
डॉ. रवींद्र उटगीकर
स्वयंसेवी संस्थांची सामाजिक दृष्टी आणि उद्योगसंस्थांची व्यावसायिकता यांचा मेळ घालणारी ‘सामाजिक उद्योजकता’ ही नवी कल्पना आपल्याकडे रुजू लागली आहे. व्यापक समाजहितातून आपल्या उद्योगाचे आणि त्यातून स्वतःचे हित साधण्याच्या या नवकल्पनेमुळे विकासातून निर्माण होणारे असमतोल दूर करण्याला आणि त्याला शाश्वत रूप येण्याला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.
परिवर्तनाची गरज ओळखतो, तिला प्रतिसाद देतो आणि त्यातून संधी साधतो, तो खरा उद्यमशील.
- पीटर ड्रकर (ख्यातनाम व्यवस्थापनतज्ज्ञ)
अर्थकारण आणि समाजकारण हे विकासगंगेचे दोन तीर मानले जातात. परंतु या दोहोंचे परस्परावलंबित्व गुंतागुंतीचे आहे. एकीकडे, आर्थिक विकास हा साधनस्रोत आणि संधी उपलब्ध करून सामाजिक विकासाची कवाडे खुली करू शकतो.