
संपादकीय
सस्नेह नमस्कार,
साप्ताहिक सकाळचा हा पहिलावहिला गुढीपाडवा अंक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे.
दिवाळी अंक ही अनेक अर्थांनी मराठी साहित्यविश्वातील एक विलक्षण महत्त्वाची परंपरा. मराठी साहित्याचे जग अधिकाधिक सशक्त करण्यात, असंख्य नव्या-जुन्या लिहित्या हातांना पाठबळ देण्यात दिवाळी अंकांच्या ११६ वर्षांच्या परंपरेचे योगदान ‘महत्त्वाचे’ या शब्दाच्याही पलीकडे जाणारे आहे. पूर्वसूरींचे हे ऋण मान्य करत, ही साहित्य-विचार-माहिती-मनोरंजन परंपरा आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी साप्ताहिक सकाळने गुढीपाडवा अंकाचा हा घाट घातला आहे.