Premium|Amir Khan Interview: सितारे जमीन परच्या निमित्ताने अमिर खानशी गप्पा.!

Sitare Jameen Par: न्यूरोडायव्हर्जंट मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? जाणून घेऊया आमिरच्याच शब्दांतून..
aamir khan interview
aamir khan interviewEsakal
Updated on

हर्षदा वेदपाठक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सितारे ज़मीन पर या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता, निर्माता आमिर खानशी गप्पा झाल्या. यश-अपयश, त्याची कारकीर्द, कामाची पद्धत अशा विषयांवर त्याच्याशी झालेला संवाद...

Q

तुमचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित होताना काय भावना असतात?

A

मला नेहमी असं वाटतं, की मी एका मुलाला जन्म देतोय. अर्थातच मी स्वतःची तुलना कोणत्याही आईशी करू शकत नाही, कारण मुलाला जन्म देतेवेळी आईच्या नेमक्या काय भावना असतात हे मला कळणं शक्य नाही. पण असं म्हणू शकतो, की एका बापाला जे वाटत असेल ते मला वाटत असतं. मी जेवढा उत्सुक असतो, तेवढीच मनात धाकधूकही असते. चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस जसा जवळ येत जातो, तशी ती वाढत जाते. चित्रपटाबद्दल जितका विचार करेन तितकी उत्सुकता आणखी वाढत जाते. अगदी पहिला चित्रपट आला होता तेव्हा जाणवलेला उत्साह आणि धाकधूक अजूनही जाणवते.

Q

सितारे ज़मीन पर या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता?

A

मी या क्षेत्रात जवळपास ३५ वर्षं आहे, आजवर ४५ चित्रपट केलेत. कोणत्याही चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक, प्रॉडक्शन टीम, लेखक, अभिनेते, अभिनेत्री असे सर्जनशील कलाकार एकत्र येतात. एवढे कलाकार एकत्र आले की भांड्याला भांडं लागणंही ओघानं येतंच. कधी दिग्दर्शकाला डीओपीच्या काही गोष्टी पटत नाहीत, तर कधी वेशभूषाकारांचा प्रॉडक्शन टीमशी वाद होतो. असे मतभेद सतत होत असतात. त्यातून कधी कोणाचा स्वाभिमानही दुखावतो. पण हा असा एक चित्रपट आहे, जो शूट करताना असे वादविवाद झालेले नाहीत!

बडोद्याला आमचं शेवटचं चित्रीकरण झालं, तिथं माझ्या हे लक्षात आलं. यावेळी कसलेच वाद झाले नाहीत, काही समस्या आल्या नाहीत, कोणाला समजावण्याचीही गरज पडली नाही! सगळं अगदी सहज पार पडलं. हे सगळं ‘त्या’ १० मुलांमुळे घडलं. ही मुलं सेटवर यायची तीच मुळी भरपूर ऊर्जा आणि आनंद घेऊन! ती मुलं नेहमी सर्वांना आनंदानं मिठ्या मारायची. त्यांच्यात कामाविषयी प्रचंड उत्सुकता होती. ही ऊर्जा आमच्या आसपास पसरली होती, त्यामुळे कोणीही कधी वाद घातले नाहीत की आरडाओरडा केला नाही. त्या न्यूरोडायव्हर्जंट मुलांनी आम्हाला नीट, न भांडता वागायला भाग पाडलं!

Q

तुम्ही शूटिंगदरम्यान कधी निराश झालात का?

A

या चित्रपटाचे हिरो-हिरॉईन असणाऱ्या दहाही मुलांनी संवादाचा व्यवस्थित सराव केला होता. त्यामुळे आम्हाला चित्रीकरणात उशीर झाला नाही. सगळ्यांना संवाद पाठ होते. खरंतर मीच अनेकदा चुकायचो आणि रीटेक द्यायचो तेव्हा चित्रपटात सुनीलची भूमिका करणारा आशिष नावाचा मुलगा म्हणायचा, ‘बड़े बड़े लोगों से ऐसी छोटी छोटी गलतियां होती हैं!’

Q

न्यूरोडायव्हर्जंट मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

A

मी त्या मुलांसोबत बराच वेळ घालवला. तारे ज़मीन परमध्येसुद्धा मी तेच केलं होतं. या मुलांसाठी भावुक होण्याची आणि सहानुभूती वाटण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. आपल्या सर्वांच्या भावना, भीती, स्वप्नं सारखीच असतात.

साधी गोष्ट बघा, आपण लहान असताना आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं जायचं पण या मुलांना कोणीही बोलवत नाही. या मुलांच्या कुटुंबीयांना काय वाटत असेल याची आम्हाला जाणीव झाली. हा फार भावनिक विषय आहे. मला त्यांच्याविषयी फार आत्मीयता वाटते.

Q

खेळासंबंधीचे चित्रपट तुमच्यासाठी लकी ठरतात असं वाटतं का?

A

हो खरंय हे. जो जिता वही सिकंदरमध्ये सायकलिंग होतं, गुलाममध्ये बॉक्सिंग होतं. हे दोन्ही चित्रपट चाहत्यांना आवडले. अव्वल नंबरमध्ये क्रिकेट हा खेळ होता, तो चित्रपट फारसा चालला नाही, पण तो रणबीर कपूरचा आवडता चित्रपट आहे!

Q

तुमच्याबरोबरच्या इतर कलाकारांपेक्षा तुम्ही कमी चित्रपट केलेत असं तुम्हाला वाटतं का?

A

खरंतर मी असा विचार केलेला नाही. मी संख्येचा विचार कधी करत नाही. ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे.

Q

आम्ही तुम्हाला दिग्दर्शकाच्या भूमिकेत कधी बघू शकू?

A

तारे ज़मीन परच्यावेळी थोडी कठीण परिस्थिती ओढवली होती म्हणून मला तो चित्रपट दिग्दर्शित करावा लागला. पण मी मनानं एक अभिनेता आहे. मी दिग्दर्शक असतो, तेव्हा मी माझा पूर्ण वेळ दिग्दर्शनाला देतो. तेव्हा मी अभिनय करू शकत नाही, कारण अभिनयाला तेव्हा माझ्याकडून दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे मी दिग्दर्शक होणं टाळतो, कारण मी अभिनेता म्हणून खूप व्यग्र आहे. एकदा मी दिग्दर्शक झालो, की मी अभिनय सोडून देईन.

Q

एखाद्या सामाजिक प्रश्नावर चित्रपट करण्याचा तुमचा काही विचार आहे का?

A

अजिबात नाही. मला केवळ सामाजिक प्रश्‍नांवर चित्रपट करायचा नाहीये. मी प्रेक्षकांच्या आवडीच्या दृष्टीने चित्रपटांच्या विषयांची निवड करतो. मी पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा मी एक प्रेक्षक असतो. जर एक प्रेक्षक म्हणून मला ती कथा आवडली, मला त्या कथेनं रडवलं, हसवलं तरच मी एक अभिनेता म्हणून ती कथा स्वीकारतो. मला वाटतं की चित्रपट सर्जनशीलतेतून निर्माण झाला पाहिजे, सामाजिक दृष्टीने नाही.

प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आणायचं असेल तर तुम्ही त्यांना मनोरंजन दिलं पाहिजे. माझा उद्देश लोकांचं मनोरंजन करणं हा आहे. सामाजिक प्रश्‍नांवरच्या चित्रपटांतून उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा एक कलाकार म्हणून मी माझ्या कलाकृतीतून मनोरंजन करत लोकांना कळत-नकळत एखादा सामाजिक संदेश देईन.

प्रेक्षकांना कंटाळा येईल असे चित्रपट मी करणार नाही. माझ्याकडे लगान, रंग दे बसंती, तारे ज़मीन पर, दंगल, थ्री इडियट्स, लपता लेडीजसारख्या सामाजिक विषयांवरच्या, पण सर्जनशील कथा आल्या तेव्हा मी ते चित्रपट केले. कारण या कथा जितक्या सामाजिक संदेश देणाऱ्या आहेत, तितक्याच त्या मनोरंजकसुद्धा आहेत.

Q

आपल्याकडे बालचित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असताना मुलांसाठीच्या चित्रपटांची संख्या कमी का?

A

मी सहमत आहे तुमच्याशी. एक निर्माता म्हणून मी हे कबूल करतो, की आपल्याकडे मुलांसाठी फार कमी चित्रपट केले जातात. तरी मी मुलांच्या दृष्टिकोनातून चित्रपट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे खेदजनक आहे, की आपण असे चित्रपट फार कमी करतो. मला असं वाटतं, कदाचित मी चुकीचा असू शकेन, पण मला असं वाटतं की मुलांच्या चित्रपटांतून फारसा आर्थिक फायदा होणार नाही असा विचार चित्रपटनिर्माते करत असावेत.

मी तसा विचार करत नाही. आपण मुलांसाठी चित्रपट करत नाही, मग मुलं विदेशी चित्रपट पाहतात. आपण तेच विदेशी चित्रपट डब करतो. पण आपण त्यांना भारतीय कथा असलेले चित्रपट दाखवले पाहिजेत. आपल्याला मुलांना प्रगल्भ आणि भावनाशील करायचंय. त्यामुळे आपल्याला त्याच प्रकारचे चित्रपट करावे लागतील.

आत्ताची मुलंच भविष्यात आपल्या देशाचे सूत्रधार असणार आहेत. आपल्या चित्रपटांनी त्यांना संवेदनशील केलं पाहिजे, त्यांच्यात सकारात्मक गुण कसे रुजवता येतील हे पाहायला पाहिजे. आपल्याकडे रामही आहे आणि रावणही आहे. आता हे आपल्यावर आहे, की आपण आपल्यात लपलेल्या रावणाला मोठं करणार की रामाला. मुलं स्वतःमधील रामाला पाहतील असे चित्रपट आपण करायला हवेत.

Q

हळूहळू चित्रपट बंद होऊन ओटीटीवरील मालिका मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातील असं सिनेसृष्टीतले तज्ज्ञ म्हणतात. यावर तुमचं काय मत आहे?

A

भविष्यात काय होईल ते मला माहीत नाही, पण मी चित्रपट आणि नाटकांसाठी समर्पित आहे. मी आज जिथं आहे तिथं चित्रपट आणि नाटकांमुळेच पोहोचलो आहे. त्यांच्यासाठी मी बांधील आहे. ओटीटीसुद्धा चांगलं माध्यम आहे, पण माझ्यासाठी चित्रपटांचा क्रमांक पहिला लागतो.

सध्या असं म्हटलं जात आहे, की फिल्म इंडस्ट्रीमध्येही आठ तासांची शिफ्ट ड्युटी लावली पाहिजे. या क्षेत्रात ते खरंच शक्य आहे का?

खरंतर ही काम करण्याची आदर्श पद्धत आहे असं मला वाटतं. जीवनात समतोल आवश्यक आहे. त्यासाठी दिवस तीन भागांत विभागता आला पाहिजे. आठ तास काम केलं पाहिजे,

आठ तास झोपलं पाहिजे, आठ तास कुटुंबासमवेत राहिलं पाहिजे.

पूर्वी मी दिवसाला १६-१६ तास काम करायचो. तसं करायला मला कोणी सांगितलं नव्हतं, मीच आवड म्हणून करायचो. माझ्यासाठी तो एक खेळ होता तेव्हा. गेल्या तीन-चार वर्षांपासून मात्र मी हे बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या आयुष्यात मोठा फरक पडलाय.

Q

प्रादेशिक किंवा इतर भारतीय भाषांमध्ये चित्रपट करायला आवडतील का?

A

आपल्या देशात अनेक भाषा आहेत. त्यामुळे एक निर्माता म्हणून मला वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट करायचे आहेतच. अर्थात मला माहीत नसलेल्या भाषेतल्या चित्रपटात मी अभिनय करू शकणार नाही, पण मी चित्रपटनिर्मिती नक्कीच करू शकतो.

Q

आम्ही ऐकलं आहे, की तुम्ही ‘महाभारत’ करत आहात?

A

माझ्यासाठी ‘महाभारत’ हा चित्रपट नसून तो एक यज्ञ आहे. त्यासाठी मला खूप तयारी करावी लागेल. हा चित्रपट माझा

ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते स्वप्न कधी पूर्ण होईल याची मात्र मला खात्री नाही.

Q

गौरीबद्दल काय सांगाल?

A

प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. गौरी खूप शांत आणि छान स्त्री आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. ती खूप छान प्रकारे समतोल ठेवते. मी विरुद्ध आहे. मी अगदी टोकाचा विचार करणारा आणि जरा डळमळीत आहे. मी ३६ तास काम करतो आणि ३६ तास झोपतो. माझं डोकं बऱ्याचदा ठिकाणावर नसतं. माझ्या डोक्यात शंभर विचार असतात, त्यांच्यात मी मग्न असतो. आम्ही दोघंही दोन टोकांची लोकं आहोत. तिनं माझ्यात स्थैर्य, हळुवारपणा आणि शांती आणलीय. मला वाटतं की मी तिच्या आयुष्यात उत्साह आणतो, पुढेही आणेन.

Q

तुमच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी काय सांगाल?

A

लाल सिंग चढ्ढा अपेक्षेइतका चालला नाही तेव्हा मी खूप निराश झालो होतो. त्याआधी ठग्ज आला तेव्हासुद्धा असंच झालं होतं. त्यावेळी मी आदित्य चोप्रा आणि व्हिक्टरला सांगितलं होतं की मला चित्रपट आवडलेला नाही, प्रेक्षकांनाही तो आवडणार नाही. त्यावेळी ते माझ्याशी सहमत नव्हते. त्यांच्यापरीनं ते बरोबर होते, कारण दिग्दर्शकाला त्याचा एक दृष्टिकोन असतो आणि तो त्याप्रमाणेच चालतो. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी मला किरण म्हटली होती, की तू एकदम निवांत दिसतोयस, मी तुला एवढं निवांत कधीच पाहिलं नाही.

मी तिला सांगितलं, की मला चित्रपट आवडला नाही. मी माझ्या विचारात स्पष्ट होतो. माझ्या कुटुंबाला माहीत होतं की मला ठग्ज आवडला नाहीये. पण मी लाल सिंग चढ्ढा केला तेव्हा मला एक चांगला चित्रपट केल्याचा अभिमान वाटत होता. पण तो माझ्या अपेक्षेइतका चालला नाही. हे असं बऱ्याच काळानंतर झालं.

प्रेक्षकांचा हा नकार माझ्या मनाला खूप लागला. तुम्ही सुपरमॅनचा तिसरा भाग पाहिला आहे का? त्यात तो प्रेमात पडतो आणि ठग्ज त्याच्यावर हल्ला करतात, तो हलूही शकत नाही इतकं ते त्याला मारतात. अगदी तसंच लाल सिंग चढ्ढाचं अपयश मला ‘लागलं’. त्यानंतर किरण, जुनैद, आझाद, आयरा माझ्यासोबत शक्य तितका वेळ घालवायचे. पॉप गाणी लावून मला निराशेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. मला माझ्या कुटुंबानं खूप प्रेम आणि आदर दिला आहे.

(हर्षदा वेदपाठक मुंबईस्थित सिनेपत्रकार आहेत.)

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com