
साठच्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत रोमँटिक चित्रपटांची एक वेगळीच नशा होती. अशा हसीन माहौलमध्ये कमसीन अदाकारा सायरा बानो यांचं रुपेरी पडद्यावर आगमन म्हणजे रसिकांना गुलाबी स्वप्नांची पर्वणी होती. आज सायरा बानो यांचा वाढदिवस. वयाची ८१ वर्षं त्या पूर्ण करीत आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात त्या उण्यापुऱ्या पंधरा-सोळा वर्षंच होत्या; परंतु आपली छाप सोडून गेल्या. दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याच्या अर्धांगिनीची रियल लाइफमधील भूमिकादेखील त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
साठच्या दशकातील भारतीय हिंदी सिनेमाचा तो फार हसीन समां होता! रुपेरी पडदा नुकताच सप्तरंगात न्हाऊ लागला होता. पडद्यावरील नायिकांचं ‘कातील’ सौंदर्य आणखी ‘बेहतरीन’ होऊ लागलं होतं. पन्नासच्या दशकातील देखण्या सौंदर्यवतींचा अभिनय सिलसिला चालूच होता. वहिदा रहमान, वैजयंती माला, नूतन, माला सिन्हा, मधुबाला, मीना कुमारी... साठच्या दशकामध्ये आता नव्या अलवार सौंदर्यवतींची भर पडत होती. सायरा बानो, शर्मिला टागोर, तनुजा... रुपेरी पडदा अधिकाधिक मोहक बनत चालला होता! मधुर संगीत, अभिनयसंपन्न कलाविष्कार, मनाला भिडणारं कथानक आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन असा एकूण चित्रपटाचा बाज त्या वेळी होता. रोमँटिक सिनेमाची तर एक वेगळीच नशा होती.