
विजय चौथाईवाले
रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे झाली. हा संघर्ष थांबावा, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी तोडग्याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. युक्रेनचा ‘नाटो’तील सहभाग, युरोपचे संरक्षणधोरण याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या स्थितीवर प्रकाश टाकणारा लेख.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हॅन्स यांच्या वादग्रस्त भाषणामुळे अनेकांना अपरिचित ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’चे नाव चर्चेत आले. जगातील राजनैतिक विश्लेषक, कूटनीतिज्ञ आणि संरक्षणतज्ज्ञ यांच्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम असतो. ६१ वर्षांपासून होणाऱ्या या वार्षिक परिषदेत निमंत्रितांचाच सहभाग असतो. गेल्या वर्षीपासून मी या परिषदेत भाग घेत आहे. योगायोग असा की, गेल्या वर्षी माझी जे. डी. व्हेन्स यांच्यासोबत एक छोटी भेट झाली. त्यावेळी ते अमेरिकन काँग्रेसमध्ये सिनेटर होते. त्या भेटीत त्यांनी आपली पत्नी मूळ भारतीय आहे, असा आवर्जून उल्लेख केला होता.