
Salher Fort Maharashtra
esakal
युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत साल्हेर गडाचा समावेश करण्यात आलेला आहे. तो महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे. सह्याद्री पर्वतावरील हा सर्वात उंच गड असून, कळसूबाई शिखरानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर आहे तर साल्हेर गडाची उंची १५६७ मीटर म्हणजेच ५१४१ फूट आहे. साल्हेर किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. शिवकालीन कवी जयराम पिंडे साल्हेर गडाचे वर्णन करताना म्हणतात, की ‘सह्याद्रीचे मस्तक जो बागलाणाच्या ताब्यातील पृथ्वीवरील अतिविख्यात किल्ला उग्र अशा ताम्रानी (मोगलांनी) आपल्या ताब्यात ठेवला होता. तो महाबलवान शिवाजी महाराजांनी हाहा म्हणता घेतला.’ जयराम पिंडे साल्हेर गडाला सह्याद्रीचे मस्तक आहे, असे वर्णन करतात.
हा गड बागुल राजांची राजधानी होती. बागुल या नावावरूनच या भागाला बागलाण असे संबोधले जाते. आज बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील तालुका असून, त्याचे मुख्यालय सटाणा येथे आहे. हा गड पुढे बहामनी, निजाम आणि मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी साल्हेर गड जिंकून त्याला सुलतानगड असे नाव दिले. जानेवारी १६७०मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला व त्याचे पहिले नाव साल्हेर होते ते कायम ठेवले. साल्हेर गडाचे वर्णन ‘आईन ए अकबरी’ या ग्रंथातदेखील आलेले आहे. साल्हेर गड हा उत्तरेकडील महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तरेकडील अजिंक्य राज्याची ग्वाही देणारा हा गड आहे. हा गड जिंकून मोगलांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी धडकी भरवली. आपल्या स्वराज्याचा विस्तार केला.