीत हंडा शोधायचे. आजच्या काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. आजचा तरुण गुंतवणुकीचा अभ्यास करण्याऐवजी सोशल मीडियावरील टिप्स पाहून ऑप्शन्स ट्रेडिंग करतो किंवा क्रेझी क्रिप्टोमध्ये पैसे टाकतो, हे त्या जुन्या खजिना शोधण्याच्या मानसिकतेचेच आधुनिक रूप आहे. नाव बदलले, पण चमत्कार घडण्याची आशा तीच आहे.
हल्ली यूट्यूब, इन्स्टाग्रामवर ‘२१ व्या वर्षी करोडपती कसे व्हावे?', 'नोकरी सोडा आणि ट्रेडिंग करा' असे सल्ले देणाऱ्या Financial Influencers चा पूर आला आहे. अनेक तरुण या रील्स आणि व्हिडिओंना बळी पडून कोणताही सखोल अभ्यास न करता शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा धोकादायक ट्रेडिंग अॅप्समध्ये पैसे गुंतवत आहेत.
मुळात ही हंडा सापडण्याची किंवा शेअर मार्केटमधून करोडपती व्हायची मानसिकता निर्माण होण्यामागे काय मानसशास्त्रीय कारणं आहेत, हल्लीच्या काळात याच मानसिकतेचा फायदा घेऊन लोकांची कशी फसवणूक केली जाते, हल्लीचा तरूण झटपट श्रीमंत होण्यासाठी कशामध्ये पैसे गुंतवतो, हे करत असताना तो कुठे अडकतो, सेबीची अधिकृत आकडेवारी काय सांगते हे सगळं सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
साहिल भोळे..(नाव बदलले आहे) वयाच्या चाळीशीत पोहोचलेला. पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथे राहणारा. स्वत: अर्थ या विषयात काम करतो. सुरूवातीला तो इतरांप्रमाणेच थोडे फार पैसे शेअर्समध्ये गुंतवायचा. कोरोना काळात शेअर्सचे भाव पडले होते त्यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी केली होती. त्यातून त्याला नंतरच्या काळात चांगले रिर्टन्स देखील आहे. डिव्हिडंट मधूनही चांगले पैसे मिळू लागले होते. त्याला वाटलं आता आपल्याला या क्षेत्रातलं बऱ्यापैकी कळतं आहे. त्याने ऑप्शन ट्रेडिंग हळूहळू सुरू केले. सुरूवातीच्या काळात रिटर्नही चांगले मिळाले. म्हणून तो अधिकाधिक गुंतवत गेला. त्यातूनच त्याला सल्लागार म्हणून ज्या बँकेत त्याने डिमॅट अकाउंट उघडलं होतं तिथली मंडळी मदत करू लागली. त्यांचे ऐकून तो शेअर्स घेऊ लागला. विकू लागला. पण त्यानंतर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यावेळी शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. बँकांच्या सल्लागारांनी हात झटकले. आणि मध्यमवर्गीय असणाऱ्या साहिलचे जवळपास ८ ते १० लाख रूपये बुडाले.
त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. कारण त्याने मुलांच्या शिक्षणासाठीचा फंड, मेडिकल फंड या साठी वापरला होता. अर्थातच हे एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानी केलेल्या या चुकीचा फक्त त्याच्या आर्थिक आयुष्यावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यावर देखील परिणाम झाला. त्याच्या पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये सतत वाद होऊ लागले. प्रकरण इतकं टोकावर गेलं की त्याच्या मनात जीवन संपवण्याचे विचार येऊ लागले. पण दोने छोटी मुलं आहे याचा विचार करून त्याने कोणत्याही चुकीच्या विचाराच्या आहारी जायचं नाही असं ठरवलं. या सगळ्यात त्याला त्याच्या काही जवळच्या मंडळींनी मदत केली. पण हा मानसिक धक्का त्याचं खूप खच्चीकरण करणारा ठरला. अजूनही त्याने सगळे शेअर्स विकलेले नाहीत. हळूहळू तो या सगळ्यातून बाहेर येतोय. पण यामध्ये जास्त पडायचं नाही असं मात्र त्याने ठरवलं आहे.