

Ajit Pawar Political Career
esakal
राजकारणात उतरलेल्या प्रत्येकाला सर्वोच्च पद भूषवण्याची आकांक्षा असतेच. राज्यातही मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बाळगणारे अनेकजण असतात; पण तेवढी उंची, लोकमान्यता-राजमान्यता आणि तशी क्षमता फार थोड्यांकडे असते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद भूषविण्याची क्षमता असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा समावेश होतो. नियतीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नसले, तरी दुसऱ्या क्रमांकावर बसूनही त्यांनी त्याच तोलामोलाने राज्यकारभार केला, हे त्यांचे वैशिष्ट्य.
रोखठोक, दूरदृष्टीचा, दिलेला शब्द पाळणारा, शेतकऱ्यांचा आधारवड, सहकाराचा महामेरू, खेळाडूंचा पाठीराखा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारा अशी अनेक विशेषणे ज्याच्या नावापुढे लावता येतील, असा नेता म्हणजे अजित पवार. राजकारणाबरोबरच समाजकारणाचा दांडगा अनुभव असलेला या नेत्याच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अनेक अर्थांनी सक्षम असूनही मुख्यमंत्री न झालेला नेता, अशी खंत त्यांच्या अनेक चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे.