डॉ. अभिजित वैद्य
हृदयरोगाचे अचूक निदान आणि तातडीने केलेले प्रभावी उपचार रुग्णाला उत्तम आणि दीर्घ आयुष्य देऊ शकतात. त्यामुळे उपचार टाळणे निश्चितच शहाणपणाचे ठरत नाही. प्रश्न असा आहे, की हे उपचार ज्या लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत, आणि असे लोक बहुसंख्य आहेत, त्यांना हे उपचार कसे मिळतात, की मिळतच नाहीत? महाराष्ट्रातील आरोग्यक्षेत्राच्या वस्तुस्थितीचा आढावा...
जगभरातले हृदयरोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढते आहे. आज जगात किमान ४० टक्के, म्हणजे सुमारे ३० कोटी लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत. दरवर्षी पावणेदोन कोटी लोक हृदयरोगाला बळी पडतात. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या तुलनेत भारतात अधिक वेगाने हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.
आपल्या देशात किमान ६ कोटी लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत. दरवर्षी किमान ३० लाख लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. एकेकाळी श्रीमंतांचा मानला जाणारा हृदयरोग आता गरिबांपर्यंतही पोहोचला आहे. कधीकाळी प्रामुख्याने फक्त शहरी लोकांमध्ये आढळणारा हा आजार आता ग्रामीण भागातही वेगाने शिरकाव करीत आहे.
पुरुषांमध्ये अधिक आढळणारा हा आजार आता स्त्रियांमध्येही वाढत असल्याचे आढळत आहे. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे एकेकाळी आयुष्याच्या उत्तरार्धात आढळणारा हा आजार आजकाल तिशी-चाळिशीपासून सत्तरीपर्यंतच्या वयोगटातील लोकांमध्येही अधिकाधिक दिसू लागला आहे.