The peaceful domestic life of a doctor's family in rural Konkan.
Esakal
मैत्रेयी पंडित-दांडेकर
इतक्या प्रशस्त आणि सुंदर घरात राहायला लोक मात्र इन मीन तीन - ताई, डॉक्टरसाहेब आणि शशी! ताई मूळच्या पुण्याच्या, लग्न करून या कोकणातल्या छोट्याशा गावात येऊन स्थायिक झाल्या. त्यांचे यजमान, डॉक्टरसाहेब, पंचक्रोशीतील अगदी प्रख्यात डॉक्टर. शहरात बालपण गेलेल्या ताई लग्नानंतर थेट कोकणातल्या छोट्याशा खेड्यात आल्यावर इथल्या जीवनशैलीत अगदी दुधात साखर विरघळावी तशा विरघळून गेल्या.
संध्याकाळचे सात वाजले होते. दिवेलागणीची वेळ झाली होती. नारळी-पोफळीच्या गर्द झाडीतून टुमदार घरांची लालचुटुक कौलं वाकुल्या दाखवत होती. दूर क्षितिजावर नारंगी गोळा जसजसा विरघळू लागला तसा कोकणातल्या त्या वाडीतल्या कौलारू घरांपुढे सारवलेल्या स्वच्छ अंगणात काजव्यांसारखा एकेक दिवा लुकलुकू लागला. हातातली कामं सोडून शशी सवयीप्रमाणे देवाजवळ दिवा लावायला गेली. ताई मागच्या पडवीत हातात ब्रश घेऊन त्यांचं अपुरं राहिलेलं ऑइल पेंटिंग पूर्ण करत बसल्या होत्या.
‘‘शशी, बाहेरचे दिवेपण लाव गं!’’ ताईंनी शशीला साद घातली.