Kazakhstan
Esakal
सुमीत कोटगिरे
कझाकिस्तानमधील अलमाटी हे शहर निसर्ग, इतिहास, साहस आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. बर्फाच्छादित डोंगर, स्वप्नवत सरोवरं, स्कीइंगचा रोमांच, स्वादिष्ट पाककला आणि आत्मीयतेने भरलेले लोक या साऱ्यांनी हा प्रवास अविस्मरणीय ठरवला. अलमाटीने मनात कायमस्वरूपी ठसा उमटवला.
कझाकिस्तानमधील अलमाटी या शहराबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं. सिल्क रूटचं ऐतिहासिक महत्त्व, निसर्गरम्य पर्वतरांगा, स्कीइंग रिसॉर्ट्स आणि रंगीबेरंगी संस्कृती या साऱ्यामुळे मनात ठरवलं होतं, की एकदा तरी इथं जायलाच हवं. अखेर तो दिवस उजाडला. मी मुंबईहून अलमाटीकडे प्रवासाला निघालो. साधारण चार तासांच्या विमान प्रवासानंतर बर्फाच्छादित पर्वतरांगांवरून झेपावत आमचे विमान अलमाटी विमानतळावर उतरले. त्या क्षणी मन अगदी आनंदाने भरून गेले होते, जणू काही स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते!
विमानतळाबाहेर पडताच थंडगार वाऱ्यानं माझं स्वागत केलं. स्वच्छ रस्ते, चोहीकडे पसरलेली हिरवळ आणि तिच्या पार्श्वभूमीला उभे असलेले मनोहारी डोंगर हे दृश्य पाहताक्षणीच ते शहर मनात घर करून बसलं. गाइडने आम्हाला सर्वप्रथम शहरफेरी घडवून आणली. उंचच उंच इमारती, आधुनिक कॅफे, रस्त्यांवरच्या कलात्मक मूर्ती या साऱ्यातून जाणवत होतं, की अलमाटी हे शहर जुन्या परंपरेचा आणि नव्या आधुनिकतेचा अप्रतिम मिलाफ आहे.