भ्रमंती। सुजाता आ.लेले
वारकरी पंढरीच्या आम्हा क्रिकेट भक्तांना मात्र आधीच क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले लॉर्ड्स मैदान डोळे भरून बघायला मिळाले. अजून काय हवे होते..विम्बल्डन आणि लॉर्ड्सवरच्या आठवणीच हृदयाच्या कप्प्यात आणि मेंदूच्या कॅमेऱ्यात जपून ठेवल्या आहेत...
भारतानं १९८३मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यावर जो आनंद झाला होता तो प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल हे स्वप्नातसुद्धा अशक्य होते. कारण असे स्वप्नच कधी पडले नव्हते आणि ते सत्यात उतरणे त्यावेळी शक्यच नव्हते. त्यानंतर फेडरर आणि नदाल, जोकोविच, सेरेना, इगा, अल्कारेझ, सिन्नर यांच्यासारख्या खेळाडूंना खेळताना बघून नक्कीच वाटले, की एकदातरी आयुष्यात विम्बल्डन आणि क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सची वारी करायला पाहिजे, असे मनात येईपर्यंत सेरेना नंतर फेडरर, नदाल असे दिग्गज खेळाडू रिटायर होऊ लागले...
निदान जोकोविच, इगा, सिन्नर आणि अल्कारेझ यांचा तरी खेळ बघितला पाहिजे आणि निदान लॉर्ड्स मैदान बघण्याचे नेत्रसुख तरी घ्यावे असा मनात विचार आला खरा! मग काय विम्बल्डनच्या मॅचेस बघायला जाऊयात का? असे आमच्या ग्रुपमध्ये नुसते विचारले तर सगळ्या जोड्या तयार,अगदी अमेरिकेत राहणारी जोडीसुद्धा! मग काय लेकीचा मित्र स्पोर्ट्स टूर नेतो हे तिने सांगितल्यावर, लगेच त्याच्याशी संपर्क साधला.