प्रसाद कानडे
अहमदाबाद अपघातानंतर भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्र अचानक टर्ब्युलन्समध्ये सापडले आहे. सुरक्षेच्या त्रुटी, बोइंगवरील संशय, वाढते विमा आणि इंधन खर्च, तसेच कंपन्यांच्या आपत्कालीन उपाययोजना या सर्वांचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर आणि विश्वासावर होणार आहे.
बारा जूनचा तो दिवस होता. अहमदाबाद विमानतळ माणसांनी नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. काहीजणांनी आपल्या घरच्यांचा निरोप घेतलेला, काहींनी फोटोंमध्ये हसणं टिपलेलं. कुणी शिक्षणासाठी लंडनला निघालेलं, तर कुणी कुटुंबासाठी परदेशवाट धरलेली. त्या प्रवाशांमध्ये काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर होते; नव्या भविष्याच्या उंबरठ्यावर उभे. पण त्यांच्या आयुष्याचं पान उलगडण्याआधीच मिटलं... अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाला झालेल्या अपघातात
२७१ लोकांचे प्राण गेले. हा अपघात भारतीय नागरी हवाई वाहतूक व्यवस्थेला हादरवणारा मोठा धक्का ठरला. गगनभरारी घेणारे विमान वाहतूक क्षेत्र अचानक टर्ब्युलन्समध्ये सापडले आहे. या अपघातानंतर भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणांनी आणि जागतिक तपास संस्थांनी मिळून घटनास्थळाचा कसून तपास सुरू केला. भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोसह (एएआयबी) अमेरिका व ब्रिटनच्या एकूण आठ तपास संस्थांचा यात समावेश आहे. अपघाताचं नेमकं कारण पुढे यायला तीन महिने लागणार असले, तरी त्याआधीच हवाई क्षेत्रात काही मूलगामी बदल होताना दिसत आहेत.