political history
Esakal
डॉ. सदानंद मोरे
प्रत्यक्षात घडलेल्या इतिहासात रशियाच्या अगोदर अचानक उगवलेला हिटलर नावाचा जर्मन धूमकेतूच दुसऱ्या महायुद्धाचे कारण ठरला व त्याचा प्रतिकार करण्यासाठी इंग्लंड-अमेरिकेला एकत्र यावे लागले. त्याच्या पराभवानंतर इंग्लंडचे सामर्थ्य उतरणीला लागले व मगच रशिया नावाच्या कम्युनिस्ट राजवटीचा उदय झाला. अमेरिकेनेच पुढाकार घेत या सत्तेचा शीतयुद्धात पराभव केला.
मायदेश इंग्लंडशी सशस्त्र संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवलेल्या अमेरिकेतील लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व अन्य कोणी सांगण्याची गरज नव्हती. त्यांच्या या गुणावर लुब्ध होऊन ताकवली या फ्रेंच प्रवासी विचारवंताने त्यांची तोंडभरून स्तुती करावी व त्यांच्या या नवस्वतंत्र देशाला आदर्श मानावे यात आश्चर्य काहीच नव्हते. इंग्लंडच काय परंतु युरोप खंडातील सर्व देशांना प्रदीर्घ इतिहास होता. त्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या संघर्षांच्या नोंदी दिसतात. अमेरिकेला इतिहासाचे असे ओझे वाहायचे काही कारणच नव्हते.
तिची पाटी कोरी होती. शिवाय केवळ भौगोलिक विस्तार व विपुल साधनसामग्री यामुळे इतर कोणाला जिंकून वगैरे त्याचे शोषण करून आपली प्रगती करायचा प्रसंग तिच्यावर येणारही नव्हता. त्यामुळे सुरुवातीला संपूर्ण अलिप्ततावादाचे धोरण राबवणे तिला अजिबात अवघड जात नव्हते. इतकेच नव्हे, तर निदान तात्त्विक स्तरावर तरी युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतवादाला विरोध करून वसाहतींच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार तिला सहज शक्य होते. ते तिने केलेसुद्धा.
एवढेच काय, परंतु क्यूबाला स्पेनपासून स्वतंत्र होताना तर तिची खरोखरीची मदत झाली. त्यामुळे अन्य परतंत्र गुलाम राष्ट्रांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या असल्यास आश्चर्य नाही. फिलिपिन्स हे त्यातील एक आणि निदान सुरुवातीच्या काळात तरी तसे चित्र दिसू लागले होते. त्याला स्वतः मार्क ट्वेन अपवाद असायचे कारण नव्हते. तो आणि त्याच्यासारख्या अन्य अमेरिकी स्वातंत्र्यवाद्यांच्या आपल्या देशाविषयीच्या आदरभावात त्यामुळे वाढ झाली असेल तर तेही स्वाभाविकच म्हणावे लागते.