

Insurance 2.0 India
esakal
दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या ‘इन्शुरन्स २.०’ या सुधारणा करण्यासाठी सरकारने निर्णायक पाऊल पुढे टाकले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ‘सबका बीमा सबकी रक्षा’ अर्थात ‘सर्वांसाठी विमा, सर्वांसाठी संरक्षण’ (विमा कायद्यांमध्ये सुधारणा) विधेयक, २०२५ मंजूर केले आहे.
सबका बीमा सबकी रक्षा’ अर्थात ‘सर्वांसाठी विमा, सर्वांसाठी संरक्षण’ विधेयकाद्वारे विमा अधिनियम १९३८, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण अधिनियम, १९९९ (इर्डा ॲक्ट) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अधिनियम, १९५६ मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, राष्ट्रपतींच्या संमतीनंतर ते लागू होईल. यासोबतच नॉन डेट इन्स्ट्रुमेंट्स रूल्स २०१९ मध्ये परकी गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्के करण्यासाठी सुधारणा करावी लागेल; तसेच ‘इर्डा’ला संबंधित नियमांमध्ये बदल करून या सुधारणा कार्यान्वित कराव्या लागतील. विमा कायद्यातील प्रमुख सुधारणा म्हणजे परदेशी कंपन्यांना भारतात परकी गुंतवणुकीची असलेली मर्यादा ७४ टक्क्यांवरून वाढवून १०० टक्के करण्यात आली आहे. याचा अर्थ सध्या भारतात व्यवसाय करीत असलेल्या परदेशी विमा कंपन्यांना आपले भांडवल १०० टक्के वाढवता येईल; तसेच नवी विमा कंपनी भारतात स्थापन करायची असल्यास स्वतःचे १०० टक्के भांडवल आणून विमा व्यवसायात उतरता येईल.